**वॉशिंग्टन, 25 जानेवारी :**अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून जो बायडेन (Joe Biden) यांनी तर, उपाध्यक्ष म्हणून कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी नुकतीच एका शानदार सोहळ्यात शपथ घेतली. सगळ्या जगाचं लक्ष या शपथविधीकडे लागलं होतं. जगभरातील लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सोहळा अनुभवला. या सोहळ्यात उपस्थित असलेल्या हितचिंतक आणि समर्थकांच्या गर्दीत एका चेहऱ्यानं सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. हा चेहरा होता कर्स्टिन एमहॉफ यांचा. कमला हॅरिस यांचा नवरा डग्लस एमहॉफ (Douglas Emhoff ex wife) यांची पहिली पत्नी असलेल्या कर्स्टिन एमहॉफ (Kerstin Emhoff) आपल्या दोन मुलांसह या ऐतिहासिक प्रसंगी आपल्या कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी अभिमानानं उपस्थित होत्या. त्यांच्याबद्दल, कमला आणि त्यांच्यातील तसंच मुलांबरोबरचं त्याचं नातं या सगळ्या गोष्टींची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. डग्लस एमहॉफची यांच्या माजी पत्नी कर्स्टिन एमहाफ या फिल्म प्रोड्यूसर असून, त्या प्रिर्टीबर्ड प्रॉडक्शन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO of Prettybird) आहेत. कर्स्टिन आणि डग्लस एमहाफ यांचं 1992मध्ये लग्न झालं होतं, तर 2008 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यांना कोल आणि एला अशी दोन मुले आहेत. 2014 मध्ये डग्लस यांनी कमला हॅरिस यांच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर कमला हॅरिस या कोल आणि एला यांच्यासाठी सावत्र आई झाल्या. कमला हॅरिस आणि या मुलांमध्ये खूप चांगलं नातं असून, दोघंही प्रेमानं कमला हॅरिस यांना ‘मॉमला’ (Momala) म्हणून हाक मारतात.
2019 मध्ये एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये कमला हॅरिस म्हणाल्या होत्या की, ‘कोल आणि एला यांना बघितलं की कर्स्टिन किती असामान्य आई आहे, हे लक्षात येतं. कर्स्टिन आणि मी खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. ती आणि मी एलाला स्विमिंग आणि बास्केटबॉल गेम्स खेळण्यासाठी घेऊन जायचो. चीअरलीडर्सची जोडी म्हणून आम्ही प्रसिद्ध होतो. आम्ही कधीकधी विनोद करतो की, आमची मॉडर्न फॅमिली थोडी कार्यशील झाली आहे.’ अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि डग्लस एमहॉफ यांना पाठिंबा देण्यासाठी कर्स्टिन आपल्या मुलांसोबत उपस्थित राहिल्या होत्या. त्यांनी इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ‘Here we go!’ असे लिहिले आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवर युजर्सनी भरभरुन कमेंट्स केल्या असून, हॅरिस यांना पाठिंबा देण्याच्या कर्स्टिन यांच्या कृतीचं आणि दोघींमधल्या निखळ मैत्रीच्या नात्याचं युजर्सनी खूप कौतुक केलं आहे.
I follow Kerstin Emhoff, and it was her relationship with Kamala I noted, early on. I trust people who build relationships like this. This is how kind, civilized people forge families. https://t.co/L50lBfj1Ci
— Sigmundine (@Sigmundine2) January 23, 2021
One of my favourite parts of today is Kerstin Emhoff, Doug's ex-wife, being onstage during the ceremony & generally singing Harris' praises all over social media. A triumph for blended families & women having each other's backs
— Ellie Austin (@Ellie_Austin_) January 20, 2021
दरम्यान, कर्स्टिन यांना त्यांच्या उत्तम कामासाठी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून, त्यांच्या काही चित्रपटांना यापूर्वी ग्रॅमी अवॉर्ड (Grammy Awards), अॅमी अवॉर्ड (Emmy Awards), कान्स लायन्स (Cannes Lions) असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.