मुंबई, 10 मे : शरीराला ऊर्जा देण्याचं, शरीर दणकट करण्याचं मुख्य काम प्रोटीन्स करतात, हे आपल्याला माहिती आहे. म्हणूनच फिटनेस इंडस्ट्रीत बॉडी बिल्डिंगसाठी (Body Building) म्हणजेच शरीर कमावण्यासाठी जे महत्त्वाचं पूरक साहित्य वापरलं जातं, त्यात प्रोटीन सप्लिमेंटचा (Protein Supplement) समावेश असतो. त्याला प्रोटीन पावडर असं म्हटलं जातं. प्रोफेशनल बॉडी बिल्डर असो किंवा अगदी नुकतंच या क्षेत्रात करिअर सुरू केलेला नवोदीत तरूण प्रत्येक बॉडी बिल्डर व्यायाम झाल्यानंतर प्रोटीन पावडर घेतात. मात्र याचा वापर करण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. धोकादायक परिणाम! स्नायूंच्या बळकटीसाठी प्रोटीन्सचं (Proteins) काम अत्यंत महत्त्वाचं असतं. अर्थात, प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात शरीरात गेले, तर ते शरीराला घातकही ठरू शकतात. कारण, ते पचवण्यासाठीही शरीराकडे विशिष्ट क्षमता असावी लागते. त्याव्यतिरिक्त, प्रोटीन पावडरचे काही साईड इफेक्ट्स (Side Effects of Protein Powder) अर्थात दुष्परिणामही असतात, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे. याबद्दलची माहिती देणारं वृत्त ‘आज तक’ने प्रसिद्ध केलं आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलने (Harvard Medical School) याबद्दलच्या एका संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात 134 प्रकारच्या प्रोटीन पावडर्सचं (Protein Powders) विश्लेषण करण्यात आलं. त्यात 130 प्रकारची घातक रसायनं आढळल्याचं त्या अहवालात म्हटलं आहे. खसखस खाल्ल्यानं वजन कमी होतं का? त्यातील पोषक घटक आणि फायदे जाणून घ्या क्लीन लेबल प्रोजेक्ट नावाच्या एका नॉन-प्रॉफिट ग्रुपने 2020 साली प्रोटीन पावडरमध्ये असलेल्या विषारी पदार्थांबद्दलचा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. त्यात 134 प्रोटीन पावडर प्रॉडक्ट्सची तपासणी करण्यात आली होती. त्यात 130 प्रकारची विषारी रसायनं असल्याचं आढळलं होतं. त्यात शिसं, आर्सेनिक, कॅडमियम, पारा असे धातू, बिस्फेनॉल ए, कीटकनाशकं आणि अन्य घातक रसायनांचा समावेश होता. त्या रसायनांमुळे कॅन्सर, तसंच अन्य दुर्धर आजार होण्याचा धोका वाढतो. एका प्रोटीन पावडरमध्ये बीपीएचं प्रमाण निर्धारित प्रमाणाच्या तब्बल 25 पट अधिक होतं. बीपीएचा वापर प्लास्टिकच्या निर्मितीत केला जातो. काही प्रोटीन पावडर्समध्ये विषारी पदार्थाचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हतं; मात्र तरीही त्यात विषारी पदार्थ नव्हतेच असं म्हणता येणार नाही. प्रोटीन सप्लिमेंट पावडर म्हणजे काय? नावाप्रमाणेच हे पावडर स्वरूपात असतं. कॅसीन, व्हे प्रोटीन अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ते उपलब्ध असतं. या पावडरमध्ये साखर, आर्टिफिशियल स्वीटनर्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचं मिश्रण केलं जातं. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या प्रोटीन पावडरच्या एका स्कूपमध्ये 10 ते 30 ग्रॅमपर्यंत प्रोटीन्स असू शकतात. हार्वर्ड मेडिकल स्कूलशी संलग्न असलेल्या ब्रिघम अँड वूमन हॉस्पिटलच्या न्यूट्रिशनिस्ट डिपार्टमेंटचे डायरेक्टर कॅथी मॅकमॅनस यांच्या सल्ल्यानुसार, ‘काही अपवाद वगळता प्रोटीन पावडरची शिफारस केली जात नाही. प्रोटीन पावडर घ्यायचीच झाली, तर ती तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच घ्यायला हवी.’ कॅथी म्हणतात की, ‘प्रोटीन पावडर घ्यायचीच झाली, तर ती केमिकल फ्री घ्यायला हवी. तसंच, डॉक्टर किंवा तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच ती घ्यायला हवी. तसंच, शक्यतो प्रोटीन सप्लिमेंटपेक्षा प्रोटीन भरपूर असणारे खाद्यपदार्थ खाणं जास्त श्रेयस्कर असतं,ट असं कॅथी सांगतात. अंडी, नट्स, मांस, दही, डाळी, बीन्स, मासे, पनीर आदी पदार्थ आहारात असावेत, असं कॅथी यांचं म्हणणं आहे. शिजवलेल्या अन्नावर वरुन कच्चे मीठ घेऊ नये, अन्यथा होऊ शकतो गंभीर आजार प्रोटीन पावडर घ्यायचीच झाली तर त्याचे साइड इफेक्ट्स असतात हे लक्षात घेऊन त्याचं सेवन करायला हवं. प्रोटीन पावडरमुळे पचनाशी निगडित समस्या निर्माण होऊ शकतात. बहुतांश प्रकारच्या प्रोटीन पावडर्स दुधाच्या साह्याने तयार केल्या जातात. ज्यांना डेअरी प्रॉडक्ट्सची अॅलर्जी आहे, ज्यांना लॅक्टोज पचवता येत नाही, त्यांना प्रोटीन पावडरमुळे अपचनाचा त्रास होतो. काही प्रोटीन पावडर्समध्ये साखर खूप कमी असते, तर काहींमध्ये खूप जास्त. जास्त साखर असल्यास शरीरावर दुष्परिणाम होतात. कॅलरीज वाढतात, वजन वाढतं, ब्लड शुगर लेव्हलही वाढते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या शिफारशीनुसार, महिलांनी प्रति दिन 24 ग्रॅम, तर पुरुषांनी 36 ग्रॅम एवढीच साखर खाणं अपेक्षित आहे. त्यापेक्षा जास्त साखर शरीरात गेल्यास साहजिकच त्रास होतो. त्यामुळे प्रोटीन पावडर घेताना या सगळ्या बाबी लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे, असा सल्ला कॅथी यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.