जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Aai aani Me : ती बोल्ड तर मी बिनधास्त; लढायचं बळ देते, अशी आहे माझी आई!

Aai aani Me : ती बोल्ड तर मी बिनधास्त; लढायचं बळ देते, अशी आहे माझी आई!

Aai aani Me : ती बोल्ड तर मी बिनधास्त; लढायचं बळ देते, अशी आहे माझी आई!

रात्री 3 वाजता जेव्हा मी घरी पोहोचते तेव्हा स्वयंपाकघराच्या ओट्यावर ठेवलेल्या डब्यात एक चपाती ठेवलेली असते माझ्यासाठी. मग ती तिच्याच ताटातली का असेना.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

13 मे, मुंबई : आईसोबतचं नातंही गर्भापासून सुरू होतं. त्याला शेवट नसतो. ती असते..कायम आपल्यासोबत. तिने आपल्यासाठी किती खस्ता खाल्ल्या हे सांगण्याची किंवा तिला थॅँक्यू म्हणायची वेळ फार क्वचित येते. मात्र जेव्हा अशी संधी असते तेव्हा मात्र तिला बरं वाटेल असं काही करावं. मदर्स डेच्या निमित्ताने ती संधी प्रत्येकाला मिळत असते. पत्रकारितेचं स्वप्न घेऊन अनेक तरुण तरुणी घर-दार सोडून दुसऱ्या शहरात येतात. तिथली आव्हानं स्वीकारतात. त्यावेळी बळ देण्याचं काम आई करत असते. ती प्रत्यक्षात नसली तरी एक अदृश्य शक्ती म्हणून पाठीशी असते..सदैव… मी वैष्णवी राऊत. पत्रकारितेची खूप मोठी स्वप्न घेऊन औरंगाबादेतून बाहेर पडले. मुंबई गाठलं आणि सुरू झाला आव्हानात्मक प्रवास. आज कोणतंही आव्हान समोर आलं की, आईचे शब्द कानावर पडतात आणि मग मनगटात जोर येतो लढायला. मी बोल्ड आहे कारण माझी आई अशी आहे. आणि मी आहे तिच्यासारखीच. बोल्ड..बिनधास्त..कुठल्याही परिस्थितीत न डगमगणारी! आई चपात्या लाटत होती आणि मी खाली बसून भाजी चिरून देत होते. बोलणं सुरु असताना ती म्हणाली, “वैष्णवी आपल्याला घरात तीन मुर्ती आणायच्या आहेत. एक शिवाजी महाराजांची, एक फुलेंची आणि एक आबेडकरांची” मी म्हणाले, “महाराज आणि फुले तर आणते पण आंबेडकर नाही आणता येणार. कारण हे तिन्ही लोक ‘विचारधारा’ आहेत. दोघांना आपण अंगीकारलं आहे. आंबेडकरांना आणायचं म्हटलं तर मग जातीय बंधनं आधी तोडावी लागतील” यावर किती वेळेपासून सुरु असलेलं आमचं संभाषण थांबलं. आई पुढे काहीच बोलली नाही. पण मी जे बोलले ते बोलण्याची कुवत आणि धाडस म्हणजे आईचंच बाळकडू. Aai aani Me : 17 वर्षे घरापासून दूर, आईच्या पत्रांनी दिला आधार; आई-मुलीच्या नात्यातील ओलावा जपणारा खास किस्सा जिद्दी, तोंडावर बोलणारी, आत्मविश्वासानं वावरणारी, काय हव नको ते थेट सांगणारी अशी मी, ज्याला एका शब्दात ‘बोल्ड’ असं म्हणतात. हे सगळं तिच्याकडून आलेलं. सातवीत असताना आईचं लग्न झालं. नवरा म्हणजे काय हे कळायचं वय पण नव्हतं. आत्यांसोबत दिवसभर खेळायची. लग्नानंतर तिला पिरियड्स आले. आजी-आजोबांनी ओरडा दिला तर भीती वाटायची, एकट्यात रडायची. आणि आज नगरसेवकासमोर जाऊन अख्ख्या एरियाचं प्रतिनिधित्व करते. लग्न झालं तेव्हा पप्पा पेपर वाटायचं काम करायचे. आज औरंगाबादमध्ये आमचं स्वतःचं घर आहे. मुलं सुशिक्षित आहेत. हे सगळं तिच्या भक्कम आधारामुळं. तिला पाहत राहिले आणि तिचे गुण आपोआप माझ्यात येत गेले. 