मुंबई, 12 डिसेंबर : लठ्ठपणा आणि हाय कोलेस्टेरॉलने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका अर्थात हार्ट अटॅक येत असल्याचं सहसा दिसतं. परंतु, अलीकडे तरुणांच्या बाबतीतही तसं घडत असल्याचं दिसून येत असल्याने एक वेगळं आणि चिंताजनक चित्र उभं राहिले आहे. चालताना, जिममध्ये व्यायाम करत असताना, लग्नात डान्स करत असताना किंवा रोजची कामं करत असताना तरुणांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशा परिस्थितीत अतिव्यायामामुळेही तरुणांना हार्ट अटॅक येऊ शकतो, असं मत प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. गेल्या काही वर्षांत हार्ट अटॅकच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः यात 25 ते 50 वर्षं वयोगटातल्या व्यक्तींचं प्रमाण लक्षणीय आहे. अलीकडेच कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार, गायक केके, विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांसारख्या अनेक सेलेब्रिटीजचं हार्ट अटॅकमुळे निधन झालं. यानंतर हार्ट अटॅकविषयी काही व्यापक गैरसमज समोर आले आहेत आणि ते दूर करणं आवश्यक आहे, असं तज्ज्ञ म्हणतात. `हदयाला रक्त आणि पोषक घटक पुरवणाऱ्या धमन्यांमध्ये अचानक अडथळा आल्याने हार्ट अॅटॅक येतो,` अशी माहिती ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या कार्डिओलॉजी विभागातले प्राध्यापक डॉ. नितीश नाईक यांनी दिली आहे. धूम्रपान करणाऱ्यांना आहे जास्त धोका `धमन्यांमध्ये चरबीचा थर तयार होतो. हा थर तुटून रक्तवाहिनीत प्रवेश करतो. यामुळे रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी तयार होते आणि धमनी बंद होते,` असं नोएडातल्या फोर्टिस रुग्णालयातील कार्डिअॅक सायन्सेसचे अध्यक्ष आणि कार्डिअॅक सर्जरीचे प्रभारी डॉ. अजय कौल यांनी सांगितलं. `ज्यांना धूम्रपानाचे व्यसन आहं, ज्यांची बैठी जीवनशैली आहे, ज्यांना लठ्ठपणा, रक्तदाबाचा त्रास आहे, डायबेटीस किंवा हाय कोलेस्टेरॉल आहे, त्यांना ही समस्या असू शकते,` असं नाईक यांनी सांगितलं. वाचा - हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच व्हा सावध! हेल्दी हार्टसाठी आहारात घ्या या 5 गोष्टी अनियमित व्यायामुळे येऊ शकतो हार्ट अटॅक डॉ. नाईक म्हणाले, `हार्ट अटॅक येण्याची केवळ हीच कारणं नाहीत. जिममध्ये अति व्यायाम केल्यानेदेखील असा त्रास होऊ शकतो.` `अनियमित व्यायामामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे प्रशिक्षणाशिवाय व्यायाम करू नये,` असं मॅक्स कार्डिअॅक सायन्सेसमधल्या कॅथ लॅबचे संचालक आणि प्रमुख डॉ. विवेक कुमार यांनी सांगितलं. अतिव्यायाम ठरू शकतो धोकादायक `जास्त व्यायाम केल्याने कोरोनरी वाहिन्यांमधला गोठलेला थर फुटू शकतो आणि त्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो,` असं मुरादाबादमधल्या उजाला सिग्नस ब्राइटस्टार हॉस्पिटलचे वरिष्ठ कन्सल्टंट आणि इंटरव्हेशनल कार्डिऑलॉजिस्ट डॉ. विजया कुमार यांनी सांगितलं. नवी दिल्लीतल्या पटपडगंजमधल्या मॅक्स हॉस्पिटलच्या हृदविकार विभागाचे असोसिएट डायरेक्टर विनीत भाटिया म्हणाले, `आकडेवारीचा विचार करता यात 15 ते 18 प्रकरणं युवकांशी निगडित आहेत. युवकांमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण केवळ अतिव्यायामामुळेच दिसून येत नाही.`
कोविडमुळे वाढल्या इतर समस्या कोविडमुळे हार्ट अटॅकच्या केसेस वाढल्या आहेत. डॉ. कौल यांनी सांगितलं, `कोविडने अनेक समस्या निर्माण केल्या आहेत, हे खरं आहे. कोविडमुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. कोविडमुळे हृदय आणि फुफ्फुसांशी निगडित समस्या निर्माण होतात.` अशा परिस्थितीत, कोविड की जास्त व्यायाम यांपैकी हृदयाच्या समस्यांचं नेमकं कारण कोणतं आहे हे कसं समजेल असा प्रश्न उपस्थित होतो. यावर डॉ. कौल म्हणाले, की `एखाद्या डॉक्टरांकडे जा. ते तुम्हाला सांगतील, की कोविड फक्त तुमच्या फुफ्फुसापर्यंतच मर्यादित आहे की नाही.` कोरोना लशीमुळे हार्ट अटॅक? कोरोनाविरुद्धच्या लढाईत लशीचं मोठं योगदान आहे. तथापि, काही प्रकरणात अँटी-कोविड लस हे हार्ट अटॅकचं कारण ठरलं आहे. अशा परिस्थितीत अशा प्रकरणांमुळे किती काळजी गरजेची आहे, या प्रश्नावर कौल म्हणाले, `फायदे हे जोखमीपेक्षा खूप जास्त आहेत. लसीकरणात इतर अनेक समस्या आहेत का तर होय आहेत; पण त्यांचं प्रमाण इतकं नगण्य आहे, की त्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकतं. कोविडमुळे हदयाशी संबंधित समस्या आणखी वाढू शकतात, हेदेखील लक्षात घेतलं पाहिजे.`