नवी दिल्ली, 21 डिसेंबर : भौतिक, सामाजिक गरजांप्रमाणेच शरीरसंबंध हीसुद्धा एक महत्त्वाची गरज आहे. आज समाजाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बऱ्याच अंशी बदलतो आहे; मात्र तरीही अद्याप लग्न आणि शरीरसंबंध या बाबी परस्परांशी निगडित आहेत. लग्नाआधी शरीरसंबंध ठेवणं योग्य ठरतं की अयोग्य हे प्रत्येक व्यक्तीची सामाजिक परिस्थिती, त्यांचे विचार व गरज यावर अवलंबून असतं; मात्र अशा पद्धतीने लग्नाआधी शरीर संबंध ठेवल्याचे फायदे-तोटे जाणून घेतले, तर विचारांमध्ये स्पष्टता नक्कीच येऊ शकते. भारतीय समाजव्यवस्था व कुटुंबव्यवस्था विवाहसंस्काराला मान्यता देते. आपल्या देशात लग्न ही मुलगा व मुलगी यांच्या सहजीवनाची सुरुवात समजली जाते. त्यानंतरच अधिकृतपणे कुटुंब विस्ताराबाबत विचार केला जातो. त्या दृष्टीने भारतीय कायद्यात मुला-मुलींच्या लग्नासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. याचा उद्देश, त्यांच्यात शारीरिक व मानसिक परिपक्वता यावी असा आहे. लग्नाबाबत ही वयोमर्यादा असली, तरी शरीर संबंधांबाबत तसं नाही. त्यामुळे विवाहाआधीच शरीर संबंध ठेवून जोडीदार योग्य आहे का हेही काही जण पाहतात. सध्याची पिढी नको ती ओझी उचलणारी नाही. या पिढीला जे हवंय त्याबाबत त्यांच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. त्यामुळेच शरीरसंबंध आणि लग्न याबाबतही त्यांच्या गरजा निश्चित आहेत. त्यामुळे लग्नाआधी शरीर संबंध ठेवून आपलं जुळतंय का हे पाहिलं जातं, नसेल तर दूरही केलं जातं. काहींच्या बाबतीत मात्र लग्नाआधी शरीरसंबंध ही अजूनही न पटणारी गोष्ट आहे. नातं उलगडण्याच्या प्रक्रियेतला एक अलवार टप्पा असं त्याकडे पाहिलं जातं. त्यामुळेच लग्नानंतरच शरीरसंबंध ठेवले जावेत, असं त्यांना वाटतं. प्रत्येक गोष्टीचे काही फायदे, तर काही तोटे असतात. लग्नाआधी शरीरसंबंध ठेवणं काही वेळा योग्य तर काही वेळा घातक ठरू शकतं. म्हणूनच त्याचे परिणाम लक्षात घेतले, तर विचारांमध्ये स्पष्टता येईल. काही फायदे - लग्नाआधीच जोडीदारासोबतचे शरीरसंबंध चांगले असतील का हे जाणून घेणं काहींना गरजेचं वाटतं. लग्नानंतरच्या वादांमध्ये बरेचदा लैंगिक सुख हे महत्त्वाचं कारण असतं. लग्न झाल्यानंतर गोष्टी बदलता येत नाहीत. त्यामुळे लग्नाआधीच जोडीदार तसं सुख देण्यास योग्य आहे का हे तपासण्याची आवश्यकता त्यांना वाटते. - सेक्स म्हणजेच शरीरसंबंधांमुळे ताण हलका होतो असं म्हणतात. म्हणूनच ही गरज म्हटली जाते. बदलत्या जीवनशैलीत ताण व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा ठरत असताना या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नातेसंबंधांमधल्या वादविवादांमधून निर्माण होणारा तणाव कमी करण्यासाठी लग्नाआधीच्या शरीरसंबंधांची मदत होते, असं काहींना वाटतं. - एकांतात असताना काय हवंय हे जाणून घेणं नेहमी चांगलं असतं. त्यामुळे जोडीदारासोबत शरीरसंबंध ठेवल्यामुळे मोकळं व्हायला होतं. हरवल्यासारखं वागत नाही. आत्मविश्वासही वाढतो. - स्वतःच्या व जोडीदाराच्या लैंगिक समस्या ओळखण्यातही लग्नाआधीच्या शरीरसंबंधांचा फायदा होऊ शकतो. अशा समस्या सोडवण्यासाठी त्यानंतरच्या काळात प्रयत्न करता येतात. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये का लावले जातात टाके, ते किती दिवसांत ठीक होतात? काही तोटे - लग्नाआधी शरीरसंबंध ठेवण्याचा सर्वांत मोठा तोटा म्हणजे त्यातला रस कमी होणं हा ठरू शकतो. एका क्षणी दोघांनाही त्यात नावीन्य उरत नाही व त्यामुळे त्या क्षणाचा विरस होऊ शकतो. - यातला आणखी एक धोका गरोदरपणाचा असतो. गर्भनिरोधक साधन वापरलं, तरी त्याच्या सुरक्षिततेची हमी कोणीच देऊ शकत नाही. काही वेळा अपघातानं दिवस राहू शकतात. भविष्याच्या दृष्टीनं ते अडचणीचं ठरू शकतं. - लैंगिक आजारांचा धोकाही यात असतो. एकापेक्षा अधिक व्यक्तींसोबत शरीरसंबंध ठेवले असतील, तर एखाद्या वेळी गंभीर आजार होण्याचा धोका असतो. हे जिवावर बेतू शकतं. - काहींना लग्नाआधी शरीरसंबंध ठेवल्याबाबत अपराधी वाटतं. समोरच्या व्यक्तीमध्ये भावनिकदृष्ट्या गुंतणं हे त्याचं एक कारण असतं, तर काही वेळा श्रद्धा, समज यांच्यामुळे ते घडतं. विचारांमध्ये मोकळेपणा असेल, तर लग्न व शरीरसंबंधांबाबतच्या समजुती झुगारता येऊ शकतात; मात्र त्याबद्दल स्वतःचे विचार निश्चित हवेत, हे मात्र 100 टक्के खरं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.