नवी दिल्ली, 07 मार्च : आरोग्यासाठी जीवनात चांगल्या सवयी असणं फार गरजेचं आहे. यामुळे आयुष्यातील अर्ध्या अडचणी आपोआप कमी होतात, असं म्हणतात. खाण्यापिण्याच्या आणि जीवनशैलीशी संबंधित सवयी आपल्या आरोग्यावर परिणाम करतात. म्हणजेच, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल घडवायचा असेल तर तुमच्या सवयी बदला. कारण चांगल्या सवयी केवळ तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करत नाहीत तर त्या लठ्ठपणा कमी करण्यासही मदत करतात. चांगल्या सवयींमुळे विविध आजारांचा धोकाही कमी होतो. दैनिक भास्कर वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, अमेरिकन कौन्सिल ऑन एक्सरसाइजनुसार, चांगल्या सवयी असलेल्या व्यक्तीचे आयुष्य तुलनेने 30 टक्क्यांनी जास्त असते. म्हणजेच आपण आपल्या दैनंदिन जीवनात केलेल्या कामात आणि आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये काही बदल घडवून आणले तर याद्वारे आपण आपले आयुष्य आणखी काही वर्षं (Science-Based 5 Good Habits) वाढवू शकतो.
अशाच काही सवयींविषयी या लेखात सविस्तर जाणून घेऊ. कधी खावं, किती पाणी प्यावं, कोणता व्यायाम करावा, मन आणि शरीर यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयीच्या 5 चांगल्या सवयी आणि त्यांचे शरीराला होणारे फायदे जाणून घेऊ.
गाडी चालवण्यापूर्वी पाणी प्या
पुरेसं पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं गाडी चालवण्यापूर्वी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण, सायकोलॉजी अँड बिहेव्हियर या जर्नलच्या माहितीनुसार शरीरात पाण्याची थोडीशी कमतरता देखील चालकाचं लक्ष विचलित करू शकते. पाण्याच्या कमतरतेचा थेट परिणाम मेंदूच्या ताळमेळ साधण्याच्या क्षमतेवर होतो.
नेहमी सकाळी जड नाश्ता करा
ENDO या नियतकालिकानुसार, जे लोक भरपूर न्याहारी करतात, त्यांना लठ्ठपणाचा धोका कमी असतो. त्यांना इन्सुलिनची गरज कमी असते. पचायला जड असलेले पदार्थ न्याहारीला खाल्ल्यानं दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाचं प्रमाण कमी होतं.
पेन आणि कागदावर लिहिण्याची सवय लावा
मानसशास्त्र शास्त्रानुसार, हातानं लिहिताना मेंदूमध्ये आढळणारे न्यूरॉन्स सक्रिय होतात. ज्यामुळं मेंदूची जुळवून घेण्याची आणि शिकण्याची क्षमता वाढते.
हे वाचा - दिवसा झोपणं आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या झोपेविषयी माहिती
20 सेकंदांसाठी एका पायावर उभं राहण्याचा व्यायाम
जपानी संशोधकांच्या मते, जे लोक एका पायावर 20 सेकंदही स्वतःचा तोल सांभाळू शकत नाहीत, त्यांना सेरेब्रल स्मॉल ब्लड व्हेसल्स डिसीजचा (Cerebral small blood vessel disease - मेंदूतील लहान रक्तवाहिन्यांच्या आजार) धोका जास्त असतो. हे स्ट्रोक आणि स्मृतिभ्रंशासाठी जबाबदार असतं. हा व्यायाम किमान 20 सेकंद केला तर मेंदूची क्षमता वाढते.
हे वाचा - उरलेले साबणाचे तुकडे वापरून असा बनवा हँडवॉश; सॅनिटायझरवर फुकटचा खर्चच नको
फोनवर बोलत असताना उभे रहा
Lipids in Health and Disease नुसार, जास्त वेळ बसून राहिल्यानं शरीरात ट्राय-ग्लिसराईडचं प्रमाण वाढतं. चांगलं कोलेस्ट्रॉल कमी होतं. यामुळं हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. हा धोका कमी करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे तुम्ही फोनवर बोलता, तेव्हा उभं राहणं किंवा चालणं.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips