ब्रिटन, 03 ऑगस्ट : डासांमुळे (Mosquito) डेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरिया यांसारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. त्यात मलेरियामुळे (Malaria) दर वर्षी जगभरात लाखो लोक मृत्युमुखी पडतात. मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि एकूणच मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी वैज्ञानिकांनी नुकताच एक प्रयोग (Research) सुरू केला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरला तर या जीवघेण्या आजाराचं समूळ उच्चाटन होऊ शकतं.
लंडन येथील इम्पिरियल कॉलेज आणि लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन या दोन संस्था यावर संशोधन करत आहेत. येथील वैज्ञानिक मलेरियाच्या प्रसाराला कारणीभूत ठरणाऱ्या मादी डासांना क्रिस्पर (CRISPR) पद्धतीचा वापर करून इन्फर्टाइल (Infertile) म्हणजेच प्रजनदृष्ट्या अक्षम बनवत आहेत. या मादींद्वारे प्रजनन होऊ नये यासाठी या पद्धतीचा वापर केला जात आहे. मलेरियाच्या संसर्गाला कारणीभूत ठरणाऱ्या अॅनाफिलिस गॅम्बी या डासांच्या प्रजातीची निवड वैज्ञानिकांनी प्रयोगाकरिता केली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास येत्या काही वर्षांत मलेरियाचं समूळ उच्चाटन करणं शक्य होईल.
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जगात डासांच्या 3500 हून अधिक प्रजाती अस्तित्वात आहेत; मात्र यातल्या काहीच प्रजाती मलेरिया संसर्गासाठी कारणीभूत ठरतात.
हे वाचा - अरे देवा! अश्रूंमधूनही पसरू शकतो कोरोनाव्हायरस; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
मलेरियाचा सामना करण्यासाठी चीनने 2012 मध्ये 1-3-7 अशी रणनीती लागू केली. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना (Health Workers) लक्ष्यांक देण्यात आला. यानुसार, मलेरियाचा रुग्ण आढळल्यास 1 दिवसात कळवणे, 3 दिवसांच्या आत या रुग्णाची पडताळणी आणि धोक्याबाबतची माहिती घेणं आणि 7 दिवसांच्या आता मलेरियाचा संसर्ग वाढू नये यासाठी आवश्यक पावलं उचलणं अनिवार्य करण्यात आलं होतं.
अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्यानंतर चीन हा देश नुकताच मलेरियामुक्त (Malaria Free) झाला असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेनं केली आहे. 40च्या दशकात चीनमध्ये दर वर्षाला मलेरियाच्या 3 लाख केसेसची नोंद होत होती; मात्र आता चीन हा पश्चिम पॅसिफिक (Western Pacific) प्रदेशातला एकमेव असा देश आहे, की जिथे मागील 4 वर्षांत मलेरियाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
हे वाचा - ऐकून आश्चर्य वाटेल, या देशात बदकाच्या एका पिसासाठी मोजावे लागतात हजारो रुपये
आता जगातल्या विविध देशांमधला मलेरियाचा संसर्ग आटोक्यात आणून त्याचं निर्मूलन करण्यासाठी जो प्रयोग वैज्ञानिक करत आहेत, त्यात क्रिस्पर तंत्राद्वारे जीन एडिटिंग (Gene Editing) म्हणजे जनुकीय सुधारणा केली जाते. मादी डासांमधल्या डबलसेक्स जनुकात (Double Sex Gene) सुधारणा केली जात आहे. यामुळे मादी डास प्रजननयोग्य राहणार नाहीत. या प्रयोगांती 560 दिवसांत डासांची संख्या कमी झाल्याचं दिसून आलं आहे. मच्छरदाणी, कीटकनाशकांचा वापर, रोगप्रतिबंधात्मक लस यांसोबतच जीन एडिटिंगदेखील मलेरिया निर्मूलनासाठीचं वेगवान तंत्र म्हणून पुढे येत आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर मोठा बदल घडून येऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.