मुंबई, 28 एप्रिल : कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत (Corona second wave) रुग्णांना ऑक्सिजन पातळीत (Oxygen level) घट होण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. सगळ्यात मोठी चिंतेची बाब म्हणजे हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen shortage) आहे. संपूर्ण देशभरातच ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen crisis) असून सरकारही ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर शरीरातली ऑक्सिजनची पातळी घरच्या घरी वाढवण्याासाठी उपयुक्त ठरू शकतील, अशा काही उपाययोजना सांगत आहोत.
द वेलनेस कॉर्नर वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, शरीरातल्या लाल रक्तपेशींवर कोरोना विषाणूचा प्रभाव पडत असल्यामुळे कोविड-19 रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी घटत आहे. हा विषाणू हृदय, फुप्फुसं आणि मांसपेशींवर दुष्परिणाम करतो.
घरच्या घरी शरीरातला ऑक्सिजन वाढवण्याच्या पद्धती
1. बॉडी पोझिशनिंग/प्रोन पोझिशनिंग (Body Positioning/Prone Positioning)
शरीरातल्या ऑक्सिजनच्या पातळीत अचानक झालेली घट भरून काढण्याच्या प्रभावी उपायांमध्ये याचा समावेश होतो. श्वास लागण्याची समस्या ज्यांना असते, तशाच समस्येला सध्या कोरोना रुग्णांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे काळजीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक हॉस्पिटल्सनीही रुग्णांना प्रोन पोझिशनमध्ये ठेवायला सुरुवात केली आहे.
हे वाचा - सकारात्मक विचार आणि पोटावर झोपणे या जोरावर 82 वर्षीय आजींची कोरोनावर मात
प्रोन पोझिशनिंग म्हणजे रुग्णांना पोटावर झोपायला सांगितलं जातं. त्यामुळे रक्तप्रवाह फुप्फुसाच्या वेगवेगळ्या भागांत पोहोचतो आणि लवकरात लवकर शरीराच्या दुसऱ्या भागांतही पोहोचू शकतो. त्यामुळे ऑक्सिजनची पातळीही वाढते.
2. कॉर्नर पेक स्ट्रेच/चेस्ट वॉल स्ट्रेचिंग (Corner Peck Stretch/Chest Wall Streching)
हा व्यायाम फुप्फुसांच्या क्षमतेत सुधारणा करतो. अडथळे (Blockage)दूर करण्यास मदत करतो आणि मेंदूला आवश्यक त्या मात्रेत ऑक्सिजनही पाठवतो.
भिंतीसमोर उभं असतानाच्या स्थितीत सुरुवात करावी. हात कोपरात दुमडून आपल्या बाजूने 90 अंशांच्या कोनात दोन बाजूंना दोन हात ठेवावेत. खांद्यांना खेचल्यासारखं वाटेपर्यंत शरीर पुढे ढकलावं. 120 अंशांच्या कोनातून आपल्या बाहूंसह हा खेचण्याचा व्यायाम पुन्हा करावा. हा व्यायाम 30 ते 60 सेकंदांसाठी दिवसातूनअनेकदा करावा.
3. 90/90 ब्रीदिंग एक्सरसाइज/हिप लिफ्ट (90/90 Breathing Exercise/Hip Lift)
श्वास घेण्यात काही समस्या असेल, तर त्यात सुधारणा करण्यासाठी हा एक चांगला व्यायाम आहे. हे तंत्र मांसपेशींची ताकद वाढवतं. आपला एक हात पोटावर, तर दुसरा छातीवर ठेवावा. जमिनीवर झोपावं आणि आपले पाय खुर्चीवर ठेवावेत. दीर्घ श्वास घ्यावा आणि पोटात हवा भरून घ्यावी. त्यानंतर श्वास सोडावा आणि हीच क्रिया पुन्हा करावी.
4. क्वाड्रुपेड ब्रीदिंग (Quadruped Breathing)
गुडघे आणि हात जमिनीवर टेकवून लहान मुलं घोडा करतात त्याप्रमाणे राहावं. पूर्ण श्वास घ्यावा आणि तीन सेकंद त्याच स्थितीत राहावं. त्यानंतर पुन्हा पूर्वीच्या स्थितीत यावं. नंतर पुन्हा श्वास घ्यावा. असं 10 वेळा करावं.
हे वाचा - घरीच कोरोनावर उपचार घेताना शरीरातील Oxygen कमी झाल्यास नेमकं काय करावं? पाहा हा VIDEO
यासगळ्या उपायांव्यतिरिक्त आहारात हिरव्या पालेभाज्या आणि व्हिटॅमिन्स, मिनरल्सनीयुक्त असलेली ज्यूस असावेत. त्यातून शरीराला ऑक्सिजन मिळतो आणि श्वास घेण्यातही त्याचं साह्य होतं. लोहाचं प्रमाण जास्त असलेले मांस, चिकन, फळं आदी पदार्थ आहारात ठेवावेत. त्यामुळे रक्तात ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Health, Health Tips, Oxygen supply