प्रत्येक आई (Mother) आपल्या मुलांसाठी काहीही करण्यास तयार असते. मुलांसाठी काय चांगलं, काय वाईट याची चांगली जाणीव आईला असते. अलीकडेच एका महिलेने आपल्या पतीकडून या संदर्भात आलेल्या विचित्र अनुभवाबद्दल रेडिट (Reddit) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media Platform) लिहिलं आहे. आपल्या मुलीबद्दल घेतलेल्या एका निर्णयावरून या महिलेला तिच्या पतीकडून ओरडा खावा लागला, असं तिने लिहिलं आहे.
तिने सांगितलेला किस्सा काय आहे, ते पाहू या. संबंधित महिलेला पाच वर्षांची मुलगी आहे. तिच्या भुवया (Eyebrows) जाड आणि एकमेकांना जोडलेल्या (Unibro) आहेत. त्यामुळे अनेक जण तिला चिडवतात. परिणामी त्या मुलीला असं वाटतं की आपण खरंच खूप वाईट दिसतो. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ कोरोना महामारी (Corona Pandemic) असल्यामुळे प्रत्यक्ष शाळा बंद आहेत आणि ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत. त्यामुळे शाळेत तिला कोणी त्रास देण्याचा प्रश्न येत नाही; मात्र घरी त्या मुलीची चुलत किंवा मामेभावंडं येतात, तेव्हा ती मुलीला त्या कारणावरून वेगवेगळ्या नावांनी चिडवतात. त्यामुळे तिचा आत्मविश्वास कमी होऊ लागला आणि तिला न्यूनगंड (Inferiority Complex) येऊ लागला. वास्तविक ही महिला म्हणजेच त्या मुलीची आई तिला वारंवार हे समजावत होती, की ती खरंच खूप सुंदर दिसते; मात्र तरीही त्या मुलीच्या डोक्यातून आपण त्या जोडलेल्या भुवयांमुळे कुरूप दिसत असल्याची भावना काही जायचं नाव घेईना.
हे ही वाचा-
... आणि 20 वर्षांचं आयुष्य त्याच्या स्मृतीतून अचानक पुसलं गेलं! नेमकं घडलं काय?
आता लवकरच त्या मुलीचं किंडरगार्टन (Kindergarten) सुरू होणार आहे. त्यामुळे तिथे तिला कुणी चिडवलेलं मुलीच्या आईला अजिबात आवडणार नव्हतं. म्हणूनच मुलीच्या आईने निर्णय घेतला, की तिच्या जोडलेल्या भुवयांचं वॅक्सिंग (Waxing) करायचं. त्यानुसार तिने वॅक्सिंग केलंही. तिने शेप वगैरे वेगळं काही केलं नाही; फक्त तिच्या दोन्ही भुवयांना जोडणारे मधले केस वॅक्सिंगद्वारे काढून टाकले. त्यानंतर त्या मुलीने स्वतःच आईला सांगितलं, की 'आता मी खूप सुंदर दिसतेय.' हे सांगताना त्या मुलीच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. मुलीच्या आईने तिला सांगितलं, की ती आधीही छान दिसायची आणि आताही छानच दिसतेय.
संध्याकाळी जेव्हा या महिलेचा पती, म्हणजेच मुलीचे वडील घरी आले, तेव्हा त्यांनी मुलीला पाहिलं. मुलीसमोर बोलताना त्यांनी ती सुंदर दिसत असल्याचं सांगितलं. नंतर मात्र त्यांनी आपल्या पत्नीसोबत वाद घातला. पाच वर्षांच्या मुलीला ब्युटी स्टँडर्डसारख्या (Beauty Standards) गोष्टींची जाणीव करून देऊन ती चूक करतेय, असा ठपका त्यांनी आपल्या पत्नीवर ठेवला. मुलगी पाचच वर्षांची असल्याने एवढ्यातच तिच्या भुवयांचं वॅक्सिंग करायला नको होतं, असं त्यांचं म्हणणं होतं. भुवया जोडलेल्या नसल्या तरच आपण चांगले दिसतो, असं त्या मुलीच्या डोक्यात बसायला यामुळे मदत होईल, असं त्यांना वाटत होतं. तिला काय हवंय हे समजण्याइतकी ती अद्याप मोठी नाही, असंही त्यांना वाटतंय.
या महिलेने आपल्या पतीला सांगितलं, की 'ही प्रत्येक गोष्ट मला पटते आहे; पण मुलीला जर जोडलेल्या भुवयांपासून सुटका हवी असेल आणि तिने तसं मला सांगितलं, तर ते मला करायलाच हवं ना! माझ्या मुलीला अशा गोष्टीवरून कोणी त्रास दिलेला मला चालणार नाही, विशेषकरून जेव्हा ती गोष्ट टाळणं आपल्याला सहज शक्य असेल तेव्हा...'
त्या महिलेने हा सगळा किस्सा रेडिटवर शेअर केला. यात कोणाची बाजू चूक आणि कोणाची बाजू बरोबर आहे, यावरचं मत तिने लोकांना विचारलं. बहुतांश जणांनी त्या महिलेचीच बाजू बरोबर असल्याचं मत दिलं. तसंच, अनेकांनी असं मत व्यक्त केलं, की ती मुलगी दोन्ही परिस्थितीत चांगली दिसते, हे तिच्या मनावर बिंबवण्यावर भर देणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.