मुंबई, 14 नोव्हेंबर : 2020 हे वर्ष सर्वांसाठीच खूप भयानक ठरलं आहे. या वर्षी कोरोनाने (Coronavirus) मोठ्या प्रमाणात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर वातावरणात देखील मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे यावर्षी प्रदूषणाच्या माध्यमातून यामध्ये आणखी भर टाकण्याची कुणाचीही इच्छा नाही. दिवाळीला सुरुवात झाली असून 16 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच भाऊबीजेपर्यंत दिवाळी साजरी केली जाणार आहे. दिवाळीच्या या दिवसांचा आनंद घ्या पण दिवाळीनंतरचं आयुष्य खरंच हॅपी हवं असेल तर पाच गोष्टींकडे लक्ष द्या. दिवाळी आणि फटाके असं समीकरण झालं असलं, तरी ते या वर्षी तरी टाळलं पाहिजे.त्यामुळे प्रदूषणामध्ये मोठी भर पडते. कोविड काळात प्रदूषण परवडणारं नाही.
या काही गोष्टींच्या आधारे तुम्ही प्रदूषण कमी होण्यास मदत करू शकता
1) फटाके फोडू नका :
दिवाळीमध्ये फटाके फोडण्याचे प्रमाण वाढणार आहे. दिवाळीमध्ये आनंद साजरा करण्यासाठी फटाके फोडले जातात. परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने हे घातक देखील आहे. फटाक्यांच्या धुराने हवेतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या दिवाळीत फटाके न फोडता दिवाळी साजरा करण्याचा प्रयत्न करून पर्यावरणाच्या संरक्षणाला तुम्ही हातभार लावू शकता.
2) एकवेळ वापरून टाकून देण्याच्या वस्तू वापरणे टाळा:
प्लास्टिक सारख्या वस्तू पर्यावरणाला घातक आहेत. त्यामुळे या दिवाळीत प्लॅस्टिकच्या वस्तू वापरणे टाळा. त्यामुळे दिवाळीत सजावटीसाठी प्लॅस्टिकच्या वस्तू न वापरता ऑरगॅनिक आणि निसर्गोपयोगी वस्तू वापरून तुम्ही सजावट करू शकता.
3) लाऊडस्पिकर वापरणे टाळा
दिवाळी पार्टी हा दिवाळीमधील मोठा उत्सव आहे. या पार्टीमध्ये मोठ्या आवाजात लाऊडस्पिकर लावून गाणी ऐकली जातात. त्यामुळे या दिवाळी पार्टीत मोठ्या आवाजाचे लाऊडस्पिकर न वापरता ध्वनी प्रदूषण तुम्ही टाळू शकता.
4)केमिकल असणारे रांगोळीचे रंग वापरू नका
दिवाळी हा दिव्यांचा सण मानला जातो. त्याचबरोबर दिवाळीमध्ये सुख आणि समृद्धी देखील येते. साधारणपणे रांगोळीसाठी वापरले जाणारे रंग हे इकोफ्रेंडली नसतात. त्यामुळे हे रंग वापरल्याने पर्यावरणाला हानी पोहोचू शकते. त्यामुळे या दिवाळीत नैसर्गिक रंग वापरून तुम्ही निसर्गाचं रक्षण करू शकता.
5) घरामध्ये झाडे लावा
घरामध्ये आणि घराच्या आजूबाजूला जास्तीतजास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करा. झाडांमुळे मोठ्या प्रमाणात शुद्ध हवा मिळते. केवळ प्रदूषित हवेपासून तुमची यामुळे सुटका होणार नसून आजूबाजूला शुद्ध हवा देखील खेळती राहणार आहे.