मुंबई, 07 सप्टेंबर: हरितालिका व्रताला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, सुख आणि समृद्धीसाठी निर्जळी उपवास करून व्रत करतात. हे व्रत अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी भगवान शंकर (Lord Shiva) आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेदिवशी हरितालिका उपवास केला जातो. या दिवसाला ‘हरितालिका तीज’ असंही म्हणतात. यंदा हरतालिका 9 सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा हरितालिकेदिवशी सुमारे 14 वर्षांनंतर रवीयोगाचा दुर्मिळ योगायोग आला आहे. या तृतीयेला उपवास आणि पूजा केल्याने विवाहित लोकांच्या इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते.
हरितालिकेचा उपवास हा तसा सर्वात कठीण उपवास मानला जातो. हे व्रत अंत्यत शुभ आहे, असं मानलं जातं. यंदा या हरितालिकेला 14 वर्षानंतर चित्रा नक्षत्रामुळे रवी योग आला आहे. हा शुभयोग 9 सप्टेंबरला दुपारी 2.30 ते दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला दुपारी 12.57 वाजेपर्यंत राहील. हरितालिका व्रताच्या पूजेची सर्वात शुभ वेळ सायंकाळी 5.16 ते सायंकाळी 6.45 वाजेपर्यंत असेल. तर, शुभ वेळ 6.45 ते 8.12 वाजेपर्यंत असेल.
हे वाचा-Video या पद्धतीने तयार केले तर कधीच फुटणार नाहीत उकडीचे मोदक; पाहा सोप्या Tricks
हरितालिका व्रत केल्याने पतीला दीर्घायुष्य लाभतं. तसंच असं म्हणतात की अविवाहित मुलींनी हे व्रत केलं तर त्यांना सुयोग्य पती मिळतो आणि त्यांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होतात.
हरितालिकेच्या पूजेची पद्धत
1. या तृतीयेला श्री गणेश, भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते.
2. सर्वप्रथम मातीपासून तिघांच्या मूर्ती तयार करा आणि गणपतीला गंध लावून दूर्वा अर्पण करा.
3. यानंतर, भगवान शिव यांना फुलं, बेलपत्र आणि शमीपत्री अर्पण करा आणि देवी पार्वतीला शृंगाराचं आणि सौभाग्याचं लेणं अर्पण करा.
4. श्री गणेश, भगवान शिव आणि माता पार्वती या तिन्ही देवतांना वस्त्र अर्पण करून तिज व्रत कथा ऐका किंवा वाचा.
5. यानंतर, गणपती, भगवान शिव आणि माता पार्वतीची आरती करा, आणि नैवेद्य दाखवा.
हे वाचा-महागड्या साड्यांची ‘या’ पद्धतीने घ्या काळजी; टिकतील वर्षानुवर्षं
दरम्यान विविध ठिकाणांप्रमाणे पूजेच्या पद्धतीही वेगवेगळ्या असू शकतात. ही तृतीया साजरी करण्यामागे अशी अख्यायिका आहे की, भगवान शंकरांना वर म्हणून मिळवण्यासाठी देवी पार्वतीने सर्वांत आधी हरितालिकेचं व्रत केलं होतं. पार्वतीच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शंकराने देवी पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला होता. हे व्रत लक्षावधी स्रिया श्रद्धेने करतात आणि ते केल्याने इच्छित मनोरथं पूर्ण होतात असा त्यांचा अनुभव आहे. आपणही हा अनुभव घेऊन बघू शकता.
(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.