गेल्या काही वर्षांत बदलती जीवनशैली, ताणतणाव, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, व्यसनाधीनता आदी कारणांमुळे गंभीर आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. हृदयविकार, हृदयविकाराचा झटका, डायबेटीस, कॅन्सर आदींचा धोका वाढला आहे. कॅन्सरचे दोनशेपेक्षा जास्त प्रकार आहेत. पॅन्क्रियाज अर्थात स्वादुपिंडाचा कॅन्सर हादेखील एक प्रकार होय.
कॅन्सर कोणताही असला, तरी निदान आणि उपचार सुरुवातीच्या टप्प्यात झाले तर रुग्णाचं आयुर्मान निश्चित वाढू शकतं. बहुतांश प्रकरणांमध्ये कॅन्सरचं निदान उशिरा होतं. कोणतंही लक्षण न दिसणं हे त्यामागचं प्रमुख कारण असतं. पॅन्क्रियाज कॅन्सर हा सायलेंट विकार आहे. या कॅन्सरची लक्षणं पहिल्या टप्प्यात दिसून येत नाहीत. त्यामुळे संशोधकांनी या संदर्भात एक अभ्यास करून काही निष्कर्ष मांडले आहेत. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
जगभरात दर वर्षी लाखो जण स्वादुपिंडाच्या कॅन्सरला बळी पडतात. एकट्या ब्रिटनमध्ये दर वर्षी 10 हजारांहून जास्त जणांना या कॅन्सरचं निदान होतं. दुर्दैवाने या कॅन्सरचं निदान लक्षणांअभावी उशिरा होतं आणि त्यामुळे तो बरा होण्याची शक्यता मावळते. निदान झाल्यावर दहा टक्क्यांहून कमी जण पाच वर्षांपर्यंत जगतात. `द कॉन्व्हर्सेशन`च्या वृत्तानुसार, स्वादुपिंडाचा कॅन्सर सायलेंट असतो. अनेक रुग्णांमध्ये या कॅन्सरची सुरुवातीला कोणतीही लक्षणं दिसत नाहीत; मात्र हा कॅन्सर बळावल्यानंतर त्याची लक्षणं दिसू लागतात. वजन कमी होणं आणि ब्लड शुगर लेव्हल वाढणं ही त्याची दृश्य लक्षणं आहेत; पण हे बदल केव्हा आणि किती प्रमाणात होतात, याबाबत अद्याप पुरेशी माहिती उपलब्ध नाही.
याबाबतच्या एका सर्वांत मोठ्या संशोधनाचा अहवाल `पीएलओएस वन`मध्ये प्रसिद्ध झाला आहे. सरे युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या सहकार्याने स्वादुपिंडाच्या कॅन्सरच्या ज्ञात लक्षणांचं परीक्षण केलं. त्यात, वजन कमी होणं, हाय ब्लड शुगर आणि डायबेटीस आदींचा समावेश होता. ही लक्षणं कॅन्सरच्या संबंधांत विकसित होतात का, याचं निरीक्षण केलं. या संशोधनासाठी संशोधकांनी इंग्लंडमधल्या एक कोटीपेक्षा जास्त नागरिकांचा एक मोठा डेटा सेट वापरला. संशोधकांनी स्वादुपिंडाच्या कॅन्सरचं निदान आणि नातेसंबंधाच्या तीन वैशिष्ट्यांबद्दल माहिती काढली आणि कालांतराने ते कसे बदलतात याचं परीक्षण केलं.
आपल्या अभ्यासात संशोधकांनी सरासरी दर पाहिले. यामुळे भविष्यात डेटाचा अधिक सखोल अभ्यास करणं, वजन कमी होण्याची आणि ग्लुकोजची पातळी वाढण्याची शक्यता असलेल्या व्यक्ती आणि व्यक्तिगटांचं परीक्षण करणं महत्त्वाचे होईल. हा दृष्टिकोन गरजूंना मदत करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो.
