सुरेश गाडीलकर पहिल्यांदाच बाईकवर पुण्यात आला होता. त्याला अप्पा बळवंत चौक म्हणजे एबीसीतून पुस्तकं घ्यायची होती. पुण्यात पार्कींगसाठी सम-विषम असा नियम आहे. म्हणजे सम तारखेला उदा. 2,4 एका बाजूला तर विषय तारखेला उदा.1,3 दुसऱ्या बाजूला. पहिल्यांदाच पुण्यात आल्याने सुरेशला हा नियम माहीत नव्हता. त्यामुळे ज्या बाजूला एकही वाहन नव्हतं तिथं त्याने गाडी पार्क केली. गाडीला तत्काळ पार्क करण्यास जागा मिळाल्याने तो मनोमन खुश होता. पण, त्याचा हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. तो पुस्तकं घेण्यासाठी दुकानात गेला. परत आल्यानंतर पाहिलं तर गाडी गायब! त्याला घामाच फुटला. गाडी चोरीला गेली असच त्याला सुरुवातीला वाटलं. त्यानं तिथं असलेल्या एका दुकानदाराला विचारल्यावर समजलं की पोलिसांनी गाडी उचलून नेली आहे. सुरेशला काय करावं काहीच सुचेना. सुदैवाने त्याचा चुलतभाऊ पोलीसात असल्याने त्याने त्याला फोन केला. मात्र, प्रत्येकालाच अशी मदत मिळेलं असं नाही. त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी माहीत असणे फार आवश्यक आहे. कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज
#कायद्याचंबोला
. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर
Rahul.Punde@nw18.com
या मेलवर आम्हाला सांगा.
या लेखात आपण, जेव्हा पोलीस तुमचे वाहन पार्किंग नसलेल्या क्षेत्रातून उचलून नते तेव्हा काय करावे. वेगवेगळ्या कायद्यांतर्गत विविध कायदेशीर तरतुदी काय आहेत? टोइंगचे नियम भारतात सर्वसमावेशक नाहीत, वेगवेगळ्या शहरांच्या नियमांमध्ये काही फरक आहे. त्याविषयी जाणून घेणार आहोत. वाहन पार्किंगचे नियम रस्ते नियमावली 1989 च्या नियम 15 नुसार वाहन अशा प्रकारे उभे केले पाहिजे की त्यामुळे इतरांना कोणत्याही प्रकारचा धोका किंवा गैरसोय होणार नाही. या कायद्याच्या नियम 15 (2) मध्ये असे नमूद केले आहे की चालकाने त्याचे वाहन कसे पार्क करू नये रस्ता क्रॉसिंगवर किंवा त्याच्या जवळ, वळणावर, टेकडीच्या माथ्यावर किंवा फूटपाथवर. ट्रॅफिक लाइट किंवा पादचारी क्रॉसिंग जवळ मुख्य रस्त्यावर किंवा वेगवान वाहतूक असलेल्या रस्त्यावर दुसर्या पार्क केलेल्या वाहनाच्या विरुद्ध किंवा इतर वाहनास अडथळा येईल असे बसस्थानकाजवळ, शाळा किंवा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा ट्रॅफिक सिग्नल वाहन टोइंग करण्याचे नियम रोड रेग्युलेशन, 1989 च्या नियम 15 (2) मध्ये नमूद केलेल्या अशा ठिकाणी तुम्ही तुमचे वाहन पार्क केले असल्यास, वाहतूक पोलीस तुमचे वाहन टो करू शकतात. मात्र, वाहन टोईंग करण्याबाबत काही अटी आणि नियम आहेत जे नियम 20 ऑफ रोड रेग्युलेशन, 1989 मध्ये दिलेले आहेत. हे नियम केवळ वाहन टोईंग करताना पोलिसांसाठी नाहीत, हे नियम सामान्य नियम आहेत ज्यांचे पालन कोणतेही वाहन टोइंग करताना केले पाहिजे. नॉन-पार्किंग झोनमधून जेव्हा पोलीस