कोल्हापूर 29 जून: आषाढी एकादशीला महाराष्ट्रातील लाखो लोक उपवास करत असतात. घरी उपवास असला की, उपवासाचे पदार्थ बनविण्यासाठी गृहिणींची लगबग असते. मात्र दरवेळच्या शाबूच्या खिचडीपेक्षा थोडा अजून चविष्ट एक पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा. कोल्हापुरात असाच एक चविष्ट साबुदाणा वडा प्रसिद्ध आहे, जो अगदी 2 मिनिटांत बनवून खवय्यांना खायला दिला जातो. याच साबुदाणा वड्याची पाककृती गृहिणींना खूप उपयोगी पडणारी अशी आहे. कोल्हापूरच्या भवानी मंडप परिसरात तुळजाभवानी वडापाव सेंटर हे एक छोटसं दुकान आहे. गेली चार-पाच वर्षे या ठिकाणी बेबी महादेव पाटील या विविध नाष्टांचे पदार्थ बनवून विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांचा मोठा मुलगा अजित रिक्षा चालवतो. तर दुसरा मुलगा संदीपचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. या दोन्ही मुलांच्या पत्नी पूनम आणि मधुरा या दोन्ही सूना आपल्या सासूला या नाष्टा सेंटरवर मदत करत असतात.
साबुदाणा वडा दिसायला मोठा आणि चवीलाही उत्तम खरंतर अगदी घरात जसे बनवतात त्याच पद्धतीने बेबी पाटील यांनी या नाष्टा सेंटरवर पदार्थ बनवायला सुरुवात केली. त्यांपैकी साबुदाणा वडा हा बऱ्याच खव्याच्या पसंती उतरला आणि बघता बघता सर्वत्र या वड्याची सर्वात मोठा साबुदाणा वडा म्हणून ख्याती पसरली. हा मोठाला साबुदाणा वडा दिसायला जरी मोठा असला तरी चवीलाही उत्तम आहे. त्यामुळेच या ठिकाणी दिवसभर गर्दी बघायला मिळते. काय काय लागते साहित्य? हा साबुदाणा वडा बनवण्यासाठी भिजवलेले साबुदाणे, मिरचीचा ठेचा किंवा अगदी बारीक चिरलेल्या मिरच्या, उकडून कुस्करून घेतलेला बटाटा, थोडेसे शेंगदाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ इतकेच साहित्य लागते. साबुदाणा वड्याची कृती 1) साबुदाणे स्वच्छ धुऊन घेऊन साधारण दोन ते तीन तास भिजत ठेवावेत. यावेळी जितके साबुदाणे तितकेच पाणी घ्यावे. 2) साधारण पाव किलो साबुदाण्यांसाठी एक मोठा बटाटा उकडून तो कुस्करून घ्यावा. 3) साबुदाण्यामध्ये कुस्करलेला बटाटा घेऊन त्यात अगदी बारीक चिरलेल्या मिरच्या किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला कमी अधिक तिखट पाहून टाकावा. 4) त्यानंतर थोडे मोठे असे शेंगदाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ भरून टाकावे. 5) सर्व मिश्रण एकजीव करून पाणी न घालता थोडे घट्ट मळून घ्यावे. 6) या तयार मिश्रणाचे आपल्याला हवे असतील तसे, (जाड किंवा पातळ आणि मोठे) असे वडे तयार करून तेलात तळून घ्यावेत. 7) साधारण तांबूस रंग आल्यानंतर वडे बाहेर काढून खोबऱ्याच्या चटणीबरोबर खावेत
Ashadhi Wari 2023: आषाढी एकादशीच्या उपवासाला भगर घेताय? आधी हे पाहा
बेबी पाटील यांच्या नाष्टा सेंटरवर हे अगदी साध्या पद्धतीने बनवलेले मोठाले साबुदाणा वडे ग्राहकांना प्रचंड आवडतात. या वड्यांची किंमत देखील फक्त 15 रुपये असल्यामुळे कमी किंमतीत पोटभर आणि चविष्ट नाष्टा या ठिकाणी मिळतो. साबुदाणा वड्यासह वडापाव, मसाला टोस्ट यांच्या किंमती देखील 15 रुपये आहेत. कांदा, मिरची आणि पालक भजी 25 रुपयांना मिळतात. तर पॅटीस 20 रुपयांना याठिकाणी मिळतात. हे सेंटर 7 ते रात्री 8 पर्यंत असे या सेंटरची वेळ आहे.
पत्ता : तुळजाभवानी वडापाव सेंटर, तुळजाभवानी मंदिरा समोर, भवानी मंडप, कोल्हापूर - 41600002 संपर्क (अतुल पाटील ) : +91 9588484708