नवी दिल्ली, 04 जानेवारी : भारतात दोन कोरोना लशींना (Corona vaccine) मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी एक लस स्वदेशी लस COVAXIN आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होण्याआधीच या लशीला मंजुरी दिल्यानं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या लशीच्या सुरक्षितेबाबत आणि प्रभावाबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. याबाबत आता भारत बायोटेकनंच (Bharat biotech) सडेतोड उत्तर दिलं आहे. कोवॅक्सिनवरून राजकारण होऊ लागताच भारत बायोटेकचे चेअरमन आणि एमडी डॉ. कृष्णा एल्ला (Dr. Krishna Ella) यांनी मौन सोडलं आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
कृष्णा एल्ला म्हणाले, “लशीचं राजकारण केलं जातं आहे. माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य कोणत्याच राजकीय पक्षात नाही. मला बिझनेस नाही फक्त विज्ञान समजतं. मी प्रसारमाध्यमांना टाळतो असं नाही. मला प्रसिद्धी नको आहे” “आतापर्यंत विकसित देशात झालेलं हे सर्वात मोठं ट्रायल आहे. आम्हाला अनुभव नाही असा आरोप आमच्यावर लोक करू शकत नाही. आम्ही एक जागतिक कंपनी आहोत. लशीबाबत आम्हाला खूप अनुभव आहे, संशोधनाचा खूप अनुभव आहे. आमच्या अहवालात पारदर्शकता नाही हे म्हणणं चुकीचं आहे”, असंही कृष्णा एल्ला म्हणाले. “भारतीय कंपन्यांना लक्ष्य केलं जातं आहे. लशीच्या प्रभावाचं ट्रायल कुणीही केलं नाही पण आम्ही केलं. आम्हाला नियमांनुसारच मान्यता मिळाली आहे”, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. हे वाचा - स्वदेशी लशीचा बालकांवरही यशस्वी प्रयोग, लहान मुलांसाठीही Covaxin सुरक्षित ‘इंडियन एक्स्प्रेस’ नं दिलेल्या वृत्तानुसार काही स्वतंत्र शास्त्रज्ञांनी तिसऱ्या टप्प्यातील डेटावर शंका उपस्थित केली आहे. भारत बायोटेकनं घेतलेल्या चाचण्यांमधील पहिल्या दोन टप्पे हे समाधानकारक आहेत. मात्र नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या तिसऱ्या टप्प्यातील परिणामकारकता डेटा (Efficiency Data) अजून समोर आलेला नाही. व्हायरसाचा हल्ला रोखण्यासाठी हे औषध किती प्रभावशाली आहे, याची माहिती या डेटावरुन समजते. हे वाचा - Covaccine: तिसऱ्या टप्प्यातील परिणामकारता डेटा बद्दल शास्त्रज्ञांना शंका! Bharat Biotech च्या लशीला तिसऱ्या ट्रायल अगोदरच मंजुरी दिल्यानंतर भारतीय नेत्यांनीही यावर आक्षेप घेतला. कॉंग्रेस खासदाराने सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं. तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर म्हणाले, की ही मंजुरी प्रीमॅच्युअर आहे. कारण भारत बायोटेकनं आजून तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे या चाचण्या यशस्वी होईपर्यंत वापर न करणे हेच योग्य आहे. ‘कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अजून बाकी आहेत. ही मंजूरी प्रीमॅच्युअर आहे. आणि यातून धोका उद्भवू शकतो. डॉ. हर्षवर्धन यांनी कृपया स्पष्टीकरण द्यावं. सगळ्या चाचण्यांचा टप्पा पूर्ण होईपर्यंत या लसीचा वापर टाळला पाहिजे. दरम्यान भारत ऍस्ट्राझेन्काचा वापर सुरू ठेऊ शकतो.’ असं ट्विट त्यांनी केलं होतं.