मुंबई, 13 ऑगस्ट : कधीकधी आपल्याला एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जावं लागतं. मग ते कारण कोणतंही असू शकतं. नोकरी-व्यवसायापासून ते अगदी वैद्यकिय कारणांमुळं आपल्याला आपलं राहतं घर सोडून बाहेर जावं लागतं, परंतु अशावेळी आपण आपलं बरचसं साहित्य सोबत नेत असतो किंवा त्याच्या सुरक्षेची काळजी घेत असतो. परंतु जेव्हा एखादी सहल किंवा कुणाच्या लग्नाला जायची वेळ येते तसेच एखादा सण साजरा करण्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी थोड्या काळात बाहेर जाण्याची वेळ येते, तेव्हा प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उभा राहतो की, आपण घराबाहेर पडत आहोत, पण आपलं घर सुरक्षित आहे का? कारण आपण घरात सामान ठेवलं आहे, ते खूप कष्टानं कमावलं आहे. त्यामुळं तुम्हालाही काही कारणांमुळं थोड्या काळासाठी घराबाहेर जावं लागणार असेल, तर अशावेळी काय काळजी घ्यावी, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. घराबाहेर पडताना या गोष्टींची घ्या काळजी- गॅस बंद करा- गॅसच्या बाबतीत लोक सर्वात जास्त निष्काळजीपणा करतात. आपल्या एका छोट्याशा चुकीमुळं खूप मोठं नुकसान होऊ शकतं, हे सारेच जाणतात, परंतु तरीही अनेकजण हलगर्जीपणा करतात. परंतु असं करू नये. त्यामुळं जेव्हाही तुम्ही घराबाहेर पडता, तेव्हा गॅस स्टोव्ह तसेच रेग्युलेटर बंद करा. जर तुम्ही अशा गोष्टी विसरत असाल तर अशा गोष्टींची यादी करा आणि त्यामध्ये या गोष्टींची नोंद ठेवा, म्हणजे तुम्हाला ही गोष्ट आठवणीत राहू शकते. असं केल्यानं तुम्ही तुमचं घर सुरक्षित करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकू शकता. लाईट बंद करा- तुम्ही घराबाहेर जात असाल तर लाइट बंद करायला विसरू नका. फॅन, कूलर फ्रीज, एसी यांसारख्या गोष्टी मेन स्विचमधूनच बंद करा. यामुळे तुमचं वीज बिल तर वाचेलच, शिवाय कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही कारण वीज कमी जास्त झाल्यामुळं अनेक उपकरणं बिघडू शकतात. हेही वाचा- वजन कमी करायचंय? रात्री झोपण्यापूर्वी ‘हे’ पेय प्या, होईल मोठा फायदा पाळीव प्राण्यांची घ्या काळजी- बरेच लोक आपल्या घरी कुत्रा, मांजर पाळीव प्राणी पाळतात. परंतु त्यानंतर त्यांची काळजी घेण्याची वेळ येते, तेव्हा त्यांचा निष्काळजीपणा स्पष्ट दिसतो. जर तुम्ही बराच वेळ घराबाहेर जात असाल तर एकतर तुम्ही पाळीव प्राण्याला सोबत घ्या. तुम्ही तुमचा पाळीव प्राणी ट्रेन, फ्लाइट किंवा बसमध्ये काही अटी-शर्तींचं पालन करून सोबत नेऊ शकता. तुम्हाला इतर कोणत्याही कारणास्तव तुमच्या पाळीव प्राण्याला सोबत घेऊन जायचं नसेल, तर तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्याला ‘टेक केअर सेंटर’मध्ये ठेवू शकता, जिथे पाळीव प्राण्यांची काळजी घेतली जाते. येथे तुम्ही काही शुल्क भरून तुमच्या पाळीव प्राण्याला हवे तितके दिवस सोडू शकता. सुरक्षिततेकडे लक्ष द्या- जर तुम्ही घराबाहेर जात असाल तर तुम्हाला तुमच्या घराच्या सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी लागेल. घराला नीट कुलूप लावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या घरात जबाबदार शेजारी किंवा विश्वासू नातेवाईक ठेऊनही जाऊ शकता. याशिवाय घरात सीसीटीव्ही लावून तुम्ही तुमच्या घरावर पाळत ठेवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.