मुंबई, 14 ऑगस्ट : प्रत्येक महिलेसाठी गर्भधारणेचा (Pregnancy) कालावधी हा विशेष महत्त्वाचा असतो. या काळात महिलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. त्यामुळे विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. गर्भधारणेच्या कालावधीत कोरड्या खोकल्याची (Dry Cough) समस्या अनेक महिलांना जाणवते. एखाद्या सामान्य व्यक्तीला कोरडा खोकला झाला तर सततच्या खोकल्यामुळे त्याच्या बरगड्या दुखू लागतात. हाच कोरडा खोकला गर्भवती महिलेला (Dry cough during pregnancy) झाला तर तिला बरगड्या दुखल्याने खूपच वेदना सहन कराव्या लागतात.
एखाद्या गर्भवती महिलेला कोरडा खोकला झाला तर तो फार त्रासदायक ठरू शकतो. या खोकल्याचं प्रमाण वाढलं तर श्वास घेण्यास त्रास होणं, ताप आदी त्रासदेखील होऊ शकतो. अनेकदा खोकताना पोटावर दाब वाढल्याने बाळासाठी ही बाब धोकादायक ठरू शकते. गर्भधारणेचा कालावधी नाजूक आणि विशेष काळजी घ्यावा लागणारा असतो. अशात कोरडा खोकला झाला तर त्यावर मनाने उपचार घेणं जोखमीचं ठरू शकतं.
हे वाचा - ही वाईट सवय तुम्हालाही नाही ना ? चुकूनही पिऊ नका या वेळी चहा
अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि तपासणी करून घेणं आवश्यक असतं; मात्र काही घरगुती उपाय कोरड्या खोकल्यावर रामबाण ठरतात आणि विशेष म्हणजे त्यामुळे काही अपायदेखील होत नाहीत.
असे आहेत उपाय
- कोरडा खोकला झाल्यास पाणी कोमट करून त्यात सैंधव मीठ घालावं आणि दिवसातून तीन ते चार वेळा या पाण्याने गुळण्या कराव्यात.
- दोन कप पाण्यात आलं (Ginger) किसून घालावं. त्यानंतर ते पाणी गाळून घ्यावं आणि त्यात एक चमचा मध घालावा. कोरडा खोकला विषाणू संसर्ग किंवा अॅलर्जीमुळे होतो. हे पाणी दिवसांतून दोन ते तीन वेळा प्यायल्यास आराम पडण्यास मदत होते.
- कोरड्या खोकल्यावर मध (Honey) अधिक गुणकारी असतो. त्यामुळे जेव्हा कोरडा खोकला होतो, तेव्हा दिवसातून दोन ते तीन वेळा मध घ्यावा. रात्री झोपताना कोमट दुधात मध घालून प्यायल्यास फायदा होतो. परंतु मध शुद्ध असावा.
हे वाचा - सावधान! 'गुगल डॉक्टर' तुम्हाला पाडतोय आजारी
- गुळवेल आणि तुळशीच्या पानांचा काढा प्यायल्यास कोरडा खोकला नियंत्रणात येतो. हा काढा कोमट करूनही पिऊ शकता. याशिवाय मनुका भिजवून खाल्यासदेखील कोरडा खोकला नियंत्रणात येतो.
- ज्येष्ठमध केवळ कोरड्या खोकल्यावरच नाही, तर श्वासाशी संबंधित अनेक विकारांवर गुणकारी असतो. कोरड्या खोकल्याचा त्रास होत असेल तर ज्येष्ठमधाचा एक तुकडा बारीक चावून त्याचा रस गिळल्यास आराम पडतो. ज्येष्ठमधाचं पाणी प्यायल्यासही निश्चित आराम पडतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Home remedies, Pregnancy