मुंबई, 30 डिसेंबर : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन पार्टीनंतर दुसरा दिवस हँगओव्हरचा असतो. हा हँगओव्हर वेगवेगळ्या प्रकारची दारू एकत्र प्यायल्यानं येतो, असं अनेकांना वाटतं. वाइन, बीअर, स्पिरिट्स यांच्या एकत्रीकरणातून अशी नशा चढते, की त्यामागे काही वेगळी कारणं असतात, त्याबाबत क्लॉडिया हॅमंड यांनी ‘बीबीसी’वर एक लेख लिहिला आहे. बीअर आणि वाइन एकत्र किंवा एकाच वेळी पिऊ नये असं जुनी माणसं सांगतात. तसंच बीअरआधी वाइन किंवा वाइनआधी बीअर पिऊ नये, असंही म्हणतात. या सगळ्या दंतकथा आहेत की खरंच यात तथ्य आहे, याबाबत अभ्यास करण्यात आला. 2000 सालापूर्वी करण्यात आलेल्या अभ्यासांवरून असं दिसून आलं, की हँगओव्हरमागचं मुख्य कारण शरीरातलं पाणी कमी होणं, अल्डोस्टेरॉन आणि कॉर्टिसॉल या हार्मोन्सच्या पातळीत बदल होणं, अल्कोहोलमुळे तयार होणारे विषारी घटक हे असतं. त्याशिवाय रोगप्रतिकार यंत्रणेत बिघाड झाल्यामुळेही हँगओव्हर वाढल्याचे पुरावे मिळाले आहेत. हेही वाचा : रम फक्त थंडीतच प्यावी का? उन्हाळ्यात प्यायल्यास काय होतं? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत दारूमधल्या अल्कोहोलचं प्रमाण जितकं जास्त असतं, तितकी ती दारू पटकन प्यायली जाते आणि तितकाच त्याचा हँगओव्हर जास्त असं समीकरण असतं. अर्थात अल्कोहोलच्या प्रमाणावर प्रत्येक वेळी हँगओव्हरचं प्रमाण ठरत नाही. वेगवेगळ्या दारू एकत्र केल्यामुळे पोटात अल्कोहोलचं प्रमाण जास्त जात नाही; मात्र कॉकटेल्समध्ये तसं होतं. भरपूर दारू घेऊन जो परिणाम होत नाही तो 3-4 स्पिरिट्स एकत्र करून त्यात इतर गोष्टी मिसळल्यानं होऊ शकतो. घसा कोरडा पडणं, डोकं दुखणं हा त्याचाच एक परिणाम असतो. नशा चढण्यासाठी इथेनॉल व्यतिरिक्त कंजिनर्स हा घटक परिणामकारक ठरतो. आंबवण्याच्या प्रक्रियेत तयार होणारे हे काही घटक असतात. त्यात अॅसिटोन, अॅसिटाल्डिहाइड, फ्युसल ऑइल आणि टॅनिन यांचा समावेश असतो. या घटकांमुळेच दारूला गडद रंग आणि खास स्वाद येतो. या घटकांमुळे हँगओव्हरच्या तीव्रतेवर काय परिणाम होतो, हे तपासण्यासाठी अमेरिकेत एक अभ्यास करण्यात आला. नेहमी दारू पिणाऱ्या मुलांना वेगवेगळ्या रात्री बॉरबॉन व्हिस्की आणि कोला, व्होडका आणि कोला तसंच दारूसारखं वाटेल असं कोला आणि काही टॉनिक एकत्र करून देण्यात आली. त्यांनी 3 ते 6 पेग घेतले. यामुळे त्यांच्या शरीरात अल्कोहोलचं प्रमाण ड्रिंक ड्राइव्ह लिमिटपेक्षा 2 ते 5 पटींनी जास्त झालं होतं. ज्या विद्यार्थ्यांनी बॉरबॉन घेतली होती, त्यांना हँगओव्हर जास्त चढला होता. हेही वाचा : विचित्र आहे डुलकीचे शास्त्र! तरुणांना जास्त येते तर वृद्ध लोक टिकून राहतात; टाळण्यासाठी प्रभाव उपाय व्होडका, रम, जीन या पारदर्शी दिसणाऱ्या मद्यांमध्ये कंजीनर्सचं (congeners) प्रमाण कमी असतं. त्यामुळे त्यापासून जास्त हँगओव्हरचा धोका नसतो. एकंदरीत दारू एकत्र केल्यामुळेच हँगओव्हर चढतो असं नाही. तसंच कशानंतर काय प्यायल्यानं नशा चढते याबाबततही ठोस अभ्यास झालेला नाही. दारू पिणाऱ्यांचं प्रत्येक दारूबाबत काय मत असतं यावर बरंच काही अवलंबून असतं. दारूची नशा वेगवेगळ्या दारू एकत्र केल्यानं जास्त चढते असं ठोसपणे म्हणता येणार नाही. दारूतल्या कंजीनर घटकाचं प्रमाण आणि दारू किती प्रमाणात प्यायली जाते, यावर त्याची नशा अवलंबून असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.