त्याच्या जिभेला पोटाचं मांस; डॉक्टरांनी केला अनोखा प्रयोग

त्याच्या जिभेला पोटाचं मांस; डॉक्टरांनी केला अनोखा प्रयोग

सर्वसाधारणपणे बाह्य त्वचेसह केल्या जाणाऱ्या रिकन्स्ट्रक्शन शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना अत्यंत विचित्र वाटतं. कारण बाह्य त्वचेमध्ये हेअर फॉलिकल्स असल्यामुळे त्यातून सतत केस वाढत राहतात.

  • Share this:

बंगळुरू, 02 एप्रिल : 53 वर्षांचा राजेश (नाव बदललेलं आहे) बेंगळुरूमध्ये (Bengaluru) रिक्षा चालवायचा. दोन महिन्यांपूर्वी त्याच्या जिभेला अल्सर (Ulcer) झाल्याचं निष्पन्न झालं. त्याने कधीच तंबाखू खाल्ला नव्हता. त्यामुळे तोंडातला अल्सर हे काही गंभीर विकाराचं लक्षण असेल, असं त्याच्या मनातही आलं नव्हतं. त्यामुळे त्याने सुरुवातीला माहिती असलेले घरगुती उपाय केले; पण तरीही दुखण्यात काहीही फरक पडला नाही. अखेर तो डॉक्टरांकडे गेला.

राजेशला डॉक्टरांनी सीटी स्कॅन आणि अल्सरची बायोप्सी करण्याचा सल्ला दिला. याच्या रिपोर्टमधून राजेशला कॅन्सर (Cancer) असल्याचं निदान झालं. राजेशच्या अर्ध्या जिभेवर कॅन्सर पसरून मानेच्या लिम्फ नोडपर्यंत त्याची वाढ झाली होती. कॅन्सर अधिक पसरू नये म्हणून राजेशवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावर रेडिकल सर्जरी (Radical Surgery) करण्यात आली. त्यात जिभेच्या उजव्या बाजूचा तीन-चतुर्थांश भाग आणि मानेच्या दोन्ही बाजूला असलेले लिम्फ नोड्स काढून टाकण्यात आले आणि त्यानंतर जिभेचा काढून टाकलेला भाग परत मिळवण्यासाठी त्याच्या जिभेवर 05 मार्च 2021 रोजी रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी (Reconstructive Surgery) करण्यात आली. पण यासाठी डॉक्टरांनी वेगळा प्रयोग केला.

ज्या रुग्णालयात राजेशवर शस्त्रक्रिया झाली त्या  ट्रस्टवेल हॉस्पिटलमधले कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. सतीश सी. (Dr. Satish C.) यांनी सांगितलं, "साधारणपणे अशा परिस्थितीत रुग्णाच्या शरीराच्या बाह्य भागातलं मांस त्वचेसह वापरून नवी जीभ तयार करून ती कापलेल्या जिभेला शिवण्यात येते. पण राजेशच्या बाबतीत आम्ही एक वेगळाच, अनोखा प्रयोग केला"

हे वाचा - VIDEO - पिल्लाचा एक डोळा उघडेना म्हणून आईची धडपड; मांजरीने थेट गाठलं हॉस्पिटल

जीभ (Tongue) हा मानवी शरीरातला सर्वांत कणखर स्नायू (Strongest Muscle) आहे. खाणं आणि बोलणं या क्रियांमध्ये जिभेचं सर्वांत मोठं कार्य असतं. स्पष्टपणे बोलता येण्यासाठी जिभेवर ओलावा कायम राहणं अत्यावश्यक असतं. सर्वसाधारणपणे बाह्य त्वचेसह केल्या जाणाऱ्या रिकन्स्ट्रक्शन शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना अत्यंत विचित्र वाटतं. कारण बाह्य त्वचेमध्ये हेअर फॉलिकल्स असल्यामुळे त्यातून सतत केस वाढत राहतात आणि त्यामुळे जिभेच्या बाह्य भागावर केस येत राहतात. शिवाय जिभेच्या तुलनेत बाह्य त्वचा कोरडी असते. ती त्वचा जिभेला शिवलेली असल्यामुळे अशा रुग्णांना सतत तहान लागत राहते. हे टाळण्यासाठी राजेशच्या शस्त्रक्रियेमध्ये त्याच्या पोटाच्या भागातलं मांस काढून नवी जीभ तयार करण्यात आली. तसंच पोटाच्या त्वचेचा भाग उलट करून तो जिभेचा बाह्य भाग म्हणून वापरण्यात आला, अशी माहिती डॉ. सतीश सी. यांनी दिली.

हे वाचा - ही तरुण डॉक्टर कोरोनाकाळातही 10 रुपयात करते रुग्णांवर उपचार

कॅन्सर झालेला भाग काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेनंतर राजेशच्या जिभेचा केवळ 25 टक्के भागच शिल्लक होता. तिथे ही नवी जीभ शस्त्रक्रियेने जोडण्यात आली. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आठ ते दहा तास चालली. ती यशस्वीपणे पार पडली. भूल देणारे डॉक्टर्स आणि सर्जरीनंतर अतिदक्षता विभागातले डॉक्टर्स यांनी घेतलेल्या काळजीमुळे राजेश लवकर बरा झाला. नव्याने जोडण्यात आलेली जीभ जवळपास मूळ जिभेसारखीच दिसत असून, तिच्यावर ओलावाही राहतो आहे. त्यामुळे राजेशला आता नीटपणे जेवता आणि बोलता येऊ लागलं आहे.

हे वाचा - Explainer : माणूसही सापासारखा विषारी होऊ शकतो का?

कर्नाटकात (Karnataka) करण्यात आलेली ही अशा प्रकारची पहिलीच सर्जरी आहे. त्यामुळे अशा अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे. हॉस्पिटलने या शस्त्रक्रियेसाठी शुल्कातही सवलत दिली. त्यामुळे राजेशने त्यांचे आभार मानले आहेत.

First published: April 2, 2021, 7:40 AM IST

ताज्या बातम्या