"Hand Sanitizer जास्त वापरू नका", आता केंद्र सरकारनेच नागरिकांना केलं सावध
एकिकडे केंद्र सरकारने कोरोनापासून बचाव करण्यासाठी हँड सॅनिटायझर (hand sanitizer) वापरण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे त्याच्या अधिक वापराने होणाऱ्या दुष्परिणामांबाबतही नागरिकांना सावध केलं आहे.
नवी दिल्ली, 27 जुलै : कोरोनाव्हायरसपासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी साबणाने हात धुण्याचा किंवा सॅनिटायझर (Hand Sanitizer) वापरण्याचा सल्ला दिला जातो आहे. मात्र साबणाने हात धुण्यापेक्षा लोक हँड सॅनिटायझरचाच जास्त वापर करत आहेत. असं वारंवार हँड सॅनिटायझर वापरल्याने त्वचेला नुकसान होऊ शकतं, त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात असं याआधी अनेक तज्ज्ञांनी सांगितलं आहे. आता केंद्र सरकारनेही नागरिकांना याबाबत सावध केलं आहे.
हँड सॅनिटायझरचा जास्त वापर हानिकारक ठरू शकतो, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (central health ministry) म्हटलं आहे. सॅनिटायझरपेक्षा साबणाचा वापर करावा, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
These are unprecedented times, no one thought that a virus outbreak, of this nature, will occur. Use masks to protect yourself, drink hot water frequently & wash hands rigorously. Don't overuse sanitizers: Dr RK Verma, Add. Director-General of Health Services, Ministry of Health pic.twitter.com/1Rwx0wduf0
आरोग्य विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. आर. के वर्मा म्हणाले, ही अभूतपूर्व अशी वेळ आहे. एखाद्या व्हायरसचा इतका प्रकोप होईल याचा कुणी विचारही केला नव्हता. स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करा. गरम पाणी प्या आणि हात नीट धुवा, सॅनिटायझरचा जास्त वापर करू नका.
तज्ज्ञांच्या मते, सॅनिटाझरचा जास्त वापर केल्याने त्वचेवरील चांगल्या बॅक्टेरियांचाही नाश होऊ शकतो. साबण आणि पाणी असेल तर त्यानेच हात धुवा. साबण नसेल तेव्हाच सॅनिटायझरचा वापर करा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
बॉम्बे हॉस्पिटलमधील कन्सलटंट फिजिशिअन डॉ. गौतम भन्साळी यांनी ‘न्यूज 18 लोकमत’शी बोलताना सांगितलं की, "प्रत्येक वेळी हँड सॅनिटायझर वापरायला हवं असं नाही. हँड सॅनिटायझरचा अति वापर केल्यानं स्किन इन्फेक्शन, स्किन अॅलर्जी होते. त्यामुळे काही कारण नसताना, गरज नसताना हँड सॅनिटायझर वापरू नका."
"सर्दी, खोकला असलेली व्यक्ती तुमच्या संपर्कात आल्यास, अशा व्यक्तींचं सामान उचलल्यास, गर्दीत एखादी अशी संशयित व्यक्ती दिसल्यास तुम्ही हँड सॅनिटायझर वापरायला हवं. जेणेकरून खोकल्यानंतर आणि शिंकल्यानंतर उडणारे थेंब तुमच्या हातामार्फत तुमच्या शरीरात जाणार नाहीत. शिवाय जेवणाच्या आधी आणि जेवणानंतरही तुम्ही हँड सॅनिटायझर वापरू शकता. मात्र वारंवार वापरणं चांगलं नाही", असा सल्ला डॉ. भन्साली यांनी दिला.