धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 3 मार्च : मुंबईतील हवेची पातळी गेल्या काही दिवसांपासून धोकादायक बनली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गोवंडीमधील नागरिकांना क्षय, दमा, ऱ्हदयरोगासह वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. या वायू प्रदुषणाचा प्राण्यांवरही गंभीर परिणाम होतोय. येथील तब्बल 50 कोंबड्यांचा मृत्यू प्रदुषणामुळे झालाय असा दावा स्थानिक नागरिक तसंच पर्यावरण प्रेमींनी केलाय. काय आहे परिस्थिती? औद्योगिक वसाहती, वाहनांची वाढती संख्या यासह विविध कारणांमुळे मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केली जात आहेत. त्यानंतरही गोवंडीत वायुप्रदूषणामुळे क्षय, दमा यांसारख्या विविध आजारांनी नागरिक ग्रस्त आहेत. इतकेच नव्हे, तर आता वायुप्रदूषणाचा परिणाम प्राण्यांवर आणि पक्ष्यांवर दिसतोय. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत अचानक 50 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा दावा इथल्या नागरिकांनी केला आहे. कोंबड्यांचे व्यवसायिक इस्तियाक अहमद शेख अब्बासी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सुरुवातीला माझा बकऱ्यांचा व्यवसाय होता. मात्र, माझ्या बकऱ्यांच्या हळूहळू मृत्यू होऊ लागला. मग मी कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीचे काही दिवस ठीक गेले. मात्र, नंतर कधी सहा, कधी चार, कधी तीन असा कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागला. माझ्या तब्बल 50 हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय, 5 वर्षातील आकडेवारी पाहून बसेल धक्का! Video आमच्या दुकानासमोरच आम्ही काही झाडे लावली आहेत. आम्ही ही झाड रोज साफ करतो. झाडांवर पाणी मारतो त्यांच्या पानांवर जी काही धूळ बसलेली असते ती आम्ही साफ करतो. त्यावेळी आमच्या लक्षात आलं इथल्या हवेत धुळीचे प्रदूषण जास्त आहे. या प्रदूषणामुळेच प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा मृत्यू होतोय. यामध्ये माझं काही लाखांचं नुकसान झालं आहे.
बीएमसीने यंदा 52 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्याचवेळी गोवंडी परिसरात वाढत्या प्रदूषणामुळे लोकांचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. या हजारो कोटींच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालिकेने वेळीच योग्य पावलं न उचलल्यास भविष्यात ऑक्सिजन सिलेंडर घेऊन रस्त्यावर फिरण्याची वेळ मुंबईकरांवर येऊ शकते.