मुंबई, 9 जुलै: मुंबईत मान्सूनचं आगमन झालं असून जोरदार पाऊस होत आहे. मुंबईकरांची सहलीसाठी बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्कला नेहमीच पसंती असते. आता पावसाळा सुरू असल्याने निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी अनेकजण राष्ट्रीय उद्यानात येत आहेत. आज रविवारी सुट्टी असल्याने राष्ट्रीय उद्यान परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती. दुपारी जवळपास दोन किलोमीटर पर्यंत लोकांच्या रांगा होत्या. पर्यटकांचे आकर्षण केंद्र बोरिवलीतील ‘संजय गांधी नॅशनल पार्क’ या राष्ट्रीय उद्यानात कान्हेरी लेण्या, सिंह विहार, वनराणी, तुळशी तलाव अशी पर्यटकांची आकर्षण केंद्रे आहेत. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचा ओढा जास्त असतो. देशातील तसेच राज्यातील विविध भागातून अनेक पर्यटक या ठिकाणी येतात. जवळजवळ 104 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये हे पसरलेले असून याला ‘काळा पहाड’ म्हणूनही संबोधले जाते. मुंबईत मोठ्या क्षेत्रावर पसरलेलं हे उद्यान नेहमीच पर्यटकानी फुललेलं असतं.
जैवविविधता पाहण्यास पसंती या उद्यानात विविध प्रकारचे सस्तन प्राणी, उभयचर प्राणी आणि इतर पशु-पक्षी पहायला मिळतात. तसेच बिबट्या हा येथे प्रामुख्याने आढळतो. मुंगूस, रानमांजर, अस्वल, हरीण इत्यादी प्राण्यांचादेखील वावर या अभयारण्यामध्ये होतो. या उद्यानामध्ये अनेक प्रकारचे वृक्ष आहेत. तसेच या ठिकाणी असणाऱ्या कान्हेरी बौद्ध लेण्या पाहायला मुंबईकर आवर्जून येत असतात. पर्यटकांनी नियम पाळण्याची गरज पावसाळा सुरू झाल्यापासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या ठिकाणी पर्यटकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारचा कचरा इतरत्र टाकू नये. तसेच पशु-पक्ष्यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी.