मुंबई, 7 फेब्रुवारी : कर्करोग ( Cancer) हा प्राणघातक आजार असल्याचं सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे कॅन्सरबद्दल सर्वांच्या मनात एक वेगळीच भीती दिसून येते. त्यामुळेच की काय, या विषयावर जास्त बोललं जात नाही. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. यातलाच एक प्रकार म्हणजे पोटाचा कर्करोग होय. पोटाचा कर्करोग हा अनेकांना होता. कॅन्सरची लक्षणं दिसून आल्यावर वेळीच उपाय केल्यास यापासून बचाव होऊ शकतो. यासाठी पोटाच्या कर्करोगाची काही लक्षणं (Stomach Cancer Symptoms) आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. जठराच्या (gastric cancer) कर्करोगाला पोटाचा कॅन्सर म्हटलं जातं. अन्ननलिकेतून जाणारं अन्न पोटाच्या वरच्या एका भागात साठवलं जातं. त्यालाच जठर म्हणतात. तिथल्या रसांमुळे अन्न पचवण्यास मदत होते; पण पोटाच्या पेशींच्या डीएनएमध्ये समस्या उद्भवते, तेव्हा पोटाचा कर्करोग होतो. जेव्हा या पेशी अनियंत्रितपणे वाढतात, तेव्हा पोटाचा कर्करोग होतो. पोटाचा कर्करोग झाला आहे, हे काही लक्षणांच्या आधारे ओळखलं जातं. अपचन, जळजळ होणं, भूक न लागणं, वजन कमी होणं, रक्त कमी होणं, पोटदुखी, अस्वस्थता, काळ्या रंगाचं मलविसर्जन होणं, पोट भरल्यासारखे वाटणं, मळमळ, उलट्या होणं आणि पोटाच्या वरच्या भागात वेदना जाणवणं ही पोटाचा कर्करोग झाल्याची लक्षणं असू शकतात. ही लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. ( …आणि मुंबईतला कोरोना थेट युपी-बिहारमध्ये पोहोचला’, पंतप्रधानांचा लोकसभेत गंभीर आरोप ) कर्करोगाचं निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाल्यास तो रुग्ण बचावण्याची किंवा बरा होण्याची शक्यता वाढते. यामुळे या रुग्णावर उपचार करण्यास डॉक्टरांना पुरेसा वेळ मिळतो व रुग्णही आणखी काही वर्षं जीवन जगू शकतो. यासाठी कर्करोगाची लक्षणं दिसल्यानंतर त्याचं निदान करण्यासाठी काही चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांतून रोगनिदान अचूक करता येतं. यातली महत्त्वाची चाचणी ही रक्तचाचणी असते. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर रक्त तपासणी करावी. अप्पर एन्डोस्कोपीतून शरीराच्या आत होणाऱ्या प्रक्रियेची माहिती मिळते. एन्डोस्कोपीच्या मदतीने अन्ननलिका, लहान आतडं आणि अन्ननलिकेमध्ये होणारे बदल जाणून घेतले जातात. याशिवाय, बायोप्सी चाचणीत कर्करोगाचं निदान केलं जातं. या चाचणीत शरीरातल्या काही टिश्यूजचे नमुने घेतले जातात आणि त्यांची तपासणी केली जाते. तसंच सीटी स्कॅनद्वारेदेखील पोटाचा कर्करोग झाला आहे का, हे तपासलं जातं. कर्करोगाचं निदान ओटीपोटाच्या अल्ट्रासाउंड चाचणीद्वारेही करण्यात येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.