वाहन टोइंग करतात तेव्हा त्यांना काही प्रोसिजर फोलो करावी लागते. जेव्हा ट्रॅफिक पोलिसांना एखादे वाहन नॉन-पार्किंग झोनमध्ये किंवा अशा ठिकाणी उभे केलेले आढळते ज्यामुळे इतरांना धोका किंवा गैरसोय होत असेल तेव्हा ते खालील प्रक्रियेचे पालन करतात. अनेक शहरांच्या टोइंग नियमांनुसार जेव्हा असे वाहन दिसते तेव्हा पोलिसांनी त्याचा क्रमांक, रंग, वाहनाचा प्रकार इत्यादी तपशील लाऊडस्पीकरवर जाहीर करावेत. घोषणेला प्रतिसाद न मिळाल्यास पोलिसांनी वाहनाचे फोटो काढावे. फोटो काढल्यानंतर पोलीस पंचनामा करतील. त्यांनी टो केलेले वाहन कोठे जमा केले आहे, याचा तपशील देखील लिहावा लागेल. या नियमांचा उल्लेख कोणत्याही कायद्यात कोठेही केलेला नाही. मात्र, विविध राज्य सरकारे आणि शहर वाहतूक पोलिसांचे पार्किंग आणि अशा वाहनांना टोइंग करण्याबाबत त्यांचे स्वतःचे नियम आहेत. वाचा - #कायद्याचंबोला: गाडीची चावी काढणं दूरच, ट्रॅफीक पोलीस पावतीही फाडू शकत नाहीत; तुम्हालाही आहेत हे अधिकार तुमचे वाहन पोलिसांनी टो केले तर तुम्ही काय करावे? तुमचे वाहन पोलिसांनी किंवा इतर कोणी टो केले आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा किंवा पोलिस हेल्पलाइन नंबरवर फोनवर संपर्क साधू शकता. याआधी तुम्ही तुमचे वाहन जिथे पार्क केले होते त्या रस्त्यावर काही लिहिलेले आहे का ते तपासावे. तुम्हाला रस्त्यावर काही लिहिलेले आढळल्यास दिलेल्या तपशीलांवर पोलिसांशी संपर्क साधा. तसेच तुम्हाला अशा ठिकाणाजवळ ट्रॅफिक पोलीस आढळले तर तुम्ही त्याला तुमच्या वाहनाबद्दल विचारू शकता. तुमचे वाहन नॉन-पार्किंग झोनमधून आणले गेले आहे, ज्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुम्ही कायद्याचे पालन केले नाही आणि त्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. या प्रकरणात तुम्हाला नियमानुसार चलन भरावे लागेल. हे वाहनाचे वजन आणि वाहन किती दिवसांसाठी टो केले होते इत्यादी अनेक घटकांवर आधारित असेल. मुंबई मुंबई वाहतूक पोलीस वेळोवेळी वाहन पार्किंग आणि टोइंगबाबत विविध नियम जारी करतात. ते त्यांच्या वेबसाइटवरही असे नियम प्रकाशित करतात. वर नमूद केल्याप्रमाणे वाहन टोइंग करण्यापूर्वी ते अशाच प्रकारची प्रक्रिया अवलंबतात. 2017 मध्ये सहआयुक्त (वाहतूक) यांनी नवीन नियम लागू केले, त्यानुसार टोइंग करण्यापूर्वी लाऊडस्पीकरवर घोषणा करणे बंधनकारक आहे. तसेच या नियमांनुसार टोईंग करताना वाहन मालक आल्यास वाहन सोडले जाईल आणि त्याला फक्त नॉन पार्किंग झोनमध्ये पार्किंगसाठी दंड भरावा लागेल, टोइंग शुल्कासाठी नाही. किती दंड? सध्या नो पार्कींगमध्ये वाहन असल्यास 500 रुपये दंड आहे. वाहन टो केले असेल तर वाहनाच्या प्रकारानुसार टोईंगचे देखील पैसे द्यावे लागतील. (कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) (लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)