कानपूर,03 फेब्रुवारी : : उत्तर प्रदेशातल्या कानपूर जिल्ह्याला यंदाची थंडी बरीच प्राणघातक ठरली आहे. कानपूरमध्ये हार्ट अॅटॅकने सर्वाधिक मृत्यू झाले असून, वातावरणात बदल झाल्यावर विषाणूजन्य संसर्गही पसरले आहेत. त्यामुळे कानपूरमधल्या नागरिकांना सर्दी, खोकला, ताप अशी आजारपणं येत आहेत. व्हायरल फीव्हर किंवा कोणत्याही प्रकारचे विषाणूजन्य संसर्ग झाले असतील, तेव्हा जास्त ताण घेता कामा नये, असं मत डॉक्टर्सनी व्यक्त केलं आहे. अन्यथा हार्ट अॅटॅक येऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
कानपुरात सध्या अनेक प्रकारचे विषाणूजन्य संसर्ग पसरले आहेत. त्या संदर्भात बोलताना कानपूरमधले कार्डिऑलॉजिस्ट डॉक्टर अभिनित गुप्ता यांनी सांगितलं, की व्हायरल संसर्ग झालेला असताना शरीरात बेड एलिमेंट जास्त प्रभावित होतात. त्यामुळे जास्त ताण घेतला किंवा जास्त व्यायाम केला, तर हार्ट अॅटॅक येण्याचा धोका असतो. त्यामुळे विषाणूजन्य संसर्ग झाला असेल, तर त्या वेळी जास्त व्यायाम करणं योग्य नाही. अशा संसर्गाच्या काळात शरीराला शक्य तितका आराम देणं गरजेचं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा - सिझेरियन प्रसूतींची संख्या का वाढतेय? जाणून घ्या नेमकी कारणं व ते रोखण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
डॉ. गुप्ता यांनी सांगितलं, की गेल्या एक-दोन वर्षांपासून 30 ते 50 वर्षं वयोगटातल्या व्यक्तींना हार्ट अॅटॅक आल्याची अधिकाधिक प्रकरणं समोर येत आहेत. असंतुलित आहार आणि ताण ही त्यामागची प्रमुख कारणं आहेत. सध्याच्या काळातले तरुण खाण्यापिण्यावर जास्त लक्ष देत नाहीत. तसंच त्यांना ताणही खूप असतो. छोट्या-मोठ्या समस्यांकडे ते दुर्लक्ष करतात. त्याशिवाय मद्यपान, मोठ्या प्रमाणावर सिगारेट्स ओढणं या वाईट सवयीही हार्ट अॅटॅक येण्याच्या कारणांत भर पाडतात. अनेक जण रक्तातली साखर, ब्लड प्रेशर या बाबी वेळच्या वेळी तपासून घेत नाहीत. त्यामुळे थंडीच्या दिवसांत या सगळ्या गोष्टी अधिक धोकादायक रूप धारण करतात आणि अनेकांना हार्ट अॅटॅक येऊ शकतो.
बचाव कसा करायचा?
हार्ट अॅटॅकपासून बचाव करण्यासाठी संतुलित आहार अर्थात बॅलन्स्ड डाएट हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. ब्लड प्रेशर, डायबेटीस किंवा अन्य कोणता गंभीर विकार असल्यास वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तसंच, डॉक्टर्सनी दिलेली औषधंही वेळेवर घेत राहणं अत्यावश्यक आहे. थंडीच्या दिवसांत ब्लड प्रेशर वाढत असेल, तर त्यावरची औषधं आवर्जून घेतली पाहिजेत. छातीत कोणत्याही प्रकारे दुखलं किंवा हृदयाशी संबंधित काही समस्या उद्भवली, तर तातडीने हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. कारण हार्ट अॅटॅक या विषयात वेळ ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते. त्या संदर्भात योग्य वेळी माहिती मिळाली, तर रुग्णाचा जीव वाचू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips