मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Microsoft चं नवीन ऑफिस तर पाहा; ताजमहालवरून प्रेरणा घेऊन केलीय रचना

Microsoft चं नवीन ऑफिस तर पाहा; ताजमहालवरून प्रेरणा घेऊन केलीय रचना

Microsoft office

Microsoft office

संगमरवरी जमीन (Marble Flooring) आणि घुमटाकार छत(Domes) असलेली ही वर्कस्पेस अतिशय प्रशस्त आहे. Microsoft चं भारतातलं हे ऑफिस पाहून आम्हाला इथे नोकरी द्या, अशी मागणी नेटिझन्स करू लागले आहेत.

नवी दिल्ली, 29 जानेवारी: संगमवरवरी खांब, पांढऱ्या संगमरवराची प्रशस्त मोकळी जागा, कलाकुसर केलेलं घुमटाकार छत, नक्षीदार जाळ्या

मायक्रोसॉफ्टनं दिल्ली-एनसीआर-नोएडात भारतातील विकास केंद्र (Indian Development Centre) उभारले आहे. या ऑफिसची रचना ताजमहालापासून (Tajmahal) प्रेरित आहे. हे नवीन संशोधन आणि विकास केंद्र (R & D Centre) भारतातील आणि जगभरातील युजर्सना अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध घेणाऱ्या इंजिनीअर्सचं प्रीमिअर हब असेल कंपनीनं म्हटलं आहे. बेंगळूरू आणि हैद्राबादनंतरचं मायक्रोसॉफ्टचे भारतातील हे तिसरं केंद्र आहे.

मायक्रोसॉफ्टचं अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक साधनसामुग्री यांची सांगड घालून हे अनोखं केंद्र उभारण्यात आलं आहे. याची रचना ताजमहालाच्या धर्तीवर करण्यात आली असून, संगमरवरी घुमटाकार छत, कमानी, मुघल स्थापत्यशैलीचं वैशिष्ट्य असणारी नक्षीदार जाळी,चमकदार पांढऱ्या रंगातील कॉरीडॉर्स यातून ताजमहालचीच झलक दिसते. शाश्वत आणि पर्यावरणपूरक अशी वास्तूरचना असून, कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशानं यात ऊर्जा आणि पाणी बचतीचे विविध अभिनव उपाय राबवण्यात आले आहेत.

ताजमहालपासून प्रेरित असे हे मायक्रोसॉफ्टचं विकास केंद्र सहा मजली इमारतीपैकी तीन मजल्यांवर पसरले आहे. संगमरवरी जमीन (Marble Flooring) आणि घुमटाकार छत(Domes) असलेली ही वर्कस्पेस अतिशय प्रशस्त आहे. ताजमहालमधील डिझाइनसारखीच डिझाइन्स आणि रंगसंगती इथं करण्यात आलेली आहे. कॉरीडॉर्सची रचनाही ताजमहालमधील आर्किटेक्चरवरून घेण्यात आली आहे. मुख्य वर्कस्पेसमधील रंगसंगती चार बाग गार्डनवरून(Char Bagh Garden) प्रेरणा घेउन केली आहे. यामुळं वर्कस्पेसमध्ये असणारा एकसुरीपणा दूर झाला आहे, असं कंपनीनं म्हटलं आहे. या ऑफीसचे फोटो आणि व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ते बघून अनेक भारतीयांनी फक्त एकाच प्रश्न विचारला आहे तो म्हणजे आम्हाला इथं काम करण्याची संधी कशी मिळेल?

एका युजरनं म्हटलं आहे, अत्यंत सुंदर जागा आहे, इथं काम करायचं आहे, कोणाकडे अर्ज पाठवू? एका युजरनं  हे तर सेव्हन स्टार हॉटेल असल्याचं म्हटलं आहे. ओपनिंग्ज आहेत का? इथं काम करणारे कर्मचारी फारच लकी आहेत, अशा भावना ट्विटरवर युजर्सनी व्यक्त केल्या आहेत.

कंपनीनं भारतीय कलाकौशल्याला अभिवादन करण्याच्या हेतूनं अशा पद्धतीची रचना केली असून, यासाठीचं संगमरवर, कपडा अन्य साहित्य स्थानिक बाजारपेठेतून घेतलं आहे, जेणेकरून अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. इथं असणारी म्युरल्स इस्टर एगच्या रचनेतील आहेत. पारंपारिक भारतीय वर्कस्पेसचे सूत्र या ऑफीसनं मोडून काढले आहे. ठराविक कोनातून बघितल्यास जाळीदार रचनेत बिल गेटस यांचे छायाचित्र दिसते. अशा अनेक करामती इथं दिसतात. त्यामुळं मायक्रोसॉफ्टचं हे केंद्र देशातील लोकप्रिय आणि एकमेव्द्वितीय वर्कस्पेस ठरेल तसंच वर्कस्पेसच्या क्षेत्रात एक नवीन पायंडा यामुळे पडेल हे निश्चित.

First published:

Tags: Bill gates, Delhi, Jobs, Tajmahal