21 वय होतं जेव्हा पहिल्यांदा औरंगाबाद सोडून पुण्यात आले. कधीच न बघितलेलं शहर त्यात कोरोनामुळे दुसरं लॉकडाऊन. 2 बॅग घेऊन एकटी आलेले. रूम शोधली, राहायला आले आणि 2-3 दिवसात सगळ्या रुममेट घरी गेल्या. महिनाभर त्या घरात एकटी होते. स्वयंपाक तोडका मोडका करायचे. पायी ऑफिस गाठायचे. पूर्णतः अनोळखी 4 लोकांसोबत काम करायचे. पुणे सुटलं तेव्हा मुंबईला पण अशीच 2 बॅग घेऊन एकटी आले. हे पण शहर पूर्ण नवीन. पण मी दोन्हीवेळा भांबावले नाही. भीती वाटली नाही. आज जेव्हा हे आठवतं तेव्हा जाणवतं की या खूप मोठ्या गोष्टी आहेत ज्या मी सहज करू शकले. कुठून आलं? आईकडून. मी सारखी म्हणायचे की, तू शिकवत नाही म्हणून मला स्वयंपाक येत नाही. तिने एकदाच यावर उत्तर दिलेलं, “कुणी शिकवत नसतं आपल्याला, पाहून, निरीक्षण करून शिकावं लागतं” आज करियरच्या पावलोपावली हे समजतंय. आज करियरचे पुढचे टप्पे गाठण्यासाठी मी खूप झगडते. कारण माझं करियर सुरु व्हावं, यासाठी आधी ती झगडलीये. मग अगदी कोणत्या शाळेत जावं, ट्युशन कसं असावं, हेच कॉलेज का योग्य आहे आपल्या मुलींसाठी, यासाठी प्रत्येकवेळी ती वडिलांना सामोरी गेलीये. आमच्या दोघीत खूप भांडणं व्हायची. कॉलेजला जाताना ती लवकर डब्बा बनवायची नाही, त्यावरून खूपदा तिला ऐकवलंय मी. मनाला लागेल असं बोलत सुटायचे. आजही घरी जायच्या आधी काय खायचं याची भलीमोठी लिस्ट काढते.  आणि घरी गेल्यावर त्यातली एखादीच गोष्ट करणं शक्य होतं. पण आता काही नाही बोलत. कारण रात्री 3 वाजता जेव्हा मी घरी पोहोचते तेव्हा स्वयंपाकघराच्या ओट्यावर ठेवलेल्या डब्यात एक चपाती ठेवलेली असते माझ्यासाठी. मग ती तिच्याच ताटातली का असेना. मला भूक लागलेली असेल तर खाऊन झोपेल ही, हे तिला माहिती असतं. अशी आहे माझी आई. तिचं आणि माझं अनेकदा जमत नाही. पण मला सगळ्यात जास्त तिनेच समजून घेतलंय. जेव्हा केव्हा मला गरज पडलीय. ती टिपिकल नाहीये. तिला माहितीये की आवडीची किंमत काय असते, काहीतरी ‘माझं’ आहे हे म्हणण्याचं सुख काय असतं. या दोन गोष्टी आपल्याला ‘इंडिपेंडंट’ बनण्यासाठी किती गरजेच्या असतात, हे तिला माहितीये. म्हणून आजही घर सांभाळून ती ‘स्वतःचं’ दुकान चालवतेय. पायी वारी करावीशी वाटली तर बिनधास्त एकटी निघते. मैत्रिणींसोबत ट्रिप करावी वाटली तर स्वतः नियोजन करून प्लॅन यशस्वी करते. तिच्या ठायी सगळं शक्य आहे. कोणतीच गोष्ट आपण करू शकत नाही, असं नसतंच हे शिकले ते तिच्याकडूनच. म्हणून तर, शाळेतही कधी निबंध लिहिण्यासाठी ‘आई’ विषय न निवडणारी मी, आज तिच्याबद्दल थोडं का असेना या डिजिटल कागदावर उतरवू शकलेय. पण हा, शाळेत लिहिलं नाही याचा अर्थ हा नाही की तिच्याबद्दल तेव्हा काही वाटायचं नाही. ते यासाठी की मला तेव्हाच कळलं होतं, काही नात्यांबद्दल शब्दांत व्यक्त होता येत नसतं. हे पण आलं आईकडूनच. आजही कुठे व्यक्त होता आलंय ‘आई’वर. मांडता आले ते माझेच गुण. जे आले आईकडून!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात