मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

उत्साहाच्या भरात मी जी चूक केली ती तुम्ही करू नका! तरुणीचा थरारक प्रवास

उत्साहाच्या भरात मी जी चूक केली ती तुम्ही करू नका! तरुणीचा थरारक प्रवास

माझ्या पहिल्या बाईक रायडींगने आयुष्यभरासाठी धडा दिला. माणसानं प्रवासाला निघाताना, प्रवासात किती सजग असायला हवं याचा तो वस्तुपाठच होता.

माझ्या पहिल्या बाईक रायडींगने आयुष्यभरासाठी धडा दिला. माणसानं प्रवासाला निघाताना, प्रवासात किती सजग असायला हवं याचा तो वस्तुपाठच होता.

माझ्या पहिल्या बाईक रायडींगने आयुष्यभरासाठी धडा दिला. माणसानं प्रवासाला निघाताना, प्रवासात किती सजग असायला हवं याचा तो वस्तुपाठच होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

सकाळी निघताना गाडी चालू केल्यानंतर मला शंका आली होती. पण, आदल्या दिवशी सर्व्हिसिंग केली असल्याने मी त्याकडं दुर्लक्ष केलं. पण, तीच माझी मोठी चूक ठरली. माझ्या आयुष्यातील पहिली राईडची सुरुवात इतकी शानदार झाली होती. मात्र, तिचा शेवटा असा होईल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता..

नमस्कार, मित्रांनो.. मी कादंबरी दिलीप पाटील.. मी एक sports analyst असून आंतरराष्ट्रीय Pickleball खेळाडू सुद्धा. 2020 मध्ये मी Pickle ball खेळात देशाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यात रौप्य पदक देखील पटकावलं आहे. बाईक रायडींगची आवड निर्माण होण्यात या खेळाचं मोठं योगदान आहे.

पहिल्या बाईक रायडींगचा शेवट असा होईल याचा विचार मी स्वप्नातही केला नव्हता! बाईक रायडर मुलीचा थरारक प्रवास

बाईक रायडींगची सुरुवात म्हणाल तर तीही लहापणापासूनच होती. माझ्या वडिलांकडे RX 100 बाईक होती. वडिलांच्या पाठीमागे त्यांना घट्ट मिठी मारुन बसताना कधीतरी पुढे बसून आपणही गाडी चालवावी असं नेहमी वाटायचं. थोड्या वर्षांनी बाबांनी enticer घेतली, जवळपास 15 वर्ष त्यांनी ही गाडी वापरली. त्याचदरम्यान मार्केटमध्ये सेल्फ स्टार्ट बुलेट लाँच झाली. बाबांना बुलेट आधीपासून घ्यायची होती. पण, पायाचा त्रास असल्यामुळे ते घेऊ शकत नव्हते. आता तो प्रश्न मिटल्याने आमच्याकडेही बुलेट आली. मला तर कधी एकदा बुलेट चालवेल असं झालं होतं.

माझी इच्छा बाबांना बोलून दाखवली तर त्यांनी आधी एन्टीसर वर शिकून घे म्हणाले. मग, मी स्वतःच बाईक चालवायला शिकले. बाबांच्या मागे बसून ते गाडी चालवताना काय करतात? याकडे माझं नेहमी लक्ष असायचं. त्याचा उपयोग मला बाईक शिकताना झाला. अगदी कमी वेळात मी बाईक शिकले. त्यातही कोणाच्याही मदतीशिवाय गाडी शिकल्याने एक वेगळाच आनंद वाटायचा. मी मस्त एन्टीसर फिरवायला लागले. आता दूर कुठेतरी बाईक रायडींगला जावं असं माझ्या मनात विचार आला.

एक दिवस मी माझ्या मैत्रिणी सोबत रात्री 11 च्या आसपास राऊंड मारायला गेले होते. तो रस्ता अतिशय कमी गर्दीचा होता. तेव्हा तिथे 2 केटीएम बाइकर्स रेसिंग करत होते. त्यावेळी मी अगदी डाव्या बाजूने सांभाळत बाईक चालवत होते. माझं पूर्ण लक्ष माझ्या उजव्या आरश्यात होतं. तिथे 1 गतिरोधक आला आणि त्यावरून जात असताना मागे बघताच त्या दोन्ही बाइक्स एकदम दहा पंधरा फूट वर हवेत उडाल्या अन् धाडदिशी आवाज करत घसरत गेल्या.

त्या एका प्रसंगाने माझं आयुष्यच बदलून गेलं

काहीक्षण माझ्या डोळ्याला अंधाऱ्याच आल्या. काय झालं काही कळलं नाही. कसबसं मी स्वतः ला सावरलं. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने थोड्याच वेळात आसपासची लोकं धावत आली. त्यातील एका बाईकची टाकी फुटल्याने सगळीकडे पेट्रोल पसरलं होतं. एक मुलगा जागीच बेशुद्ध झाला होता तर दुसरा गंभीर जखमी. लोकं तर म्हणत होते, की एकजण हमखास जातोय. माझ्यासमोर असा प्रसंग पहिल्यांदा घडल्याने माझी पाचावर धारण बसली. काय करावं काही सूचेना. मी माझ्या बाबांना लगेच फोन केला. त्यांना घडला प्रकार सांगितला आणि म्हटलं तुम्ही बाईक घ्यायला इथे या. मी आता बाईक चालवू नाही शकत. एकप्रकारे मला मानसिक धक्का बसला होता. अशा परिस्थितीत बाबा शांतपणे म्हटले.. बेटा आता जर तू बाईक चालवली नाहीस तर आयुष्यात कधीच चालवू शकणार नाही. तू स्वतःच बाईक घरी घेऊन आली तर ठीक नाहीतर उद्यापासून गपचूप बाईकचा नाद सोडून द्यायचा. त्या एका वाक्याने मला विचार करायला लावलं, मलाही ते पटलं. कारण, मलाही बाईक रायडींग सोडायची नव्हती. खोल श्वास घेतला अन् गाडीला किक मारली. तेव्हापासून सुरू झालेला माझा प्रवास आतापर्यंत अव्याहतपणे सुरुच आहे. तो एक प्रसंग आणि बाबांचा सल्ला या दोन गोष्टींनी माझ्यात आमुलाग्र बदल केला.

माझी 'सुकून'

त्यानंतर जवळपास महिनाभर त्याच गाडीवरुन रायडींग सुरू होतं. पण, आता मला काहीही करून स्वतः ची बाईक पाहिजे होती. त्याच काळात मला जॉब देखील लागला होता. त्यावेळी पहिल्या पगारातच बाईक घेण्याचा माझा विचार पक्का झाला होता. आणि बाईक म्हणजे एकच Royal Enfield. बस्स! आपला विषयच खोल होता. पण, बाबा बोलले Avenger घे. (बाबांचा प्रत्येक गोष्टीत सपोर्ट होता) ते म्हणाले तुझा हाथ बसल्यावर मोठी बाईक घे. नेहमीप्रमाणे बाबांचा सल्ला शिरसावंद्य मानत मी 2018 मध्ये avenger 220 cruise घेतली. तिला मी "सुकून" असं नाव दिलं.

माझी पहिली राईड..

मी माझ्या नवीन बाईकवरून पहिल्या राईडला निघाले. Himalayan ही माझी ड्रीम बाईक होती. मी स्वतःच ती घेतल्याने मला याचा वेगळाच गर्व आणि आनंद देखील आहे. माळशेज घाटाच्या 20 किलोमीटर पुढे एक पिंपळगाव जोगा धरण आहे, तिथे मी गेली होती, माझ्या एका इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या मैत्रिणीसोबत. पहाटे लवकर आवरुन मी निघाले. निघतानाच गाडीत थोडी गडबड वाटत होती. तेव्हा सर्व्हिसिंग देखील केली होती. पण, तरीही काहीतरी गडबड वाटत होती. आम्ही निघालो अगदी आरामात मज्जा करत जात होतो. नाश्ता वगैरे करून 10 वाजण्याच्या सुमारास आम्ही तिथे पोहचलो. खूपच सुंदर आणि विहंगम दृश्य होतं. ऑक्टोबर महिना असल्याने थोड्याफार पावसाने वातावरणात जान आणली होती.

अन् गाडीनं दगा दिला

आमचा सकाळचा प्रवास खूप आल्हाददायक झाला. थोड्या वेळाने आम्ही विचार केला, आता निघायला हवं, तोपर्यंत एक वाजून गेला होता. निघण्यासाठी बाईक वर बसून चालू करायला लागले, तर माझी बाईक चालूच होइना. मला खूप टेंशन आलं. आता काय करायचं? मी माझ्या मेकॅनिकला कॉल केला. त्याने सांगितल्याप्रमाणे सगळं केलं. पण बाईक काही चालूच होत नव्हती. त्यात आम्ही ज्या ठिकाणी होतो तिथं फक्त 100 ते 150 घरांची वस्ती होती. एकही मेकॅनिक नव्हता. रस्त्यावर सुद्धा कोणी नव्हतं, अगदी शांतता. आम्ही मदतीची खूप वेळ वाट पाहिली, तेवढ्यात एक काका दिसले. त्यांना विचारलं असता इथून 15 किलोमीटर वर एक मेकॅनिक असल्याचे सांगितले.

