नवी दिल्ली, 15 मार्च : नॉर्मल चालणं आरोग्यासाठी (Healthy Walking) चांगलं असतं आणि वेगात चालणं हृदयाच्या (Heart) आरोग्यासाठी चांगलं असतं. तसंच वजन कमी करायचं असेल तर कॅलरीज बर्न करण्यासाठी अनेक जण चालतात. आजकाल स्मार्टवॉच उपलब्ध आहेत; ती वॉचेस आपलं प्रत्येक पाऊल मोजतात आणि त्याचा काउंट सांगतात. त्यामुळे आपण किती पावलं चाललो आहोत, याची माहिती आपल्याला मिळते. परंतु चालणं आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अति चालण्यामुळे अनेक प्रकारचं नुकसानदेखील होतं. जास्त प्रमाणात चालणं हृदयविकार (Heart) आणि बीपीच्या (BP) रुग्णांसाठी घातक ठरू शकतं. फिजिशियन डॉ. अंकित जैन यांच्या मते, काही परिस्थितीत जास्त चालणं टाळलं पाहिजे. चालण्याने कॅलरीज बर्न होतात. शरीर सक्रिय राहतं आणि लठ्ठपणासारख्या समस्याही दूर होतात. म्हणूनच अनेक जण फिटनेस बँड आणि वॉच घालतात. त्याच्या मदतीने ते त्यांचं चालण्याचं आणि कॅलरीजचं टार्गेट पूर्ण करतात; पण हृदयाशी संबंधित असे अनेक आजार आहेत, ज्यामध्ये रुग्णांना जास्त चालण्यास मनाई करण्यात येते. याशिवाय उच्च रक्तदाब, न्यूरोलॉजिकल कंडिशन, लंग फायब्रोसिस आणि हाडांशी संबंधित आजार असतील, तर अशा स्थितीत जास्त चालणं आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतं. या संदर्भातलं वृत्त दैनिक भास्करने दिलं आहे. मॅसॅच्युसेट्स युनिव्हर्सिटीच्या मते, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी दररोज 6000-8000 पावलं चालणं पुरेसं आहे. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, दररोज 10,000 पावलं चालण्याची आवश्यकता नाही, असा दावा ‘द लॅन्सेट’ने केला आहे. त्यामुळे तुम्ही गरजेपेक्षा जास्त चालत असाल, तर आता थोडं सावध राहण्याची गरज आहे.
हे वाचा - कितीही पाणी प्यायलं तरी तहान काही शमत नाही; लगेच टेस्ट करा असू शकतो गंभीर आजार
जास्त चालल्यास काय होऊ शकतं? चालताना पायाच्या त्याच ठिकाणच्या स्नायूंवर वारंवार ताण येतो. अशा स्थितीत त्या स्नायूभोवतीच्या कोणत्याही जुन्या दुखापतीचा त्रास पुन्हा सुरू होऊ शकतो. याशिवाय, सतत चालण्यामुळे गुडघा आणि टाचांच्या सांध्यावर जास्त दबाव येतो. त्यामुळे हाडांशी संबंधित नवीन समस्या सुरू होऊ शकतात. जास्त चालण्यामुळे सूज येणं, दुखणं, सांधेदुखी, पाठीच्या खालच्या भागात दुखणं यासारख्या समस्याही निर्माण होतात. या व्यक्तींनी जास्त चालणं टाळावं ज्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊन गेला आहे, ज्यांच्या हृदयाची गती नॉर्मल नाही, डायलेटेड कार्डिओमायोपॅथी, ब्रेन स्ट्रोक किंवा पॅरालिसिसची समस्या आहे, अशा व्यक्तींनी जास्त चालणं टाळावं. डॉक्टरांशी सल्लामसलत न करता, स्वतःहून चालणं तुम्हाला महागात पडू शकतं.
हे वाचा - पायी चालणं आपण पूर्ण विसरलोय; भविष्यात वाईट घडण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या
चालताना कोणती खबरदारी घ्यावी? दिवसभर थकवा वाटेल, इतक्या जास्त प्रमाणात चालणं टाळावं. जास्त चालल्यामुळे अंगदुखी (Body Pain) होऊ शकते. त्यामुळे मर्यादित चालावं. चालताना पायात शूज घालावेत, चप्पल घालून चालू नये. चालण्यासाठी रोज एक वेळ निश्चित करून चालावं. शिवाय डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.