मुंबई, 12 नोव्हेंबर : माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. म्हणजे आपण फार काळ एकटं राहू शकत नाही. आपल्या आसपास सतत कुणी तरी असलं पाहिजे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी आपण इतरांशी मैत्री करतो किंवा नातेसंबंध प्रस्थापित करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र असतात. काहींना भरपूर मित्र असतात, तर काही जण कमी मित्रांच्या सान्निध्यातही आनंदी असतात. नवीन माणसांना भेटण्याच्या आणि मित्र बनण्याच्या प्रक्रियेत आपली पर्सनॅलिटी म्हणजेच व्यक्तिमत्त्व सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावतं. आपल्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि सवयींमुळे इतरांना आपल्याशी मैत्री करायला आवडते; मात्र आपल्या काही सवयी आपल्याला एकटं पाडू शकतात. अनेकदा आपल्या या सवयी आपल्याला फार विशेष वाटत नाहीत; पण आपल्यापासून लोकांना दूर करण्यास त्या कारणीभूत ठरू शकतात. ‘आज तक’ने याबाबत माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या ठिकाणी अशा काही सवयींबद्दल माहिती देण्यात आली आहे, ज्या व्यक्तिमत्त्वासाठी घातक ठरू शकतात. 1) आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याच व्यक्ती असतात, ज्या तोंडासमोर आपली स्तुती करतात आणि पाठीमागे वाईट बोलतात. अशी सवय वाईट मानली जाते. ज्या व्यक्ती एखाद्याच्या पाठीमागे वाईट बोलतात त्यांच्याशी मैत्री करणं कोणालाही आवडत नाही. इतरांबद्दल वाईट बोलण्याची सवय लागल्यास अनेकदा आपण आपल्या मित्रांबद्दलही वाईट बोलू लागतो. आपल्या अशा वागणुकीमुळे आपले मित्र आणि जवळच्या व्यक्ती आपल्यापासून दूर जाऊ शकतात. हेही वाचा - मसल डिस्मॉर्फिया म्हणजे नक्की काय? तरुण पिढीला ठरतोय खूप घातक 2) दारू आणि सिगारेटचं व्यसन न करणाऱ्यांना बोअरिंग मानणारे अनेक जण तुम्हाला आढळतील. हॉस्टेल किंवा कॉलेज लाइफमध्ये अनेक वेळा अशा व्यक्तींशी संपर्क येऊ शकतो. अशा व्यक्ती आपण ‘कूल’ आहोत हे दाखवण्यासाठी दारू आणि सिगारेटचे व्यसन करण्याचा सल्ला इतरांना देतात. सिगारेट आणि दारू न पिणार्यांना कंटाळवाणं मानत असाल, तर तुम्हाला तुमची ही सवय लवकरात लवकर बदलण्याची गरज आहे. कारण, तुमच्या या सवयीबद्दल अनेकांना तक्रार असू शकते. 3) काही व्यक्तींना सतत इतरांचे दोष आणि चुका शोधण्याची सवय असते. अशा व्यक्तींना प्रत्येक गोष्टीत इतरांना दोष देणं आवडतं. शिवाय त्या इतरांच्या चुका शोधताना काही अपशब्दांचाही वापर करतात. अशी सवय अणाऱ्या व्यक्ती कुणालाही आवडत नाहीत. त्यामुळे तुम्हीसुद्धा पॉझिटिव्ह क्रिटिसिझमच्या नावाखाली सतत इतरांवर टीका करत असाल तर ही सवय लवकर बदला. 4) सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात अशा बऱ्याच व्यक्ती आहेत ज्या काही लाइक्स आणि कमेंट्ससाठी सोशल मीडियावर इतरांना ट्रोल करत असतात. अशा व्यक्तींना सोशल मीडियावर लाइक्स आणि कमेंट्स कदाचित मिळू शकतात; पण त्यांच्या ट्रोलिंगच्या सवयीमुळs खऱ्या आयुष्यात त्यांचे मित्र त्यांच्यापासून दूर जातात. 5) तुम्हाला सोशल मीडियावर असे अनेक जण भेटतील जे नेहमी दयाळूपणा, प्रेम आणि चांगुलपणाबद्दल बोलतात; पण ते खऱ्या आयुष्यात याच्या एकदम उलट वागतात. अशा व्यक्ती केवळ सोशल मीडियावर दाखवण्यासाठी चांगुलपणाचा आव आणतात. प्रत्यक्ष जीवनात अशा व्यक्ती इतरांच्या भावनांचा आदर करत नाहीत आणि वाईट वागतात. तुम्हालाही अशी सवय असेल तर ती लवकरात लवकर सोडली पाहिजे. 6) काही व्यक्तींना सतत तुलना करण्याची सवय असते. अशा व्यक्ती फक्त गोष्टींचीच तुलना करत नाहीत, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातलं एखादं दु:ख त्यांच्यासोबत शेअर करत असाल तर ते त्याचीही इतरांशी तुलना करतात. अशा व्यक्ती फार काळ कोणाचेही मित्र राहू शकत नाहीत. या काही सवयींमुळे मित्र आणि नातेवाईक दुरावले जाऊ शकतात. त्यामुळे अशा सवयी असतील तर लगेच बदलण्याचा प्रयत्न करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.