मुंबई, 25 जुलै : ‘म्हैसूर पाक’ हे नाव तुम्ही ऐकले असेलच. शिवाय त्याची चव तुम्हीही चाखली असेल. सध्या म्हैसूर पाक देशाच्या जवळपास प्रत्येक भागात उपलब्ध आहे. आत मात्र पुन्हा एकदा म्हैसूर पाकची चर्चा वेगळ्या माध्य्माने होत आहे. नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय मासिकाने जगातल्या बेस्ट स्ट्रीट फूडची यादी जाहीर केली आणि त्यात म्हैसूर पाक हा १४ व्या क्रमांकावर आहे. भारतीय फालुदा नई कुल्फी हे दोन पदार्थही या यादीत झळकले. परंतु सर्वात जास्त चर्चा मात्र म्हैसूर पाकाचीच झाली. यानंतर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनीही ट्विट करून या कानडी पदार्थाचे कौतुक केले. म्हैसूर पाकची चर्चा ठीक पण तुम्हाला माहीत आहे का की, म्हैसूर पाक सर्वात आधी कुठे बनवले गेले. तुमचा विश्वास बसणार नाही पण म्हैसूर पाक हे एक ‘इमर्जन्सी स्वीट’ म्हणून बनवण्यात आले होते आणि इतर अनेक खाद्यपदार्थांप्रमाणेच हेदेखील राजवाड्याच्या स्वयंपाकघरातून लोकांपर्यंत पोहोचले आहे. म्हैसूर पाकचे म्हैसूर कनेक्शन त्याच्या नावातच ‘म्हैसूर पाक’ असे लिहिलेले असल्याने त्याचा शोध म्हैसूरमध्येच झाला होता हे सर्वांना कळेल. म्हैसूरशी संबंधित आणखी एक खाद्य जे सर्वत्र प्रसिद्ध आहे ते म्हणजे ‘म्हैसूर डोसा’. आत्तापर्यंत, म्हैसूर पाकची कथा काय आहे आणि ते आपल्या जवळच्या मिठाईच्या दुकानात कसे पोहोचले हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. म्हैसूरचे राजा कृष्णराजा वोडेयार यांच्यासाठी शाही स्वयंपाकघरात जेवण बनवण्याचे काम चालू होते. वोडेयर यांना खाण्यापिण्याची खूप आवड होती. अंबा विलास पॅलेस (राजमहल) मध्ये एक मोठे स्वयंपाकघर होते ज्यामध्ये युरोपियन ते देशी पदार्थ तयार केले जात होते. देवाला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्याची तयारीही येथे स्वतंत्र विभागात करण्यात आली होती. एके दिवशी राजासाठी जेवण बनवले होते आणि त्याच्या ताटात एक गोड पदार्थ गायब होता. ही गोष्ट त्याचा राजेशाही स्वयंपाकी काकासुर मडप्पाला त्रास देत होती. या दरम्यान ताट मांडण्यात आले आणि राजा जेवू लागला. यावेळी मडाप्पाने नवीन पदार्थ बनवण्यास सुरुवात केली. बेसन, देशी तूप आणि साखर विशिष्ठ प्रमाणात मिसळून गोड पदार्थ बनवला गेला. जेवण संपताच हा पदार्थ राजासमोर हजर करण्यात आला. गरमागरम मिठाई तोंडात टाकताच विरघळली. अन्नाचे जाणकार राजा कृष्णराज यांना समजले की, काहीतरी विशेष आहे. त्यांनी मडप्पाला हाक मारून पदार्थाचे नाव विचारले. मडप्पाने हे पहिल्यांदाच केले, म्हणून त्याच्या तोंडून ‘म्हैसूर पाक’ बाहेर पडले. अशाप्रकारे घराघरात पोहोचला म्हैसूर पाक राजाला हा पदार्थ इतका आवडला की, त्याने ठरवले या पदार्थाची चव शाही स्वयंपाकघरातून बाहेर काढून सर्व लोकांसमोर आणावी. प्रथमच वाड्याला लागून एक खास दुकान उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर काही काळातच त्याची चव भारतभर पसरली. म्हैसूर पाकचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. देशाच्या विविध भागात स्थानिक साहित्य टाकून म्हैसूर पाक बनवला जातो. अनेक ठिकाणी म्हैसूर पाक गुप्त रेसिपीनेदेखील तयार केला जातो. पण पाक म्हणजे साखर, बेसन आणि तूप यांचे खास द्रावण आजही त्याचा मूळ घटक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.