मुंबई, 3 ऑक्टोबर : शिजवलेल्या भाज्यांपेक्षा कच्च्या भाज्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात. यामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेली एन्झाइम्स, जीवनसत्त्वं आणि खनिजं यांचं प्रमाण सर्वांत जास्त असतं. लोकांना कच्च्या भाज्या खायला आवडतात, पण त्याचवेळी त्या कीटक किंवा इतर विषाच्या संपर्कात आलेल्या असू शकतात, अशी शंकाही मनात येते. भाज्या उकळून घेतल्यानंतर त्यातील जीवनसत्त्व कमी होतात. गाजर खाण्याचे खूप फायदे आहेत, शक्यतो गाजरापासून केलेला एखादा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा किंवा सॅलेडमध्ये गाजर असतं. पण सर्वांत जास्त फायदा गाजर कच्चं किंवा वाफवून खाल्ल्याने होतो. या संदर्भात लाइव्ह हिंदूस्थानने वृत्त दिलंय.
गाजर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. महिलांसाठी गाजर विशेष फायद्याचं आहे. गाजर डोळे, त्वचा, पोट आणि रक्ताशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. गाजर खाल्ल्याने डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि दृष्टी कमकुवत होत नाही. हेल्थ एक्सपर्ट केटी ब्रासवेलने तिच्या अलीकडील एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी कच्चं गाजर खाण्याचे फायदे सांगितले आहेत. जाणून घेऊयात सविस्तर.
स्वच्छ त्वचा
गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे कच्चं गाजर खाल्ल्याने सूज कमी होऊन सेल टर्नओव्हरला प्रोत्साहन देऊन चेहऱ्यावरील मुरुम कमी होण्यास मदत होते.
हेही वाचा - Diabetes ला रोखण्याचा सोपा मार्ग; लक्षणं दिसताच त्वरित करा हे 5 उपाय
थायरॉईड संतुलन
हायपोथायरॉयडिझम असलेल्या लोकांसाठी गाजराचं सेवन करणं खूप चांगलंय. कारण ते व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत असून, थायरॉईड फंक्शनमध्ये मदत करतं.
डिटॉक्स एंडोटॉक्सिन
गाजर हे कंदमूळ आहे, त्यामध्ये अद्वितीय फायबर असतात, जे स्वतःला एंडोटॉक्सिन, बॅक्टेरिया आणि इस्ट्रोजेनशी जोडतात. दिवसातून एक कच्चं गाजर असं काही दिवस खाल्ल्यास हाय एंडोटॉक्सिन, हाय कोर्टिसॉल हे त्रास दूर होऊ शकतात. शरीरातून एंडोटॉक्सिन काढून टाकण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
हॉर्मोनल बॅलन्स
जेव्हा तुम्ही कच्चं गाजर खाता, तेव्हा त्यातील फायबर स्वतःला अतिरिक्त इस्ट्रोजेनशी बांधून घेतं आणि ते शरीरातून बाहेर काढण्यास मदत करतं. जास्त इस्ट्रोजेनमुळे मुरुम, पीएमएस, मूड स्विंग यासह विविध हॉर्मोनल प्रॉब्लेम्स येऊ शकतात, त्याला रोखण्यासाठी हे गरजेचं आहे. कच्चं गाजर आतड्यातील खराब बॅक्टेरियाची संख्या कमी करण्यास मदत करतं. आंतड्यांतील बॅक्टेरियाही सहसा हॉर्मोनल असंतुलन निर्माण करणाऱ्या मुख्य समस्यांपैकी एक आहे.
एक्स्ट्रा इस्ट्रोजेन
गाजरांमध्ये स्पेशल फायबर असतात जे शरीरातील अतिरिक्त इस्ट्रोजेन काढून टाकण्यास मदत करतात. मेटॅबॉलिझम वाढवण्यासाठी आणि लिव्हरला मदत करण्यासाठी ते उपयुक्त आहे.
हे सर्व कच्चं गाजर खाण्याचे फायदे आहेत. त्यामुळे तुम्हीही त्याचा आहारात समावेश केल्यास त्याचा तुम्हाला फायदा होईल.