आम्ही विचार केला तिथे जाऊन त्यालाच घेऊन येऊयात. तिथे पोचलो तर काय तिकडं ते मेकॅनिक काकाच नव्हते, ते एका गाडीच्या दुरुस्तीसाठी बाहेर गेले होते. ते तब्बल 2 तासानंतर परतले. तेवढा वेळ आम्हाला वाट पाहावी लागली, कारण आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मेकॅनिक आल्यानंतर त्यांना काय झालं ते सांगितलं तर ते आमच्या सोबत यायलाच तयार नव्हते. मघाशी मंदावलेली वेळ आता भरभर चालली होती. सायंकाळचे 5 वाजून गेले. परतीचा प्रवास देखील करायचा होता. खूप विनवन्या केल्यानंतर ते तयार झाले. त्यांनी बाईक दुरुस्ती करता करता 7 वाजवले. खूप अंधार झाला होता.

आम्ही तिथून लगेच निघालो. एकतर घाटाचा रस्ता त्यात ट्रक ड्रायव्हर खूप बेकार चालवत होते. बिना हेडलाईटने ओव्हरटेक चालू होतं. आम्ही डाव्या बाजूने अगदी आरामात चालवत होतो. त्यात खूप जोरात पाऊस आला. रेनकोट वगैरे काहीच नव्हतं आणि खूप अंधार असल्यामुळे कुठे थांबता येणार नव्हते. त्यात आम्ही दोघी मुली अन् अनोळखी रस्ता. घाट संपल्यावर एका ठिकाणी आम्ही थांबलो. खूप पाऊस, वारा आणि वीज कडाडत होत्या. 2 तास आम्ही तिथेच थांबून होतो. 10 वाजता त्या जागेवरून परत पुढे प्रवास सुरू केला. मध्ये 2-3 वेळा माझ्या बाईकचे ब्रेकडाऊन्स आले. त्यात पेट्रोल संपत आलं होतं. गावाचा रस्ता आल्यामुळे कुठेच पेट्रोल पंप नव्हता. जे होते ते बंद झाले होते. एका ठिकाणी आम्ही ब्लॅकमध्ये पेट्रोल भरलं. पुढे माझ्या बाईकच अजून एक वेळा ब्रेकडाऊन झालं. हे सगळं होईपर्यंत रात्रीचे 12 वाजून गेले होते. अशा परिस्थितीत अक्षरशः रात्रीचे 2 वाजले घरी पोचायला. त्यात भुकेल्या पोटी. सकाळी जो नाश्ता केला होता त्यानंतर काहीच खाल्लं नव्हत. त्यात दिवसभर जे घडलं त्यामुळे भूकही मेली होती. घरी सुखरुप पोहचलो यातच आम्ही खूश झालो.

त्यानंतरही प्रवास चालूच होता. मला माझ्या हिमालयनने सुरुवातीचे 4 महिने खूप त्रास दिला. पण मी प्रत्येक वेळी काही तरी उपाय काढत राहिली. माझा एक ग्रुप बनला. त्यात माझेच सगळे कॉलेजचे मित्र मैत्रिणी आहेत. आम्ही बरेच राईड सोबत केले. सगळेच आतापर्यंत यशस्वी झाले आहेत. 'ऑन द डे राईड' आम्ही करतो. जेव्हा मन होईल तेव्हा निघा. महिन्यातून एकदा किंवा दोन वेळा एकतरी 500 किमीची रिटर्न राईड ठरलेलीच असते.

अलिकडेच 2021 च्या शेवटच्या दिवशी मी आणि माझा मित्र आम्ही दोघांनी माझ्या गावी जायचं ठरवलं. मग विचार केला बाईकनेच जाऊया. ही माझी पहिली सगळ्यात मोठी राईड झाली होती. 500 किलोमीटर एका दिवसात. ती राईड खरंच खूप सुंदर होती.

आता आतुरता आहे, ती लेह-लडाख, स्पिती, झांस्कर, नॉर्थ ईस्ट, साऊथ, K2K सगळ्यांची सफर करण्याची. प्लॅनिंग तर बरोबर चालू आहे. आशा आहे की लवकरच तेही स्वप्नं पूर्ण होईल.

शेवटी एकच वाटतं जेवढं मोठं आपलं ध्येय असतं, तेवढ्याच मोठ्या अडचणी असतात. आयुष्य एकदाच मिळतं ते भरभरुन जगायला हवं. आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करुन त्यांना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

- कादंबरी दिलीप पाटील, बाईक रायडर

First published:

Tags: Bike, Bike riding, Digital prime time