मुंबई, 13 ऑगस्ट: आपल्यापैकी बहुतांश लोकं ही उजव्या हातानं (Right Hand) लिहितात. परंतु, आपल्यामध्ये असेही काही जण असतात जे डावखुरे किंवा डाव्या हातानं (Left Hand) लिखाण, जेवण आदी दैनंदिन क्रिया करतात. अशावेळी आपण नकळत आश्चर्यने त्यांच्या हालचाली न्याहाळत असतो. ज्या व्यक्ती लिखाण, जेवण आदी क्रिया उजव्या हाताने करतात, त्यांना डावखुऱ्या व्यक्तींच्या प्रत्येक कृतींचं आश्चर्य वाटतं. डाव्या हाताने लिखाण, जेवण करणाऱ्या व्यक्तींच्या या सवयीबाबत आतापर्यंत भरपूर संशोधन झालं आहे. या संशोधनात डावखुऱ्या व्यक्तींच्या मेंदुतील क्रियांबाबतही अभ्यास करण्यात आला आहे. जगातील 10 टक्के लोक हे लिखाण, जेवण आदी दैनंदिन क्रियांसाठी डाव्या हाताचा वापर करत असल्याचे डेटा सांगतो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्यासह अनेक चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी या डावखुऱ्या आहेत. डाव्या हातानं लिखाण (Writing), जेवण (Dinner) आदी कामे करणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूची (Brain) कार्यक्षमता ही उजव्या हाताने विविध कामे करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक चांगली असते, असं काही तज्ज्ञांचं मत आहे. आज इंटरनॅशनल लेफ्टहॅंडर्स डे ( International Lefthanders Day) निमित्त याबाबत तज्ज्ञांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊया.
डावखुऱ्या व्यक्तींच्या कार्यशैलीबाबत तज्ज्ञांच्या मतावर आधारित वृत्त आज तकने दिलं आहे. एम्सचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेश सागर यांनी याबाबत सांगितलं, की दैनंदिन जीवनात डाव्या हातानं बहुतांश कामं करणाऱ्या व्यक्तींबाबत आजपर्यंत मोठ्या प्रमाणात संशोधन झालं आहे. मानवी मेंदुचे दोन हेमोस्फेअर (Hemisphere) असतात. आपले दैनंदिन चलनवलन या दोन हेमोस्फेअरवर अवलंबून असतं. ज्यांचा मोटर एरिया डाव्या हेमोस्फेअरव्दारे संचालित होतो, त्यांच्या शरीराचा उजवा भाग अधिक कार्यक्षम असतो. तसेच ज्यांचा मोटर एरिया उजव्या हेमोस्फेअरव्दारे संचलित होतो, त्यांच्या शरीराचा डावा भाग अधिक कार्यक्षम असतो. त्यामुळे डाव्या हाताने कामकाज करणाऱ्या व्यक्तींमध्ये मोटर एरिया उजव्या हेमोस्फेअरव्दारे अधिक प्रमाणात संचलित होतो असं मानायला काहीच हरकत नाही.
(हे वाचा:International Lefthanders Day: डावखुऱ्यांबद्दलच्या या गोष्टी माहीत नसतील )
आयएचबीएएस दिल्लीचे वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. ओमप्रकाश म्हणाले की उजवा हात आणि डाव्या हाताने कामकाज करणाऱ्या व्यक्तींबाबत भरपूर संशोधन झाले आहे. त्यात एका अभ्यासात असं दिसून आलं की उजव्या हाताने कामकाज करणाऱ्या 95 टक्के व्यक्तींच्या क्रिया या मेंदूतील डाव्या हेमोस्फेअरकडून केल्या जातात. मेंदूचा डाव्या भागात भाषा आणि संभाषणासंबंधी केंद्र असतात (communication) तर उजव्या भागात भावना आणि इमेज प्रोसेसिंगशी(Image Processing) संबंधित केंद्र असतात. परंतु, 100 पैकी केवळ 20 टक्के डावखुऱ्या व्यक्तींमध्ये असं दिसून आलं की त्यांचा मेंदूचा उजवा भाग ॲक्टिव्ह झाल्यानंतर त्यांच्यात प्राधान्याने बुद्धिमत्ता किंवा क्रिएटिव्हिटीसंबंधी गुण दिसून येतात.
