अहमदनगर, 25 जुलै: पावसाळा सुरू झाला की डोंगर कपाऱ्यांत आणि इतर ठिकाणीही आयुर्वेदिक अशा रानभाज्या येतात. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्याचा बाजार रविवारी भरत असून हा बाजार विविध दूर्मिळ रानभाज्यांनी फुलून गेला आहे. डोंगर कपाऱ्यात राहणाऱ्या महिला विविध ठिकाणांहून या आयुर्वेदिक रानभाज्या गोळा करून या आठवडा बाजारात आणतात. या भाज्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत असते. अकोले आठवडी बाजारात रानभाजी गेल्या कित्येक वर्षांपासून अकोले तालुक्याचा मुख्य बाजार दर गुरुवारी भरत होता. मात्र, सध्या येथील बाजार तळाचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या हा बाजार तात्पुरत्या स्वरुपात अगस्ती विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी भरत आहे. नियमितपणे या आठवडी बाजारात फळभाज्या, पालेभाज्या व इतर दैनंदिन वस्तू विक्रीसाठी येत असतात. मात्र, पावसाळ्यात रानावनात येणाऱ्या दूर्मिळ रानभाज्या बाजारात दाखल होतात. त्या खरेदीसाठी लोकांची लगबग सुरू असते.
आदिवासी महिला विकतात रानभाज्या पावसळा सुरु झाली की रानात माळावर रानभाज्या उगवायला सुरुवात होत असते. तालुक्यातील आदिवासी महिला भर पावसाळ्यात या भाज्या रानावणातून शोधून आठवडे बाजारात घेऊन येतात. या रानभाज्या किंवा जंगली भाज्या केवळ पावसाळ्यात मिळतात. या भाज्या अतिशय पौष्टिक असतात. आरोग्य वर्धक आणि बहुगुणी असतात. यात कार्बोहायड्रेट, प्रोटिन, सॅपोजेनिन, सॅपोनिन, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम असतं, असं आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात. बाजारात कोणत्या रानभाज्या? सध्या अकोले आठवडे बाजारात प्रामुख्याने कोळू, माठ, अंबाडी, शिंदड माकड आणि तांदुळसा या रानभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे या आयुर्वेदिक व नैसर्गिक रानभाज्या खरेदी करण्यासाठी शहरातील ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. तालुक्यातील देवठाण, तळेगाव, माळीझाप, कळस तसेच इतरही भागांतून आदिवासी बांधव या भाज्या घेऊन चार पैसे कमविण्याची उद्देशाने बाजारात येत आहेत. बीटचा पराठा कधी खाल्लाय का? पाहा सोपी रेसिपी Video या भाज्या खाल्ल्यात का? नुकतीच रानावनात मिळणारी कोरळा या भाजीला फोडशी, कुळी किंवा कुबळी म्हटलं जातं. लांबट पातीसारखी ही भाजी असते. याची भाजी, थालीपीठ बनवल जातं. यानंतर अकोले बाजारात उपलब्ध झालेली भाजी म्हणजे अंबाडी. अंबाडीच्या पानांची भाजी केली जाते. ही भाजी अतिशय चवदार असते. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. तसेच शिंदड माकड, माठ, चाई तांदूळसा यांसारख्या आयुर्वेदिक रानभाज्या घेऊन तालुक्यातील आदिवासी बांधव बाजारात येत आहेत.