मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

#कायद्याचंबोला: 'आदिपुरुष'वर बंदी येणार? धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, काय सांगतो कायदा?

#कायद्याचंबोला: 'आदिपुरुष'वर बंदी येणार? धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, काय सांगतो कायदा?

'आदिपुरुष'वर बंदी येणार? धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, काय सांगतो कायदा?

'आदिपुरुष'वर बंदी येणार? धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, काय सांगतो कायदा?

पौराणिक कथा रामायणावर आधारीत चित्रपट 'आदिपुरुष' सध्या वादात सापडला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बाहुबली फेम प्रभास आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'आदिपुरुष' या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला. पण, रामायण या पौराणिक कथेवर आधारित हा बिगबजेट चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात सापडला आहे. टीझर पाहून लोक सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाला ट्रोल करत आहेत. या सिनेमातील रावणाच्या वेषभूषेवर प्रेक्षक आक्षेप नोंदवत आहे. अशातच आता हनुमानाच्या वेषभूषेमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप एका खासदाराने केला आहे. परिणामी या चित्रपटाच्या प्रदर्शनात मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कायदा काय सांगतो? धार्मिक भावना दुखावणे म्हणजे नेमकं काय? चित्रपटावर प्रदर्शित करण्याची बंदी येऊ शकते का?

Kaydyach bola Legal

कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.


आदिपुरुष चित्रपटाबद्दल काय आहे वाद?

ओम राऊत दिग्दर्शित चित्रपटात प्रभास भगवान राम, सैफ अली खान रावणाच्या तर क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. रविवारी या चित्रपटाला पहिला टीझर रिलीज करण्यात आला. यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, मी आदिपुरुषचा टीझर पाहिला. त्यात आक्षेपार्ह दृश्ये आहेत. या दाखवण्यात आलेले 'हिंदू देवतांचे कपडे आणि लूक' स्वीकारार्ह नाहीत. ते म्हणाले, “हनुमानजींना चामड्याची कपडे घातलेलं दाखवण्यात आलंय, धर्मग्रंथात देवतेच्या वेशभूषेचे वर्णन वेगळं आहे. धार्मिक भावना दुखावणारी ही दृश्ये आहेत. मी ओम राऊत यांना पत्र लिहित आहे की, अशी सर्व दृश्ये चित्रपटातून काढून टाकावीत. अन्यथा कायदेशीर कारवाईचा विचार करू.

भाजप, हिंदू महासभेचाही विरोध

दुसरीकडे भाजप आणि हिंदू महासभेनी सैफ अली खानच्या रावण अवतारावर संताप व्यक्त केला आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी चित्रपटातील सैफच्या लूकबद्दल बोलताना सांगितले की, भगवान शिवाच्या सर्वात मोठ्या भक्त लंकापती रावणाला खिलजी, चंगेज खान किंवा औरंगजेबसारखा दाखवण्यात आलं आहे. कपाळावर टिळा नाही की त्रिपुंडही नाही. आमच्या पौराणिक पात्रांशी असं खेळणे सहन करणार नाही.

हिंदू महासभेपासून ते यूपीतील साधू-संतांनी आदिपुरुष या चित्रपटाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनीही याला संस्कृतीवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीला सनातन धर्मावर हल्ला करण्याची किंवा बदलण्याची परवानगी नाही. अनादी काळापासून अशाच प्रकारे राहून आपण भारतीय संस्कृतीचा झेंडा जगभर फडकवत आहोत. आपल्या पूर्वजांनी वसुधैव कुटुंबकमचा नारा दिला होता.

वाचा - #कायद्याचंबोला: ST महिला कंडक्टरच्या एका Reels ने निलंबन! कारवाई योग्य आहे का? कायदेशीर उत्तर

या दृष्यावर आक्षेप

रामाची मिशी अन् चप्पल

लोक म्हणतात की रामला मिशी नव्हती, मग या चित्रपटात ती का दाखवली? एका सीनमध्ये राम चप्पल घातलेला दिसतो, त्यामुळे लोकांनी यावर प्रश्न उपस्थित केला असून, राम चप्पल नव्हे तर लाकडी पादुका घालत असल्याचे सांगतायेत.

हनुमानाला चामडी बेल्ट

या चित्रपटात देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसत आहेत. अंगावरील लेदर बेल्टमुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. सोशल मीडियावर लोक त्याला सत्य सांगत असून सर्वात कमकुवत हनुमान म्हणत आहेत.

सीतेच्या साडीचा रंग

त्याचबरोबर सीता बनलेल्या क्रितीची साडी देखील लोकांना आवडली नाही. टीझरमध्ये ती फिकट जांभळ्या रंगाची साडी, मेकअप आणि ज्वेलरीमध्ये दिसत आहे. हे पाहून लोकांनी सांगितलं की सीता केसरी रंगाची वस्त्रे परिधान करायची.

कायदा काय सांगतो?

भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 295A अन्वये, देशातील कोणत्याही वर्गाच्या नागरिकांच्या धार्मिक भावना जाणूनबुजून दुखावण्याचा हेतू बाळगणे आणि दुर्भावनापूर्ण हेतूने त्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न. हा अपमान बोलल्या गेलेल्या शब्दांद्वारे(Spoken words)  किंवा लिखित शब्दांद्वारे (written words) किंवा चिन्हांद्वारे (signs) किंवा दृश्यमान प्रतिनिधित्वांद्वारे (visible representations) केलेला असू शकतो. असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला एक वर्षाचा कारावास जो तीन वर्षांपर्यंत वाढू शकतो किंवा दंड किंवा एकाच वेळी दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

कलम 295A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आवश्यक गोष्टी

या कलमाचा मुख्य भाग/सामग्री हा भारतातील नागरिकांच्या कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावना किंवा धर्माचा अपमान करणे किंवा अपमान करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, या कलमांतर्गत गुन्हा करण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया.

आरोपीने भारतातील कोणत्याही वर्गाच्या व्यक्तीच्या धर्माचा किंवा धार्मिक भावनांचा अपमान किंवा अपमान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

हा अपमान अशा वर्गाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा जाणीवपूर्वक आणि दुर्भावनापूर्ण हेतूने केलेला असावा.

ही कृती बोलून किंवा लिखित शब्दांनी किंवा चिन्हांद्वारे किंवा दृश्याद्वारे किंवा अन्य गोष्टींद्वारे केली गेली असावी.

..तर दृश्य हटवावी लागतील.

अनेकांनी चित्रपटाविरोधात कारवाईची भाषा केली आहे. परिणामी तक्रार दाखल झाल्यास किंवा ती होऊ नये म्हणून चित्रपटातील आक्षेपार्ह दृष्य हटवण्याशिवाय निर्मात्यांकडे पर्याय दिसत नाही. यापूर्वीही धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरुन अनेक बॉलीवूड चित्रपट वादात सापडले होते. बाजीराव मस्तानीपासून पद्मावतपर्यंत अनेक चित्रपटातील दृश्य हटवण्यात आली आहेत. त्यामुळे आता दिग्दर्शक ओम राऊत काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.(कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)

First published:

Tags: Hindu, Legal, Religion