खास Vitamin घेणाऱ्या महिलांना कोरोनाचा धोका कमी आहे?

खास Vitamin घेणाऱ्या महिलांना कोरोनाचा धोका कमी आहे?

कोरोना महासाथीच्या सुरुवातीच्या काळात व्हिटॅमिन्सची (Vitamins) शिफारस केली गेली.

  • Share this:

मुंबई, 22 एप्रिल : गेलं साधारण सव्वा वर्ष कोविड-19 च्या महासाथीने थैमान घातलं आहे. जगभरातल्या अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूची नवी लाट नवनवे उच्चांक गाठत आहे. आरोग्य तज्ज्ञांनी सुरुवातीपासूनच या गोष्टीवर भर दिला आहे, की ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, अशा व्यक्तींचा या रोगातून बचाव होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी केलेल्या नव्या निरीक्षणानुसार, ज्या महिलांच्या आहारात विशेष तऱ्हेच्या व्हिटॅमिन्सचा समावेश असतो, त्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका काहीसा कमी असू शकतो.

मल्टिव्हिटॅमिन्सचे (Multivitamins) फायदे खूपच मर्यादित आहेत. साधारणतः डॉक्टर जास्तीत जास्त लोकांना असा सल्ला देतात, की त्यांनी स्वतःला हेल्दी ठेवण्यासाठी आहारात सूक्ष्म अन्नद्रव्यांचाही समावेश करावा. व्हिटॅमिन्सच्या लाभांसंदर्भात आतापर्यंत झालेल्या संशोधनातून कोणत्याही स्पष्ट मार्गदर्शक सूचना तयार करता आलेल्या नाहीत. कोणाच्या आहारात कोणती व्हिटॅमिन्स हवीत, हे पूर्णपणे व्यक्तिपरत्वे बदलतं.

आरोग्य चांगलं राखण्यासाठी हेल्थ सप्लिमेंट्सची भूमिका महत्त्वाची असते. अगदी सर्दी होण्याच्या पाठीही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता कारणीभूत असू शकते. जगभरातले तज्ज्ञ सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या (Micro Nutrients) आहारातल्या समावेशाचं महत्त्व स्पष्ट करत आहेत. शाकाहारी व्यक्तींना व्हिटॅमिन बी 12ची कमतरता पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातो. त्या माध्यमातून त्यांच्या शरीरातल्या आवश्यक तत्त्वांची उणीव भरून काढली जाते.

हे वाचा - तुम्हाला औषध दुकानातूनही कोरोना लस विकत घेता येईल का? केंद्र सरकारने दिलं उत्तर

कोरोना महासाथीच्या सुरुवातीच्या काळात व्हिटॅमिन्सच्या (Vitamins) अनेक औषधांची शिफारस केली गेली. त्यांच्या विक्रीत वाढ झाली. वर उल्लेख केलेलं संशोधन केलेल्या शास्त्रज्ञांनी काही निरीक्षणं नोंदवली.

ब्रिटनच्या हेल्थ सप्लिमेंट मार्केटमध्ये मार्च 2020 मध्ये 19.5 टक्के वाढ झाली. तेव्हा तिथे नॅशनल लॉकडाउन झाला होता. व्हिटॅमिन सीच्या गोळ्या/औषधांची विक्री 110 टक्क्यांनी, तर मल्टिव्हिटॅमिन औषधांची विक्री 93 टक्क्यांनी वाढली होती. अमेरिकेत कोविड-19 च्या चिंतेमुळे मार्च 2020 च्या पहिल्या आठवड्यात झिंक सप्लिमेंटच्या (Zinc Supplement) विक्रीत 415 टक्के वाढ झाली होती.

झोए या आरोग्यविज्ञान कंपनीच्या कोविड-19 सिम्प्टम्स स्टडी अॅपमधून शास्त्रज्ञांनी ही आकडेवारी मिळवली. 2020 च्या सुरुवातीला हे अॅप सादर करण्यात आलं होतं. या अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तींना व्हिटॅमिनच्या संदर्भात बऱ्याच प्रश्चांनी उत्तरं देण्यास सांगण्यात आलं होतं. त्यात प्रोबायोटिक, गार्लिक, माशांचं तेल, मल्टिव्हिटॅमिन, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी, झिंक आदींशी संदर्भात प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता. त्या व्यक्तींनी कोविड टेस्ट केली होती का, आणि केली असेल तर तिचा रिझल्ट काय होता, हा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता.

या अभ्यासात अमेरिका, ब्रिटन, स्वीडन या देशांतल्या 4,45,850 व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. 31 जुलै 2020 पर्यंतच्या सहभागी व्यक्तींच्या उत्तरांचं विश्लेषण करण्यात आलं. या अभ्यासाचं लिंगाच्या आधारे विश्लेषण करण्यात आलं, तेव्हा असं लक्षात आलं, की ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्स, प्रोबायोटिक्स, मल्टिव्हिटॅमिन्स, व्हिटॅमिन डी अशा प्रकारची हेल्थ सप्लिमेंट्स घेणाऱ्या महिलांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका कमी होता.

हे वाचा - कोरोना लस ठरतेय संजीवनी; लसीकरणाच्या 90 दिवसांनंतर केंद्र सरकारने दिला पुरावा

हेल्थ सप्लिमेंट्सविषयी (Health Supplements) आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी केलेल्या या संशोधनाबद्दलचा लेख 'बीएमजे न्यूट्रिशन प्रिव्हेंशन अँड हेल्थ जर्नल'मध्ये प्रसिद्ध झाला आहे. काही खास व्हिटॅमिन्समुळे कोरोना होण्याचा धोका कमी होऊ शकतो; मात्र तो होणारच नाही, याची कोणतीही खात्री या अभ्यासातून दिलेली नाही. हे केवळ आकडेवारीच्या आधारे करण्यात आलेलं एक विश्लेषण असून, क्लिनिकल ट्रायल्स झाल्याशिवाय नेमके निष्कर्ष हाती येणार नाहीत. तोपर्यंत लस, मास्क, वैयक्तिक स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग यांवरच भर देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

First published: April 22, 2021, 10:51 PM IST

ताज्या बातम्या