मुंबई, 09 नोव्हेंबर : हिवाळा येताच अनेकांना एन्फ्लुएंझा, फ्लू किंवा सामान्य सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ लागतो. एन्फ्लुएंझा किंवा सिझनल फ्लू हा व्हायरल इन्फेक्शनमुळे होतो. एन्फ्लुएंझा व्हायरसचे चार प्रकार आहेत. यामध्ये एच1एन1 आणि एन्फ्लुएंझा बी व्हायरसमुळे साथ पसरू शकते. सिझनल फ्लू (हंगामी ताप) किंवा एन्फ्लुएंझा ही हवामानातील बदलांमुळे होणारी एक साधी समस्या आहे, असं लोकांना वाटत असलं तरी काही लोकांसाठी ती जीवघेणी ठरू शकते. एन्फ्लुएंझा साधारणपणे 4-5 दिवस ते दोन आठवड्यांत बरा होतो, परंतु या काळात गुंतागुंत वाढल्यास त्यातून न्यूमोनिया होऊ शकतो आणि त्यामुळे अनेक अवयव निकामी होऊ शकतात. गुंतागुंत वाढल्यास रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. लहान मुलं आणि वृद्धांना याचा सर्वाधिक धोका असतो. म्हणून सिझनल फ्लू किंवा एन्फ्लुएंझावर गांभीर्याने उपचार करायला हवेत. जर जास्त त्रास होत असेल तर नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घ्यायला हवेत. हेही वाचा - हाताच्या दुखण्याकडे करू नका दुर्लक्ष; गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण कोणत्या व्यक्तीला असतो धोका यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशनच्या वेबसाइटनुसार, फ्लू झालेले बहुतेक लोक काही दिवस ते दोन आठवड्यांत बरे होतात, परंतु काही लोकांना न्यूमोनिया होतो. याचा प्रभाव वाढल्याने सायनस आणि कानात संसर्ग होतो. न्यूमोनियाचा प्रभाव जसजसा वाढतो तसतसा विषाणूंबरोबरच बॅक्टेरियाचाही हल्ला वाढतो. फ्लूनंतर न्यूमोनिया गंभीर झाल्यावर हृदय, मेंदू आणि स्नायूंना सूज येऊ लागते, ज्यामुळे हृदयातील मायोकार्डिटिस, मेंदूतील इन्सेफिलायटिस आणि स्नायूंमध्ये मायोसिटिस होतो. परिणामी किडनी, रेस्पियरेटरीसह मल्टी ऑर्गन फेल्युअर होतं आणि शेवटी रुग्णाचा मृत्यू होतो. सर्वाधिक धोका कुणाला फ्लूमुळे होणारी जीवघेणी गुंतागुंत कोणालाही आणि कोणत्याही वयात होऊ शकते. तरीही काही लोकांना याचा धोका जास्त असतो. 65 वर्षांवरील वृद्ध लोक, दमा, डायबेटिज, हृदयरोग, गर्भवती महिला आणि 5 वर्षांखालील मुलांना फ्लूनंतर न्यूमोनियाचा धोका जास्त असतो.
एन्फ्लुएंझाची लक्षणं एन्फ्लुएंझामध्ये अचानक व्हायरसचा शरीरावर हल्ला होतो आणि तो त्याचा प्रभाव दाखवू लागतो. 3-4 दिवस ताप टिकतो. कधीकधी तीव्र अंगदुखी होते, खोकलादेखील होतो. छातीत कंजेशन होऊन नाकातून पाणी येऊ लागतं. कधीकधी घसा खवखवणं आणि डोकेदुखी असते. उलट्या आणि डायरियादेखील होऊ शकतात. उपचार काय? यासाठी डॉक्टर साधी औषधं देतात. परंतु जर फ्लू आठवडाभरात बरा झाला नाही, तर डॉक्टरांकडे जाणं कधीही चांगलं. हा आजार होऊच नये, यासाठी स्वच्छतेची काळजी घ्या. खोकताना आणि शिंकताना तोंडावर रुमाल ठेवा. मास्क घाला व साबणाने हात धुवा.