मुंबई 05 मार्च : ट्वीटरनं नुकतंच एक सर्वेक्षण (Twitter Survey) केलं आहे. या सर्वेक्षणाचा विषय आहे, महिला आणि मुली ट्वीटरवर कोणत्या विषयावर सर्वाधिक चर्चा (Girls Gossiping) करतात. या सर्वेक्षणासाठी जानेवारी २०१९ ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ७ हजार ८३९ महिलांच्या ट्वीटर अकाऊंटचा अभ्यास करण्यात आलेला आहे. या महिला देशातील वेगवेगळ्या १९ शहरांमधील आहेत. या अभ्यासांती समोर आलेल्या माहितीनुसार, महिला फॅशन (Fashion), सौंदर्य, मनोरंजन (Entertainment), पुस्तकं (Books) आणि क्रीडा या विषयांवर सर्वाधिक चर्चा करतात.
८ मार्चला साजारा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ट्वीटरनं हे सर्वेक्षण केलं आहे. ट्विटरवर २४.९९ टक्के भारतीय महिलांनी आपल्याला असणारी आवड आणि रुची याबद्दल सर्वांत जास्त चर्चा केली. ज्यामध्ये फॅशन, पुस्तके, सौंदर्य, मनाेरंजन आणि अन्न यांचा समावेश आहे. तर २०.८ टक्के महिलांनी चालू घडामोडी, १४.५ टक्के महिलांनी सेलिब्रिटी क्षण, ११.७ टक्के महिलांनी समुदाय आणि ८.७ टक्के महिलांनी सामाजिक बदल या विषयांवर चर्चा केली. सर्वेक्षणानुसार, विविध प्रकारची आव्हाने स्वीकारण्यात बंगळुरू, हैदराबाद, मुंबई येथील महिला आघाडीवर आहेत.
भारतातील विविध शहरांनुसार महिलांच्या चर्चेचे मुद्दे वेगवेगळे आहेत. चेन्नईतील महिलांनी सेलिब्रिटी क्षण, क्रिएटिव्ह शोकेस आणि दररोजच्या घडामोडी याबद्दल, तर बंगळुरूमधील महिलांनी समाजापुढील आव्हाने या विषयावर सर्वाधिक चर्चा केली. गुवाहाटीतील महिलांनी त्यांची आवड आणि चालू घडामोडी यावर जास्त चर्चा केली.
याविषयी ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी म्हणाले की, ट्वीटरचा वापर करणाऱ्या महिलांना जाणून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. सर्वेक्षणातून असे दिसून येते, की ट्वीटरवर स्त्रिया मुक्तपणे व्यक्त होतात. भारतातील विविध शहरांमधील सर्वेक्षणानुसार आवड आणि रुची या विषयावर गुवाहाटी, लखनऊ आणि पुणे येथील महिलांनी सर्वांत जास्त चर्चा केली. याचप्रमाणे चालू घडामोडींवर गुवाहाटी आणि दिल्ली येथील महिलांनी, सेलिब्रिटी क्षण याविषयी चेन्नई, कोलकाता, मदुराई येथील महिलांनी, सामुदायिक विषयावर बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद येथील महिलांनी, तर सामाजिक बदल या विषयावर बंगळुरू, गुवाहाटी, दिल्ली येथील महिलांनी जास्त चर्चा केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media