मुंबई, 12 मे : आईसोबतचं नातंही गर्भापासून सुरू होतं. त्याला शेवट नसतो. ती असते..कायम आपल्यासोबत. तिने आपल्यासाठी किती खस्ता खाल्ल्या हे सांगण्याची किंवा तिला थॅँक्यू म्हणायची वेळ फार क्वचित येते. मात्र जेव्हा अशी संधी असते तेव्हा मात्र तिला बरं वाटेल असं काही करावं. मदर्स डेच्या निमित्ताने ती संधी प्रत्येकाला मिळत असते. पत्रकारितेचं स्वप्न घेऊन अनेक तरुण तरुणी घर-दार सोडून दुसऱ्या शहरात येतात. तिथली आव्हानं स्वीकारतात. त्यावेळी बळ देण्याचं काम आई करत असते. ती प्रत्यक्षात नसली तरी एक अदृश्य शक्ती म्हणून पाठीशी असते..सदैव… मी क्रांती कानेटकर..कधी शिक्षण तर कधी नोकरीसाठी गेल्या 17 वर्षांपासून आई-वडिलांपासून लांब राहतेय. कोकणातलं एक गाव ते पत्रकारितेतील एक मोठ्या कंपनीत काम करण्यापर्यंतचा अनुभव आव्हानात्मक होता. यावेळी कायम आईची साथ होती. ती माझ्यासोबत इथं नसली तरी ती कायम असते. आई आणि माझं नातं कसं आहे असा मला सहज प्रश्न आज एकाने विचारला त्यावर नेमकं काय उत्तर द्यावं हे मला सुचलं नाही मी एकच म्हटलं जगावेगळ पण खूप भारी. कारण ती प्रेम दाखवत नाही, ती टोकत राहाते त्याचा राग येतो मात्र तिच्यामुळेच आज मी इथवर पोहोचू शकले हे देखील खरंच आहे. ती माझ्याशी न बोलता चार दिवस राहू शकते मला मात्र एक दिवस जरी फोन आला नाही तरी चुकल्यासारखं होतं. यामागचं कारणही तसंच आहे गेली 17 वर्ष मी माझ्या आईपासून ४०० किलोमीटर दूर आहे. अगदी शाळेपासून ते आता पत्रकारितेत काम करेपर्यंतचा हा प्रवास खूप अवघड आणि खडतर होता. खूप आव्हानं आली. या सगळ्यात खूपदा असं वाटलं की आईच्या कुशीत रडावं पण लांब राहात असल्याने ते शक्य झालं नाही. जेव्हा आई भेटायची तेव्हा टेन्शन नको याच भीतीनं कधी रडू कोसळलं नाही. आज आईला मी दिवसाला 10 फोन केले तरी त्यातला एखादा उचलला जातो. कधीकधी तोही नाही, नाहीतर तीन चार दिवस बोलणंही होत नाही. सुरुवातीला मला थोडा राग यायचा पण आता तोही येत नाही.
Mothers Day 2023 : ‘मदर्स डे’निमित्त आपल्या आईसाठी WhatsApp Statusला ठेवा हे सुंदर शुभेच्छा संदेश
शेवटी आपल्या मनात आई बद्दलची माया या सगळ्याला विसरायला भाग पाडते हे ही तेवढंच खरं आहे. मला आठवतंय मला 2006 ला बोर्डिंगला सोडायचं होतं. तेव्हा आईला वाईट वाटलं पण ती माझ्यासमोर रडली नाही. मीही आनंदाने बोर्डिंगला गेले. पहिलं वर्ष नवीन असल्याने छान वाटलं पण आई वडिलांना फार भेटण्याची परवानगी नव्हती. वैभववाडी पुणे हे अंतर खूप त्यावेळी एवढे पैसे घालवणंही शक्य नव्हतं. एक तोडगा होता पत्र लिहिण्याचा, आई बाबांना जेव्हा आठवण येईल तेव्हा पत्र लिहित राहायचे. सुरुवातीचे पहिलं वर्ष सहा सात पत्र आली. मात्र नंतर फक्त वाढदिवसाला मला त्यांचं पत्र यायचं. त्यानंतर माझीच कितीतरी पत्र घरी गेली आहेत. त्यांना त्या पत्राचं अप्रुप किती वाटायचं हा एक वेगळा रिसर्चचा प्रश्न होता. पण मी आतूरतेनं त्यांच्या उत्तराची