Home /News /lifestyle /

2020 मधलं हिट App : बंदी असूनही TikTok ने टाकलं फेसबुक, इन्स्टा, whatsapp ला मागे

2020 मधलं हिट App : बंदी असूनही TikTok ने टाकलं फेसबुक, इन्स्टा, whatsapp ला मागे

टिकटॉक (TikTok) हे अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) या दोन्ही व्यासपीठांवर 2020मध्ये सर्वांत जास्त डाउनलोड झालेलं अ‍ॅप ठरलं आहे.

नवी दिल्ली,  11 डिसेंबर : भारतासारख्या काही देशांनी टिकटॉकवर बंदी घातलेली असतानाही हेच अ‍ॅप जगातलं नंबर अ‍ॅप्लिकेशन ठरलं आहे. टिकटॉक (TikTok) हे अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) या दोन्ही व्यासपीठांवर 2020मध्ये सर्वांत जास्त डाउनलोड झालेलं अ‍ॅप (Mobile Application) ठरलं आहे. अ‍ॅप अ‍ॅनी (App Annie) नावाची एक संस्था या संदर्भातलं विश्लेषण करते. त्या संस्थेच्या अहवालानुसार, टिकटॉकने यंदा फेसबुकला मागे टाकून पहिलं स्थान पटकावलं असून, 2021 मध्ये दरमहा सरासरी 1,2 अब्ज  जण टिकटॉक वापरत असतील, असा अंदाजही त्यात व्यक्त करण्यात आला आहे. 2020मध्ये झालेल्या डाउनलोड्सचा विचार करता, फेसबुकची (Facebook) मालकी असलेल्या इन्स्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सअ‍ॅप  (WhatsApp) यांनी अनुक्रमे तिसरं आणि पाचवं स्थान मिळवलं आहे. फेसबुकचं मेसेंजर (Messenger) अ‍ॅप 2019मध्ये सर्वांत जास्त डाउनलोड केलं गेलेलं अ‍ॅप ठरलं होतं. यंदा मात्र त्याचं स्थान सहाव्या क्रमांकावर फेकलं गेलं आहे. विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे झूम (Zoom) हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप यंदा चौथ्या स्थानावर असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत या अ‍ॅपने डाउनलोड्सच्या यादीत 219 क्रमांकांनी झेप घेतली आहे. अ‍ॅप अ‍ॅनीने आपल्या अहवालात म्हटलं आहे, की अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरून जगभरात होणाऱ्या वार्षिक डाउनलोड्सची संख्या 130 अब्जांवर (Billion) पोहोचणार आहे. गुगल प्लेवरून जगभरात होणाऱ्या डाउनलोड्सची संख्या आयओएसवरून होणाऱ्या डाउनलोड्सच्या तुलनेत 160 टक्क्यांनी जास्त आहे. 2020चा विचार करता वर्षभरात दोन्ही अॅप स्टोअर्सवरून होणाऱ्या डाउनलोड्सच्या संख्येत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोविड 19च्या (COVID19) प्रादुर्भावामुळे जगभरातल्या अनेक नागरिकांनी बराचसा वेळ घरातच आपल्या स्मार्टफोनवर व्यतीत केला. त्यामुळे डाउनलोड्सची संख्या अधिक वेगाने वाढली. ‘करोना (Corona) विषाणूची साथ जेव्हा सर्वोच्च टप्प्यात होती, त्या वेळी आपल्या मोबाइल वापरानेही सर्वोच्च स्थान गाठलं होतं. दोन-तीन वर्षांत जेवढा मोबाइल वापर झाला असता, तेवढा या कालावधीत झाला. तसंच मोबाइलवर घालवलेल्या कालावधीतही मोठी वाढ या कालावधीत झाली. म्हणजेच अधिकाधिक व्यक्ती मोबाइल अॅप्स वापरू लागल्या आणि त्यावर वेळ खर्च करू लागल्या,’ असं निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आलं आहे. अॅपमधल्या सेवा विकत घेण्यासाठी ग्राहकांनी 2020मध्ये तब्बल 112 अब्ज डॉलर एवढा खर्च केला. म्हणजेच या खर्चात वार्षिक 25 टक्के वाढ झाली. अॅपद्वारे खर्च