मुंबई, 20 जानेवारी: आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी राजधानी दिल्लीमधील कर्तव्य पथावरील कार्यक्रमाची युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे. या वर्षीची प्रजासत्ताक दिनाची परेड विशेष असणार आहे. कारण, या वर्षी उपस्थितांच्या बैठक व्यवस्थेमध्ये मोठा बदल करण्यता आला आहे. बैठकीच्या पहिल्या रांगेत व्हीआयपींऐवजी सर्वसामान्य कष्टकऱ्यांना स्थान मिळणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये विशेष अधिकृत निमंत्रितांसह प्रजासत्ताक राष्ट्राचं वास्तविक प्रतिनिधित्व करणारे रिक्षाचालक, भाजी विक्रेत्यांचाही समावेश असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रमजीवी व्यक्ती (ज्या कामगारांनी सेंट्रल व्हिस्टा उभारण्यात मदत केली), त्यांचे कुटुंबीय, कर्तव्य पथाची देखभाल करणारे कामगार, रिक्षाचालक, छोटे किराणा आणि भाजी विक्रेते यांना मुख्य व्यासपीठासमोर पहिल्या रांगेत बसवलं जाईल. 'वीऑन'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
सप्टेंबर 2022 मध्ये सुधारित सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूच्या उद्घाटनादरम्यान राजपथाचं नाव बदलून 'कर्तव्य पथ' असं ठेवलं आहे. हा बदल झाल्यानंतरचा हा पहिलाच प्रजासत्ताक दिन आणि परेड असेल. या वर्षीच्या उत्सवाची थीम 'सामान्य लोकांचा सहभाग' अशी आहे. याशिवाय, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे असतील. त्यांसोबत इजिप्तमधील 120 सदस्यीय मार्चिंग तुकडीदेखील या परेडमध्ये सहभागी होणार आहे.
राष्ट्रीय स्तरावर सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील
गेल्या काही वर्षांपासून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं सरकारी समारंभ आणि कार्यक्रमांमध्ये सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व वाढवण्यावर विशेष भर दिला आहे. गेल्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येही, ऑटोरिक्षा चालक, बांधकाम कामगार, स्वच्छता कामगार आणि फ्रंट लाईन कामगारांना भव्य राष्ट्रीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. 'पीपल्स पद्म' या संकल्पनेलाही महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण, गेल्यावर्षी जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीत, सामान्य लोकांनी पद्म पुरस्कार समितीला सुचविलेल्या व्यक्तींचा समावेश होता. गेल्या वर्षीच्या विजेत्यांमध्ये लोककलाकार, सामाजिक कार्यकर्ते, संगीतकार, खेळाडू, समाजसेवक आणि इतरांचा समावेश होता.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांची बैठक व्यवस्था 45 हजारांपर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यापैकी 32 हजार जागा आणि बीटिंग रिट्रीट इव्हेंटच्या एकूण जागांपैकी 10 टक्के जागांची तिकीटे नागरिकांसाठी ऑनलाइन उपलब्ध आहेत.
लाल किल्ल्यावरील भारत पर्व कार्यक्रमादरम्यान आदिवासी व्यवहार आणि संरक्षण मंत्रालयांचे कार्यक्रम होतील. या शिवाय, विविध राज्यांच्या कला प्रकारांचं आणि खाद्यपदार्थांचं प्रदर्शनदेखील होईल. फ्लायपास्टमध्ये 18 हेलिकॉप्टर, आठ ट्रान्सपोर्टर विमानं आणि 23 लढाऊ विमानांचा समावेश असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Republic Day 2023