वाट पाहायचे. त्यामुळे पत्रलेखनाची माझी मात्र चांगली तयारी झाली. त्यावेळीपासून मला माझा वाढदिवस खूप आवडायला लागला. मी त्याची आतूरतेनं वाट पाहात असते. जगाच्या पाठीवर मी कुठेही असेल तरी आई-बाबा न विसरता त्या दिवशी पत्र किंवा फोन न चुकता करतात. तो एक दिवस कधीच चुकत नाही. या सगळ्यात माझं आणि आईचं नातं अधिक घट्ट होण्यामागचं कारण म्हणजे तिने मला दिलेला सर्वात मोठा मानसिक आधार. तिची माहेरची परिस्थिती फार चांगली नव्हती, घरची परिस्थिती असूनही नोकरी करू दिली नाही. नंतर पैशांवरून होणारे वाद आणि तिचं केलं जाणारं मानसिक खच्चीकरण या सगळ्यातून तिने आम्हाला मात्र परिस्थितीला कसं तोंड द्यायचं याचे धडे खूप चांगले दिले. व्यवहारी राहायला शिकवलं. कॉलेजला माझे सगळे मित्र मैत्रिणी मजा करायला जायचे पण आईनं मलाा इंटर्नशिप करायला लावली.
लवकर नोकरीला लागून स्वत:च्या पायावर उभं राहा हा तिचा हट्ट होता. जेव्हा माझ्या घऱचे लग्नासाठी घाई करत होते त्यांना जबाबदारी संपवायची होती तेव्हा आईनं नकळत काही गोष्टी समजवल्या. मानसिक आधार दिला. आपण कमवत असू तर आपल्याला घरात किंमत आहे हा मूलमंत्र तिने एवढा माझ्या मनावर बिंबवला की बस्स. त्यामुळे कितीही कामाच्या ठिकाणी मानसिक त्रास झाला तरी त्यात तग धरून राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पैसे मिळवता येतात पण मानसिक आधार नाही ही गोष्ट मात्र खरी आहे. तिने मला व्यवहारी वागायला शिकवलं. तिने मला फक्त माझ्या पायावर उभं करुन नुसतं चालायला शिकवलं नाही तर तिने खऱ्या अर्थानं आयुष्यातला खडतर प्रवासात कसं चालायचं हेही तेवढंच शिकवलं. लवकर लग्न करु नका म्हणून ती माझ्या बाजूने उभी राहिली. ज्यामुळे आज मी नोकरी करू शकले आणि माझ्या पायावर उभी राहू शकले. ती जर माझ्या बाजूने बोलली नसती तर कदाचित बाकीच्यांनी माझा गाशा गुंडाळलाच असता. मात्र तिची तळमळ मला दिसत होती. हीच तळमळ माझी हिम्मत बनली.
मला आठवतं मी नोकरीला लागल्यावर सर्वात आधी तिचा आधार घेऊन एक छान मंगळसूत्र केलं होतं. त्यात अर्धात थोडी पैसे आईनंही आपल्याकडचे दिले होते. तो क्षण कायम स्मरणात राहील. आजही पत्रकारितेच्या क्षेत्रात असल्याने फार सुट्ट्या मिळत नाहीत. त्यामुळे प्रत्येकवेळी गावी जाणं शक्य होत नाही. तिची माझी भेट वर्षातून एकद किंवा फारतर दोनदाच होते. तिला फार मुंबईतलं माहिती नाही त्यामुळे तिचा जीव इथे रमत नाही तेही साहाजिक आहे. ती रोज मला भेटू शकत नसली तरी आता दोन दिवसांतून फोनवर बोलणं होतं. त्यातही ती अजूनही मला सल्ले देणं आणि व्यवहारी कसं वगायला हवं हे सांगत असते. प्रत्येक फोनवर ती मला आपण खंबीर राहायला हवं हे सांगत असते. तिचे ते शब्द प्रत्येक संकटात मला बळ देणारे असतात. त्यामुळे आज जी काही मी आहे ती खऱ्या अर्थानं तिच्या जिद्दीमुळे आणि माझ्या प्रयत्नांमुळे आहे हे मात्र नक्की.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.