मुंबई, 18 जानेवारी : पालक होणं हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मुलाच्या जन्मानंतर जोडप्याच्या जबाबदारीमध्ये वाढ होते. मुलांचं योग्य पद्धतीनं संगोपन करणं ही सर्वांत मोठी जबाबदारी असते. मात्र, मुलांकडून जशा चुका होतात त्याचप्रमाणे पालकांकडून काही चुका होण्याची शक्यता असते. प्रत्येक पालकाची संगोपनाची पद्धत वेगळी असते. काहींना एकदम लाडाकोडात आपल्या मुलांना वाढवायचं असतं काहीजण कडक शिस्तीचा अवलंब करतात. पण, लाड असो किंवा शिस्त कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो, ही बाब पालक विसरतात. याचाच परिणाम मुलांच्या सवयी आणि स्वभावावर होतो. 'एनडीटीव्ही'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पालकांच्या पुढील सवयींमुळे त्यांची मुलं हट्टी आणि चिडखोर बनतात:
1) स्वत: हट्टी असणं: पालक हेच मुलांचे पहिले शिक्षक असतात. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात मुलं जे काही शिकतात त्यामध्ये पालकांचा अंश दिसतो. त्यामुळे जर पालक स्वतःच हट्टी असतील तर त्यांची मुलंही अशीच वागतात. पालकांच्या हट्टीपणाची सवय मुलांनाही लागते.
2) मुलांचं म्हणणं ऐकून न घेणं: स्वतःच्या कामात व्यस्त असल्यानं अनेक पालक मुलांच्या म्हणण्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे मुलांच्या अडचणी आणि छोट्या-छोट्या इच्छा त्यांच्यापुरत्याच मर्यादित राहतात. त्या पालकांपर्यंत पोहचतच नाहीत. अशा परिस्थितीत मुलं हट्टी होऊ लागतात. ती आपलंच म्हणणं लावून धरतात जेणेकरून पालक ते ऐकतील.
हेही वाचा - हिवाळ्यात केसगळती थांबवण्यासाठी उत्तम उपाय आहे ABC ज्यूस, त्वचेसाठीही फायदेशीर
3) मर्यादा घालून देणं: कधीकधी पालक मुलांसाठी मर्यादा घालून देत नाहीत. प्रत्येक पालकानं मुलांना त्यांच्या मर्यादा समजावून सांगितल्या पाहिजेत. कधी काय मागायचं, कोणत्या वस्तू विकत घ्यायच्या आणि कोणत्या वस्तू टाळायच्या, केव्हा आणि कुठे कसं वागायचं, हे सर्व मुलांना शिकवलं पाहिजे. मुलांना या गोष्टींबाबत मर्यादा घातल्या नाहीत तर मुलं अनेकदा मार्केट किंवा मॉलमध्ये काहीतरी मागतात. ती वस्तू त्यांना दिली नाही तर मग तिथेच रडायला लागतात.
4) प्रत्येक गोष्ट ऐकणं: प्रत्येक गोष्टीचा अतिरेक वाईट असतो, हे आपल्याला माहीतच आहे. मुलांची प्रत्येक गोष्ट ऐकणं हेदेखील त्यांच्या हट्टीपणाचं कारण असू शकतं. जेव्हा पालक मुलांनी म्हटलेल्या प्रत्येक गोष्टीचं पालन करतात, तेव्हा हळूहळू त्यांच्या इच्छा वाढू लागतात. वाढलेल्या इच्छा पूर्ण नाही झाल्या तर मग ते हट्ट करू लागतात. अशा परिस्थितीत पालकांनी संयम राखून मुलांची समजूत घातली पाहिजे.
5) प्रत्येक वेळी नकार देणं: काहीवेळा मुलं एखादी गोष्ट मिळवण्याबद्दल जास्त आग्रही होतात. ती वस्तू किंवा पाहिजे ती गोष्ट मिळवण्यासाठी ते खाणं-पिणंही सोडतात. कधी-कधी रडून अकांडतांडव करतात. पालक त्यांच्या प्रत्येक गोष्टींना नकार देतात, हे या परिस्थितीचं कारण असू शकतं. जेव्हा आई-वडील मुलांच्या प्रत्येक गोष्टीला नकार देतात, त्यांची कोणतीही इच्छा पूर्ण करत नाहीत तेव्हा मुलं अतिहट्टीपणा करू लागतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Parents and child