मुंबई, 09 सप्टेंबर : मी फिट (Fit) आणि हेल्दी (Healthy) आहे, असं आपण म्हणतो. सामान्यपणे आपण दोन्ही शब्दांना एकाच पारड्यात तोलतो. पण तुम्हाला माहिती आहे का? फिट (Fitness) आणि हेल्दी असणं हे एकसारखं नाही नाही. हे दोन्ही एकमेकांशी संबंधित असले तरी त्यांच्यातील वेगळेपण दाखवणारी एक पुसटशी रेष आहे. या दोन्हीमध्ये एक छोटासा फरक आहे आणि हा फरक तुम्हाला माहिती असायलाच हवा.
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर तर फिटनेसची अधिकच चर्चेत आलं. आजच्या पिढीतल्या तरुणांना सेलेब्रिटीजना पाहून त्यांच्याप्रमाणे बॉडीबिल्डिंग करायची हौस असल्याचं दिसून येतं. त्यामुळे अनेक जण कित्येक तास जिममध्ये घालवताना दिसून येतात; पण डॉक्टर्सचं असं म्हणणं आहे, की प्रत्येकाने आपापल्या पेशानुसार आणि प्रकृतीनुसार याचा विचार केला पाहिजे. तसंच, जिममध्ये जितका जास्त व्यायाम केला जाईल, त्याला तितक्याच पोषणाची जोड देणंही महत्त्वाचं असतं. गरजेपेक्षा जास्त व्यायाम करणं हृदयविकाराचा धोका वाढवतं, असं डॉक्टर्सना वाटतं.
झी न्यूजच्या रिपोर्टनुसार दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमधल्या हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर अश्विनी मेहता म्हणतात, '24 तासांतले एक किंवा दोन तास जिममध्ये घालवले जातात आणि बाकीच्या 22-23 तासांच्या रुटीनकडे दुर्लक्ष केलं जातं. त्या कालावधीतली तुमची जीवनशैली चांगली नसेल, तर व्यायामाचा काहीही उपयोग नाही. झपाट्याने फरक दिसला नाही, की लोक शॉर्टकट शोधू लागतात. एखादा बॉडीबिल्डर तीन-चार तास जिममध्ये घालवत असेल, तर त्याच्यासाठी ते आवश्यकच असतं; पण याचा अर्थ असा नव्हे, की ऑफिसमध्ये 9-10 तास बसून काम करणाऱ्या व्यक्तींनीही तितकेच तास जिममध्ये घालवले पाहिजेत. त्याला न्यूट्रिशनची जोड दिली, तरच फरक दिसतो. हे सर्वस्वी लाइफस्टाइलवर अवलंबून असतं.'
हे वाचा - Explainer : फक्त चालण्यानेच कसं फिट आणि हेल्दी राहतं संपूर्ण शरीर?
स्टेरॉइड्स वापरणं शरीरासाठी चांगलं नसतं. तरीही अनेक जण ऑनलाइन ते मागवून त्याचा बॉडीबिल्डिंगसाठी वापर करतात. पडद्यावर सिक्स पॅक्स अॅब्ज असलेल्या हिरोला पाहून सगळे जण आकर्षित होतात; मात्र शरीरदेखील एखाद्या यंत्राप्रमाणेच आहे आणि त्यावर आवश्यकतेपेक्षा जास्त ताण आला, तर त्यात बिघाड होणारच, ही बाब लक्षात घेणारे फार थोडेच असतात. म्हणून तज्ज्ञ म्हणतात, की ज्याचा दीर्घकाळासाठी उपयोग होणार आहे, अशा पर्यायाचा विचार करावा. शॉर्टकटच्या भानगडीत पडू नये.
फिटनेस ही कोणतीही रेस नाही, हे लक्षात घेण्याचं आवाहन तज्ज्ञ करतात. कारण बाहेरून फिट दिसणं आणि असण्याच्या शरीर आतून हेल्दी असण्याशी संबंध नसल्याचं सांगितलं जातं. आपल्या शरीराच्या गरजेनुसार व्यायाम करायला हवा. व्यायामासाठी जिममध्येच जायला हवं असं काही नाही. तीन-चार महिने व्यायाम करून फिट होता येतं; मात्र आरोग्यपूर्ण जीवन जगणं ही काही महिन्यांची नव्हे, तर आयुष्यभराची प्रक्रिया आहे, असं तज्ज्ञ सांगतात. म्हणून फिटनेस एक्स्पर्ट आणि डॉक्टर्सचा सल्ला घेऊनच व्यायाम करणं श्रेयस्कर.
हे वाचा - एक झोका... घ्या झोपळ्यावर बसण्याचा आनंद! आरोग्याला होईल बराच फायदा
बंगळुरूतले फिटनेस एक्स्पर्ट बीजी नाथन मिक्स्ड मार्शल आर्ट शिकवतात. अनेक जण केवळ लोकांना दाखवण्यासाठी आपण फिट असल्याचं सांगत असतात, दाखवत असतात, असं ते म्हणतात. बायसेप्स आणि मसल्ससह उत्तम लूक असणं आणि शरीर आतून तंदुरुस्त असणं यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, असंही ते आवर्जून नमूद करतात.
मुंबईतले जयेश गेली 15 वर्षं स्काइझ जिममध्ये ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत. त्यांची जिम अंधेरीत असल्याने टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीशी निगडित अनेक सेलेब्रिटीज त्यांच्या जिममध्ये येतात. जयेश म्हणतात, की व्यायाम आपल्या लाइफस्टाइलनुसार करायला हवा, दुसऱ्यांना पाहून किंवा त्यांच्याप्रमाणे बनण्यासाठी नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fitness, Health, Siddharth shukla