होण्याच्या बाबतीत अॅपल जगभरात आघाडीवर आहे; मात्र अँड्रॉइडवर आधारित उपकरणांच्या वाढत्या आणि स्पर्धात्मक संख्येमुळे गुगल प्ले स्टोअरवरच्या अॅपद्वारे होणाऱ्या खर्चातही चांगलीच वाढ झाली आहे. अमेरिका, जपान, सौदी अरेबिया (USA) (Japan) (Saudi Arabia) आदी बाजारपेठांमध्ये आयओएसद्वारे खर्च होण्याचं प्रमाण अधिक आहे. भारतासह (India) ब्राझील (Brazil) , इंडोनेशिया (Indonesia) यांसारख्या देशांमध्ये गुगल प्ले स्टोअरमधल्या अॅपद्वारे होणारा खर्च अधिक आहे. 2020मध्ये ग्राहकांनी टिंडर (Tinder), टिकटॉक, यू-ट्यूब, डिस्ने प्लस, टेन्सेन्ट व्हिडिओ आदी अॅप्समध्ये सर्वाधिक खर्च केला. यात टिकटॉक 15 स्थानांनी वर आलं असून, नेटफ्लिक्सचं (Netflix) स्थान दुसऱ्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर गेलं आहे. अ‍ॅपपमध्ये किंवा अ‍ॅपपद्वारे करण्यात आलेल्या खर्चामध्ये सर्वांत जास्त खर्च गेमिंग अॅप्समध्ये करण्यात आला आहे. सोशल किंवा उत्पादकता मूल्य असलेल्या अॅप्समधल्या खर्चाचं प्रमाण त्या तुलनेत कमी आहे. तसंच, गुगल प्ले स्टोअरवरून झालेल्या एकूण डाउनलोड्सपैकी गेमिंग अॅप्सचं प्रमाण 45 टक्के होतं. गेल्या वर्षी हे प्रमाण 40 टक्के होतं. आयओएसवरून झालेल्या डाउनलोड्समध्ये 30 टक्के प्रमाण गेमिंग अॅप्सचं होतं. हे प्रमाण गेल्या वर्षीइतकंच आहे. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही माध्यमांतून सर्वांत जास्त डाउनलोड केल्या गेलेल्या गेम्समध्ये फ्री फायर (Free Fire), सबवे सर्फर (Subway Surfer), अमंग अस (Among Us), पब्जी मोबाइल (PUBG Mobile), गार्डनस्केप्स (Gardenscapes) यांचा समावेश आहे. अमंग अस या गेमने तब्बल 174 स्थानांची आश्चर्यकारक झेप घेतली. ऑनर ऑफ किंग्ज, पोकेमॉन गो, रॉब्लॉक्स, माँस्टर स्ट्राइक, कॉइन मास्टर या गेम्समध्ये ग्राहकांच्या खर्चाचं प्रमाण जास्त होतं. अ‍ॅप अ‍ॅनीच्या अहवालाने याकडेही लक्ष वेधलं आहे, की सर्वांत जास्त सक्रिय युझर्सच्या मासिक संख्येच्या बाबतीत या वर्षी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजर ही अ‍ॅप्स आघाडीवर आहेत. गेमिंगच्या बाबतीत पब्जी मोबाइल, कँडी क्रश (Candy Crush), रॉब्लॉक्स  (Roblox)या अ‍ॅपप्समध्ये मासिक सर्वांत जास्त सक्रिय युझर्स होते. अ‍ॅप डाउनलोड्स आणि त्यात केलेल्या खर्चाची माहिती आयओएस अ‍ॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअर यांच्या नोव्हेंबर २०२०पर्यंतच्या एकत्रित आकडेवारीतून मिळाली असून, आयओएसचे निष्कर्ष केवळ चीनपुरतेच मर्यादित आहेत, असं अॅप अॅनीद्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे. मंथली अॅक्टिव्ह युझर्सच्या माहितीत चीनचा जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीतला डेटा समाविष्ट नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला टिकटॉकवर भारतात बंदी घालण्यात आली असून, पब्जी मोबाइल हे अ‍ॅप लवकरच नव्या रूपात भारतात लाँच होणार आहे. पब्जी मोबाइल आणि पब्जी मोबाइल लाइट या गेमिंग अ‍ॅपवर सप्टेंबरच्या सुरुवातीला भारतात बंदी घालण्यात आली होती.
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

Tags: Mobile app, Tiktok

पुढील बातम्या