Home /News /lifestyle /

मासे आणि दूध एकत्रितपणे खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या त्यामागचं खरं कारण

मासे आणि दूध एकत्रितपणे खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या त्यामागचं खरं कारण

एकूणच काय खावं आणि काय खाऊ नये, याबाबत आधीच्या पिढ्यांकडून चालत आलेला वारसा आणि सध्याच्या बदललेल्या खाण्याच्या आवडी यात मोठी तफावत आढळते.

नवी दिल्ली, 25 मे: भारतात विविध ठिकाणच्या विविध खाद्यसंस्कृती आहेत. त्यांची निरनिराळी वैशिष्ट्यं आहेत. त्यानुसार त्यातील अन्नघटक, त्यांचा वापर आणि परिणाम यांच्याबाबत मतभिन्नता आहे. एकूणच काय खावं आणि काय खाऊ नये, याबाबत आधीच्या पिढ्यांकडून चालत आलेला वारसा आणि सध्याच्या बदललेल्या खाण्याच्या आवडी यात मोठी तफावत आढळते. त्यापैकीच एक म्हणजे दूध आणि मासे (Milk and Fish) यांचा एकत्रित वापर करावा की नाही. माशांसोबत दूध पिऊ नये, असा अनेकांचा समज आहे. तो योग्य की अयोग्य हे जाणून घेण्याचा प्रयत्न टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात केला आहे. मासे आणि दूध एकत्र खाल्ल्याने त्वचाविकार किंवा काही गंभीर आजार होतात की नाही, याबाबत सविस्तर जाणून घेऊया. आयुर्वेदात काय म्हटलंय? दूध हा प्राणीजन्य पण शाकाहारी पदार्थ असून मासे हे मांसाहारी प्रकारात मोडतात. या दोन्ही खाद्यपदार्थांची प्रकृती भिन्न असल्यानं त्यांचा एकत्रित वापर करू नये, असं आयुर्वेदात (Ayurveda) सांगितलं आहे. शरीरासाठी दूध थंड असतं तर माशांमुळे शरीरात उष्णता निर्माण होते. अशा पद्धतीनं दोन भिन्न प्रकृतीच्या पदार्थांची मिसळ केली, तर शरीरात विविध घातक रसायने तयार होतात आणि त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली नाही, अशांनी अशा प्रकारचं जेवण करू नये, असं आहारतज्ज्ञ सांगतात. अनेक आहारतज्ज्ञही आयुर्वेदातील खाद्यपद्धतींनुसार जेवण्यासाठी आग्रही असतात. दूध व मासे या दोन्हींमध्ये भरपूर प्रथिनं (Proteins) असतात, पण या प्रथिनांचं शोषण शरीरात वेगवेगळ्या पद्धतीनं होतं. त्यामुळे त्यांचं एकत्रित सेवन योग्य नसल्याचं तज्ज्ञ म्हणतात. शास्त्रीय कारणं काय? स्वयंपाकात कोणकोणत्या पदार्थांचा वापर एकत्रित करावा, किंवा करू नये, याबाबत काही समज-गैरसमज असतात. कधीकधी त्यात काहीही तथ्य नसतं. केवळ पूर्वापार हे असंच चालत आल्यानं आपणही ते करत असतो. दूध व मासे याबद्दलही असाच गैरसमज आहे. दूध व माशांचा वापर करून केलेले पदार्थ आजारांचं कारण होत असल्याबाबत आजवर कोणतेही दाखले मिळालेले नाहीत. शास्त्रीयदृष्ट्या केवळ या दोन खाद्यपदार्थांची अ‍ॅलर्जी असली, तरच काही समस्या उद्भवू शकतात. या दोन्ही खाद्यपदार्थांमध्ये भरपूर पोषणमूल्यं आहेत. त्यामुळेच काही खाद्यसंस्कृतींमध्ये यांचा एकत्रित वापर केला जातो. मासे योग्य पद्धतीनं शिजवले गेले नाहीत, एखाद्या व्यक्तीला लॅक्टोजची अ‍ॅलर्जी असेल किंवा माशांची अ‍ॅलर्जी असेल, तरच त्वचेवर रॅश येणं किंवा तत्सम आजार उद्भवू शकतात. एकंदरीतच मासे आणि दूध यांचा एकत्रित वापर (Food Combination) करून केलेला खाद्यपदार्थ चवीला चांगला लागेल, पण असे पदार्थ उत्तम आरोग्यासाठी योग्य नसतात. त्यामुळे दीर्घकाळासाठी अशा पदार्थांचं सेवन करू नये. तसंच ज्यांची पचनशक्ती कमकुवत असते, अशांनीही हे पदार्थ टाळावेत.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Fish, Milk combinations

पुढील बातम्या