नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : कोरोनाने (coronavirus) सर्वत्र हाहाकार माजवला आहे. अशातच आता दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लवकरात लवकरत कोरोना लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र प्रत्येकालाच या लशीची प्रतीक्षा आहे, असं नाही. काही जण या लशीला विरोधही करत आहेत. वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रात इतकी प्रगती झाल्यानंतरही लशीला विरोध केला जातो आहे. मग विचार करा जेव्हा शेकडो वर्षांपूर्वी जगात सर्वात पहिली लस आली तेव्हाची परिस्थिती काय असेल? त्यावेळी या लसीकरणासाठी लोकांना कसं तयार करण्यात आलं असेल? या लशीसाठी तेव्हा आपल्या जीवाची बाजी लावली ती एका भारतीय राणीने.
1800 च्या दशकात भारतात प्रकोप झालेल्या देवी रोगासाठी ब्रिटिशांनी लस तयार केली. त्यावेळी लोकांनी त्याला विरोध केला आणि या लशीबाबत जनजागृती करणं, लोकांना लशीचं महत्त्वं समजावून देणं हे मोठं आव्हान होतं. त्यावेळी राणी देवाजम्मनी यांनी स्वत ही लस टोचून घेतली आणि तसं पेंटिंग तयार करून जनजागृती केली. 1805 सालातील हे पेंटिंग समोर आलं आहे.
1805 साली वयाच्या 12 व्या वर्षी राजकुमारी म्हैसूरच्या राजपरिवारात आल्या. त्यांचा कृष्णराज वाडियार तृतीय यांच्याशी विवाह झाला. यानंतर त्यांना एक वेगळी भूमिका पार पाडावी लागली. ईस्ट इंडिया कंपनीच्या विनंतीवरून त्यांनी देवी या रोगाच्या लशीबाबत जनजागृती करण्यासाठी तयार झाल्या. 30 वर्षे हे कुटुंब सत्तेपासून दूर होतं. इंग्रजांच्या मदतीने त्यांना पुन्हा सत्ता मिळाली होती. त्यामुळे ते इंग्रजांची विनंती फेटाळू शकत नव्हतं.
हे वाचा - वर्ग नाही, शाळा उघडणार; लोकल नाही पण मेट्रो चालणार! दुकानं, बाजार नवे नियम?
कॅनव्हासवरील तेव्हाचं हे ऑईल पेंटिंग त्या कालावधीत एक मोठं साहस मानलं गेलं. यात छोटी राणी देवाजम्मन्नी या चित्रात उजव्या बाजूला असून त्या आपल्या पांढऱ्या साडीचा पदर वर घेताना दाखवल्या गेल्या आहेत. त्यांना टोचलेली लस या पेंटिंगमध्ये दिसत आहे. पण हा फोटो काढताना राजघराण्याच्या मर्यादेची पूर्ण काळजी घेण्यात आली होती. चित्रातील अन्य महिला जी मोठी राणी आहे तिच्या चेहऱ्यावर आणि हातावर काही डाग दिसत आहे, ही देवी रोगाची लक्षणं असल्याचं दाखवण्यात आलं आहे. लस घेतल्यानंतर छोटी राणी यातून बचावली असं या पेटिंगमध्ये दर्शवण्यात आलं आहे.
केंब्रिज विद्यापीठाच्या डॉ. निगेल चान्सलर यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार हे मॉडलिंग लशीबाबत भारतात जागृती आणि प्रोत्साहनासाठी करण्यात आलं होतं. त्यावेळी देवी रोगाची लस ही एकदम नवीन होती. ब्रिटिश डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांनी ही लस शोधली होती. अशा स्थितीत या लशीबाबत तसंच या लसीकरणाबाबत देशवासीयांमध्ये प्रचंड गैरसमज होते. अनेकांना ही लस धर्माच्या विरोधात असल्याची शंका होती. अशा परिस्थितीत लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी वाडियार परिवाराने इंग्रजांची मदत केली.
हे वाचा - पुन्हा कोरोना संसर्ग गंभीर; Reinfection चे रुग्ण आढळलेल्या मुंबईची चिंता वाढली
डॉ. चान्सलर यांनी या मॉडलिंगबाबत अधिकृत शिक्कामोर्तब करण्यापूर्वी अनेक संशोधनं केली आणि 2001 मध्ये त्यांचा याबाबतचा लेख प्रसिद्ध झाला. चित्रावरची तारीख ही राजा वाडियार यांच्या विवाहाच्या तारखेजवळची आहे, शिवाय 1806 मध्ये या मॉडलिंगचा लोकांवर मोठा प्रभाव पडला आणि ते स्वत: हून लसीकरणासाठी पुढे आले. थॉमस हिकी यांनी हे चित्र साकारलं होतं. त्यांनी वाडियार परिवाराच्या अन्य सदस्यांची पण चित्रं साकारली असून यामुळे डॉ. चान्सलर यांच्या मॉडलिंग थिअरीला बळ मिळालं आहे.