नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर: हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. सर्व पौर्णिमांमध्ये ही पौर्णिमा सर्वश्रेष्ठ मानली जाते. ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. याच दिवशी शंकरानं त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता, असं मानलं जातं. तेव्हापासून शंकराला त्रिपुरारी म्हटलं जातं. त्रिपुरासुर राक्षसाचा वध झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ देवांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली होती. या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमा 19 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. ही पौर्णिमा कार्तिक महिन्यात येते. कार्तिक पौर्णिमेचा उत्सव पाच दिवसांचा असतो. प्रबोधिनी एकादशीला हा उत्सव सुरू होतो आणि पौर्णिमेला त्याची समाप्ती होते.
पौर्णिमा तिथी प्रारंभ : 18 नोव्हेंबर (गुरुवार) दुपारी 11 वाजून 55 मिनिटांपासून
पौर्णिमा तिथी समाप्त : 19 नोव्हेंबर (शुक्रवार) दुपारी 02 वाजून 25 मिनिटांपर्यंत
कार्तिक पौर्णिमेचा हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. देवी-देवतांना प्रसन्न करण्याचा हा दिवस आहे असं मानलं जातं. त्यामुळेच लोक या दिवशी पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगा नदीत डुबकी मारून आणि दान-दक्षिणा देऊन पुण्य कमावतात. या दिवशी कार्तिक स्नान केल्यामुळे आणि विष्णूची पूजा केल्यामुळे भक्तांचं भाग्य उजळतं अशी श्रद्धा आहे. त्याचबरोबर या दिवशी दानधर्म आणि दीपदानही केलं पाहिजे.
धार्मिक कार्यांसाठी कार्तिक पौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. त्यामुळेच या दिवशी अनेक अनुष्ठानं आणि सणांची समाप्ती होते. या दिवशी शुभ कार्य केलं गेलं तर घरात आनंद, सुख-समृद्धी येते असं मानलं जातं. या दिवशी तुपाचं दान केल्यानं संपत्ती वाढते आणि घरातलं दारिद्र्य, दु:ख दूर होतं. कार्तिक पौर्णिमेचं व्रत करणाऱ्यांवर शंकराची मोठी कृपा होते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी नदीमध्ये स्नान करणं आणि दीपदान करणं अत्यंत शुभ आणि पुण्यप्राप्तीचं मानलं जातं. त्यामुळे नदीमध्ये स्नान करणं आणि जप करण्यालाही महत्त्व आहे.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर स्नान करावं. शक्य असेल तर पवित्र नदीमध्ये स्नानाचा संकल्प करावा. त्यानंतर तुपाचा दिवा लावून लक्ष्मीनारायणाची विधिवत पूजा करावी. या दिवशी सत्यनारायणाची पूजा केल्यानं विष्णूचा आशीर्वाद मिळतो. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी विष्णूला खिरीचा नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी लक्ष्मीनारायणाची आरती करून तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. या वेळच्या पूजेमध्ये तुळशीपत्राचा अवश्य समावेश करावा. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घरातही दिवे, पणत्या लावाव्यात. शक्य असल्यास गरिबांना दान द्यावं आणि भुकेल्यांना जेवू घालावं. चंद्रोदय झाल्यानंतर अर्घ्य द्यावं आणि व्रताचं पारायण करावं.
याच दिवशी पृथ्वीवर तुळशीचं आगमन झालं होतं असं मानलं जातं. त्यामुळेच या दिवशी विष्णूला तुळशीपत्र अर्पण केल्यानं एरवीपेक्षा जास्त पुण्य मिळतं असं मानलं जातं. तसंच शिवलिंगावर गंगाजल, मध आणि निरश्या (कच्च्या) दुधाचा अभिषेक केल्यानं शंकर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं. या दिवशी संध्याकाळी वाहत्या पाण्यात दीपदान केल्यानं लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धी येते. कार्तिक पौर्णिमेला तुळशीजवळ, वाहत्या पाण्यात, घराचा मुख्य दरवाजा आणि देवघरात पणत्या, दिवे लावल्यामुळे आपले पूर्वजही प्रसन्न होतात. या दीपदानामुळे, दानधर्मामुळे घरात सुखसमृद्धी येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diwali, Diwali 2021