हेही वाचा - ऑफिसमध्ये प्रचंड वर्क प्रेशर आहे का? तर फॉलो करा 'या' टिप्स
संशोधकांनी या संशोधनादरम्यान, सुमारे नऊ हजार जणांचा बॉडी मास इंडेक्स (वजन कमी करण्यासाठी) आणि एचबीए-1सीची (ब्लड शुगरसाठी) तुलना ज्यांना हा आजार नव्हता अशा सुमारे 35 हजार जणांच्या समूहाशी केली. स्वादुपिंडाच्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये अचानक वजन कमी होण्याची प्रक्रिया दोन वर्षांपूर्वीच सुरू झाल्याचं संशोधकांना दिसून आलं. निदानावेळी स्वादुपिंडाचा कॅन्सर असलेल्यांचा सरासरी बीएमआय कॅन्सर नसलेल्यांपेक्षा सुमारे तीन युनिट कमी होता. कॅन्सरचं निदान होण्याअगोदर तीन वर्षांपूर्वी ग्लुकोजची पातळी वाढल्याचं दिसून आलं.
संशोधकांच्या विश्लेषणातून असं दिसून आलं की, डायबेटीस नसलेल्यांपेक्षा कमी वजन असलेल्या डायबेटीस रुग्णांना स्वादुपिंडाचा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. डायबेटीस नसलेल्यांमध्ये वाढलेली ग्लुकोज पातळी ही डायबेटीस असलेल्यांच्या तुलनेत स्वादुपिंडाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढवणारी होती.
संशोधनाच्या निष्कर्षानुसार, प्रामुख्याने डायबेटीस असलेल्या व्यक्तींचं कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वजन कमी होत असेल तर त्याचं निरीक्षण केलं पाहिजे. याशिवाय ब्लड ग्लुकोज पातळीत वाढ होणं ही स्वादुपिंडाच्या कॅन्सरसाठी धोक्याची घंटा मानली पाहिजे. हे बदल आरोग्य तपासणीसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. नियमित परीक्षण केलं तर डॉक्टरांना स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे निदान न झालेल्यांच्या तपासणीत मदत होऊ शकते. त्यानंतर अशा व्यक्तींना कॅन्सरच्या तपासणीसाठी पोटाचा स्कॅन करण्याकरिता रुग्णालयात किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठवता येऊ शकेल.
या आजाराचं सुरुवातीच्या टप्प्यात निदान झालं तर कॅन्सर पसरण्याचा धोका कमी करता येतो. तसंच रुग्ण उपचारांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे फिट आहे की नाही हेदेखील ठरवता येतं.
स्वादुपिंडाच्या कॅन्सरचं निदान होण्यापूर्वी हे बदल कसे आणि केव्हा होतात हे आपण अधिक चांगल्या प्रकारे समजू शकलो तर आपण या माहितीचा वापर करून रोगाच्या निदानापूर्वी आणि भविष्यात या घातक आजाराने बाधित व्यक्तींचे प्राण वाचवू शकतो, असं सरे युनिव्हर्सिटीतल्या हेल्थ डेटा सायन्सच्या प्राध्यापिका एग्निज्का लेमांस्का यांनी त्यांच्या अभ्यासात नमूद केलं आहे.
संशोधकांना ही माहिती अधिक जटिल अल्गोरिदमद्वारे तपासायची आहे, जेणेकरून डॉक्टर याचा वापर करू शकतील. वजन आणि ग्लुकोजचा एकत्र वापर आणि संभाव्य स्वादुपिंडाच्या कॅन्सरच्या इतर प्रमुख लक्षणांचा समावेश करणं (गडद लघवी, फिकट गुलाबी मल आणि फिकट त्वचा) या गोष्टी प्रत्येक उपाय स्वतंत्रपणे पाहण्यापेक्षा अधिक प्रभावी आहेत. या प्रकारचं उपकरण निदानामध्ये तात्काळ सुधारणा आणि अनेकांचा जीव वाचवण्याचं एक प्रभावी माध्यम ठरू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.