मुंबई, 6 ऑक्टोबर- युरिन अर्थात लघवी करताना जळजळ किंवा वेदना जाणवणं ही सामान्य बाब नाही. ही युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच मूत्रमार्गाच्या संसर्गाची लक्षणं असू शकतात. लघवी करताना जळजळ होण्याची समस्या कोणीही महिला किंवा पुरुषाच्या बाबतीत उद्भवू शकते. हे किडनीशी संबंधित काही समस्यांचं लक्षणदेखील असू शकतं. जळजळीची समस्या दूर व्हावी, यासाठी खाण्यापिण्याच्या सवयीत काही बदल करावे लागतात. तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने किंवा पाणी कमी प्यायल्यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. मूत्रमार्गाच्या इन्फेक्शनचा त्रास लवकर बरा होण्यात आहाराचा विशेष हातभार असतो. लघवी करताना जळजळ होत असेल तर हा त्रास दूर होण्यासाठी आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करावेत, याविषयी जाणून घेऊ या. प्लांट बेस्ड आहार गरजेचा लघवी करताना होणारी जळजळ कमी करण्यासाठी प्लांट बेस्ड आहार घ्यावा. हेल्थलाइनच्या माहितीनुसार, यासाठी शाकाहार हा उत्तम पर्याय आहे. प्लांट बेस्ड म्हणजेच वनस्पतीआधारित आहार घेतल्यास पोटात आम्ल कमी प्रमाणात तयार होतं. यामुळे लघवी करतेवेळी होणारी जळजळ कमी होऊ शकते. जळजळ कमी करण्यासाठी संत्री, क्रॅनबेरी, स्ट्रॉबेरी आणि बेरीज आदी फळं आहारात समाविष्ट करू शकता. लिंबूवर्गीय फळं या समस्येवर उपाय म्हणून उपयुक्त ठरू शकतात. (हे वाचा: तुमच्याही डोळ्यांना खाज आणि जळजळ होतेय? ‘हे’ घरगुती उपाय ठरतील फायदेशीर **)** दह्याचं करा सेवन या प्रकारची जळजळ कमी करण्यासाठी दह्याचं सेवन उपयुक्त ठरतं. दही हा प्रोबायोटिक्सचा प्रमुख स्रोत आहे. यामुळे शरीरातले वाईट बॅक्टेरिया नष्ट होतात, चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि पचनक्रिया सुधारते. भरपूर पाणी प्या किडनीशी संबंधित कोणताही आजार बरा होण्यात पाणी महत्त्वाची भूमिका बजावतं. युरिनला जळजळ होत असेल, तर भरपूर पाणी किंवा द्र पदार्थ प्या. पाणी जास्त प्यायल्याने किडनी योग्य पद्धतीनं कार्य करते आणि शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास किडनी किंवा लघवीशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. नारळ पाणी, सरबत, सूप आदी पेयं आहारात समाविष्ट करू शकता. **(हे वाचा:** महिलांप्रमाणे पुरुषांनाही होतो मेनोपॉज?, जाणून घ्या कोणत्या वयात आणि काय म्हणतात डॉक्टर ) व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सी हानिकारक बॅक्टेरियाला रोखण्याचं काम करतं. व्हिटॅमिन सीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे संसर्ग कमी होण्यास मदत होते. व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केला तर पोटाशी संबंधित विकार दूर राहतात. फळं, भाजीपाला आणि सप्लिमेंट्सच्या माध्यमातून व्हिटॅमिन सी मिळतं. लिंबू, संत्री, मोसंबी आदी फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा त्रास टाळण्यासाठी तुम्ही आहारात या फळांचा समावेश करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.