डाव्या हातानं लिखाण करणारे लोक हे जास्त क्रिएटिव्ह (Creative) असतात. त्यांना संगीत आणि कलेची उत्तम जाण असते अशी निरीक्षणं काही संशोधनांतून मांडली गेली होती. मात्र हा अभ्यास दीर्घ संशोधनानंतर अमान्य ठरवण्यात आला. त्यामुळे आता डावखुऱ्या व्यक्ती या उजव्या हाताने कामकाज करणाऱ्या व्यक्तींप्रमाणेच सामान्य असतात, असं मानलं जातं. डावखुऱ्या व्यक्तींच्या मेंदुची रचना काही अंशी वैशिष्टपूर्ण असते, असं कोणतंही तथ्य आता समर्थनीय नसल्याचे डॉ. सागर यांनी सांगितले.
डावखुऱ्या व्यक्तींचे व्हर्बल आऊटपूट उजव्या हाताने कामकाज करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत जास्त असतं, असंही सांगितलं जायचं. परंतु, हे देखील काही लोकांनी अमान्य ठरवलं. परंतु, मिरर रायटिंग आणि क्रीडा क्षेत्रात डावखुरी लोकं आपलं कर्तृत्व सिद्ध करतात. कारण जगात डावखुऱ्या व्यक्तींची संख्या तुलनेने कमी असते. त्यामुळे क्रिकेट, बॅडमिंटन सारख्या खेळांत डावखुरे खेळाडू उजव्या हाताने खेळाऱ्या खेळाडूंसोबत सराव करतात. समोर खेळणारा खेळाडू डावखुरा असेल तर विरुद्ध टिमच्या खेळाडूंना खेळताना काहीशा अडचणी जाणवतात. त्यामुळे क्रीडाक्षेत्रात डावखुरे लोक चांगलं यश मिळवत असल्याचे, डॉ. सागर यांनी सांगितले.
(हे वाचा: ‘या’ देशातल्या महिला असतात सर्वात सुंदर; पाहा भारताचा कितवा नंबर)
ज्या पालकांचे पाल्य डावखुरे असते, त्या पालकांनी पाल्यांच्या शैक्षणिक कालावधीत त्यांना मदत करणं गरजेचं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर अशा पालकांनी आपल्या पाल्याच्या शाळेत जाऊन त्याच्या वर्गात बसण्याच्या सुविधेबाबत शिक्षकांशी चर्चा केली पाहिजे. अनेकदा डाव्या हाताने लिखाणाची सवय असलेल्या विद्यार्थ्याला उजव्या हाताने लिखाण करणाऱ्या विद्यार्थ्याच्या शेजारी बसवलं जातं. यामुळे डावखुऱ्या मुलांना काहीशा अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शिक्षकांनीच याकडे लक्ष दिले पाहिजे. डाव्या हातानं लिहाणाऱ्या विद्यार्थ्याची अन्य विद्यार्थ्यांनी चेष्टा करु नये, यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं समुपदेशन केलं पाहिजे. तसेच ज्या पालकांची मुलं डावखुरी आहेत, अशा पालकांनी या मुलांच्या संगोपनाबाबतही विशेष काळजी घेतली पाहिजे. याबाबत कोणतीही अंधश्रध्दा पालकवर्गाने ठेवता कामा नये. डावखुरी मुलं ही अधिक हुशार असतात, असा काही लोकांचा समज असतो, परंतु, या मुलांकडून प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नये. अशा गोष्टींवरील संशोधने अमान्य ठरली असल्याने डावखुरी आणि उजव्या हातानं कामकाज करणारी व्यक्ती यांच्यात कोणताही भेदभाव करु नये, असा सल्ला डॉ. राजेश सागर यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle