नवी दिल्ली, 09 एप्रिल : देशात सध्या दोन कोरोना लशी (Corona vaccine) दिल्या जात आहेत. त्यामध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लशीचा समावेश आहे. या दोन्ही लशींचे (Covid 19 vaccine) दोन डोस घ्यावे लागतात. पण आता लवकरच भारतात फक्त एकच डोस पुरेसा असेल अशी कोरोना लसही उपलब्ध होणार आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या (Johnson & Johnson) कोरोना लशीला (Johnson & Johnson Corona vaccine) भारतात परवानगी देण्यात आली आहे.
अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या कोरोना लशीचं भारतात ट्रायल होणार आहे. क्लिनिकल ट्रायलसाठी DCGI ने कंपनीला परवानगी दिली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लशीची सुरक्षितता आणि प्रभाव तपासूनच या लशीचं भारतात ट्रायल घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
भारतात या लशीचं ट्रायल यशस्वी झालं तर भारतातील लसीकरणाला आणखी वेग येईल. देशातील लसीकरण मोहिमेत तिसऱ्या लशीचा समावेश होईल आणि मग जास्तीत जास्त लोकांना लस देता येईल.
हे वाचा - कोरोनाची लस घेणाऱ्यांसाठी अजब ऑफर! मिळवा मोफत जेवण, दारू आणि बरंच काही
भारतात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव देशात कोरोना लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. सध्या देशात 45 वर्षांपुढील सर्वांना कोरोना लस देण्यात येत आहे. देशात साडेपाच दिवस पुरेल इतकाच कोरोना लशीचा साठा शिल्लक असल्याचं म्हटलं आहे. एप्रिल महिन्यात दररोज सरासरी 36 लाख लस वापरल्या जात आहेत. सध्या भारतात सुमारे 2 कोटी लशींचा साठा उपलब्ध आहे. म्हणजेच, पुढील साडेपाच दिवस या लसी पुरतील. टाइम्स ऑफ इंडियाने, आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीचा हवाला देत हे वृत्त दिलं आहे.
हे वाचा - कोरोना जोमात लसीकरण मात्र कोमात! तुटवड्यामुळे मुंबईसह अनेक भागात केंद्रच बंद
असं असलं तरी पुढील आठवड्यात राज्यांमध्ये कोरोना लशीचे डोस पाठवले जाणार आहेत. अनेक राज्यांनी केंद्राकडे कोरोना लशीची मागणी केली आहे. आकडेवारीनुसार, पुढील आठवड्यात राज्यांना 2 कोटी 45 लाख लशीच्या मात्रा मिळतील. आरोग्य मंत्रालयाच्या मते, राज्यांशी सल्लामसलत केल्यानंतर दर चार ते आठ दिवसांनी लशीचा नवीन साठा पाठवला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.