नवी दिल्ली, 07 मार्च : भारतात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासादायक वातावरण आहे. मात्र, कोविडनंतरच्या गुंतागुंती वाढत राहण्याची शक्यता आहे. कोरोनाची लाट आता ओसरली, संसर्ग कमी झाल्यानं आपण कोरोनापासून वाचलोय आणि कायमचं सुरक्षित आहे, असा विचार करणंही चुकीचं आहे. कोविडचा शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो आणि संसर्गानंतरही (post-COVID complications) त्याचे परिणाम कायम राहतात. या श्वासोच्छवासाच्या आजारातून बरे झाल्यानंतरही फुफ्फुस, हृदय आणि पोटाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांवर याचा परिणाम होताना दिसत आहे. याचा अर्थ कोरोना विषाणूचा शरीराच्या अनेक भागांवर गंभीर परिणाम झाला आहे. बरे होऊन बराच काळ लोटल्यानंतरही अनेकांना समस्या येत आहेत. आकडेवारीवरून दिसून येतंय की, कोविड-19 मधून बरे झालेल्या लोकांमध्ये हृदयविकाराची प्रकरणे अधिक दिसून येत (Increase In Heart Rate After Covid) आहेत. टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या एका बातमीत, नारायणा हेल्थ सिटी, बंगळुरू येथील सल्लागार इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रवीण पी सदारमीन म्हणतात, ‘कोविड-19 हे हृदयासाठी एक मोठं संकट ठरू शकतं. वर्ल्ड हार्ट फेडरेशन (WHF) ने महामारीच्या सुरुवातीला भीती व्यक्त केली होती की कोविड -19 मुळे विविध समस्या वाढू शकतात, ज्यामुळे लोकांमध्ये हृदयाची इंफ्लामेटरी आणि इतर अनेक समस्या असू शकतात. मायोकार्डिटिस (Myocarditis) किंवा पेरीकार्डिटिसचाही (Pericarditis) त्रास होऊ शकतो. हेच कारण आहे की, वैद्यकीय तज्ज्ञ कोविडमधून बरे झाल्यानंतर हृदयाची चाचणी घेण्याची शिफारस करतात. , कोविड आणि हृदयाच्या ठोक्यांचा दर कोरोना संसर्गातून बरे झालेले अनेक लोक हृदयाचे ठोके वाढल्याच्या तक्रारी घेऊन येत आहेत. सामान्य हृदय गती 60 ते 100 च्या दरम्यान असते. काही कारणांमुळे ही गती अधूनमधून वाढू शकते, जरी संसर्गातून बरे झाल्यानंतर, बहुतेक लोकांमध्ये या प्रकारची समस्या कायम असल्याचे दिसून येते. याला वैद्यकीय भाषेत टाकीकार्डिया असे म्हणतात. कोविडमध्ये, बर्याच रुग्णांनी बरे झाल्यानंतरही जलद हृदयाचे ठोके जाणवणे यासारख्या अनेक हृदयाशी संबंधित समस्यांची तक्रार केली असून ही चिंतेची बाब आहे. टाकीकार्डियाबद्दल जाणून घ्या टाकीकार्डिया (Tachycardia) ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये हृदय गती वाढते; हे एकतर हृदयाच्या खालच्या कक्षेत सुरू होऊ शकते, ज्याला वेंट्रिकल्स म्हणतात किंवा वरच्या कक्षेत ज्याला अट्रिया म्हणतात. ज्यांना कोरोनाचा सौम्य-मध्यम स्तराचा संसर्ग झाला आहे अशा लोकांमध्येही हृदय विकार वाढण्याची समस्या दिसून येत आहे. सामान्यरित्या हृदय गती 95-100 पर्यंत वाढते. अनेक रुग्णांमध्ये, ही स्थिती काही काळानंतर बरी होते, जरी काहींमध्ये ती दीर्घकाळ टिकू शकते. जलद हृदयाचे ठोके राहिल्याने अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. हे वाचा - उरलेले साबणाचे तुकडे वापरून असा बनवा हँडवॉश; सॅनिटायझरवर फुकटचा खर्चच नको कोरोनामधून बरे झाल्यानंतर अनेकांना थोडेसे काम किंवा श्रम केल्यावरही हृदयाचे ठोके वाढताना दिसून येतात. ज्यांना कोरोनापूर्वी तासनतास काम करूनही थकवा येत नव्हता, त्यांना काही वेळातच दम लागतो, हृदयाचे ठोके वाढतात. अशा स्थितीत थोडे अंतर चालण्यासारख्या लहानशा शारीरिक हालचाली केल्यावरही हृदयाचे ठोके 95-100 पर्यंत वाढतात. बर्याच रुग्णांमध्ये ही स्थिती काही काळानंतर बरी होते, तर अनेकांमध्ये ती काही काळ टिकून राहते. तसेच, हृदयाशी संबंधित आजारांची पूर्वीची नोंद असलेल्या लोकांसाठी हृदयाचे ठोके चढ-उतार होणे धोकादायक आहे. हे वाचा - दिवसा झोपणं आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या झोपेविषयी माहिती अभ्यासाचे परिणाम द लॅन्सेटमध्ये प्रकाशित 2021 च्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, कोरोनामधून बरे झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात हृदयविकाराच्या समस्या निर्माण होण्याचा धोका तीन ते आठ टक्क्यांनी वाढला आहे. हा अभ्यास 87 हजार लोकांवर करण्यात आला, ज्यामध्ये 57 टक्के महिला होत्या. रक्ताच्या गुठळ्या आणि हृदयविकाराचा झटका येण्याच्या जोखमीत पुढील आठवड्यात सातत्याने घट झाल्याचेही आढळून आले परंतु किमान एक महिना ते उच्च राहिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.