मुंबई**,** 27 एप्रिल: 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. त्यामुळं दरवर्षी 1 मे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. अनेक आव्हानांचा सामना करत आज महाराष्ट्र राज्य देशातील सर्वात विकसित राज्यांत अव्वल क्रमांकावर आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, परंपरा, तंत्रज्ञान इ. सर्वच बाबतीत महाराष्ट्रानं नेत्रदिपक कामगिरी केली आहे. म्हणूनच आपण महाराष्ट्रीयन आहोत हे सांगताना आपली छाती अभिमानानं फुलून येते. साहजिकच हाच उत्साह महाराष्ट्र दिन साजरा करतानाही दिसून येते. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमांत आपल्या घरातील सदस्य किंवा लहान मुलंही भाषण करतात. साहजिकच तुमच्या घरातील लहान मुलांना भाषण लिहून देण्याचं आणि लिहून दिलेल्या भाषणाची तयारी करून घेण्याचं काम तुम्हालाच करावं लागतं. यंदा तुम्ही भाषणाची तयारी करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हवी. लहान मुलांकडून भाषणाची तयारी (Maharashtra Day Speech For Kids) करून घेताना पुढील 10 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात.
- 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं.
- त्यामुळं दरवर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.
- अनेक वर्षांच्या संघर्षातून आणि भूमिपुत्रांच्या हौतात्म्यातून मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण झालं.
- निर्मितीपासूनच महाराष्ट्रानं विकासाची कास धरली आणि सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी केली.
- महाराष्ट्राची राजधानी मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे.
- महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ किमी आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो.
- महाराष्ट्राची सीमा छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांशी तसेच दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशाशी लागून आहे.
- महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी 720 किमी तर पूर्व-पश्चिम लांबी 800 किमी एवढी आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेवर अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राला तब्बल 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
- 2011च्या जणगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,74,330 एवढी आहे.
- महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघ, 78 विधानपरिषद मतदारसंघ, 48 लोकसभा मतदारसंघ, 19 राज्यसभा मतदारसंघ
- महाराष्ट्र कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती औरंगाबाद या 6 प्रशासकीय विभागात विभागला आहे.
- कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून (उंची 1664 मी.) आहे.
- गोदावरी, कृष्णा, सावित्री, नर्मदा, पंचगंगा, कोयना ही महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत.
- आंबोली जि.सिंधुदुर्ग, कोकण येथे राज्यातील सर्वाधिक पाऊस पडतो.
- बुलढाणा जिल्हातील लोणार हे उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर जगप्रसिद्ध आहे.
- छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारे गडकिल्ले, अजिंठा-वेरुळ लेणी, कास पठार, गेट वे ऑफ इंडिया, विविध व्याघ्रप्रकल्प, अष्टविनायक, ज्योतिर्लिंगे, शक्तीपीठं इत्यादी अनेक ठिकाणं पाहण्यासारखी आहे.