नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : मद्यपान हे आरोग्यासाठी घातक मानलं जातं; मात्र दिवसेंदिवस मद्यपानाची क्रेझ वाढताना दिसत आहे. कोणत्याही प्रकारचं अल्कोहोल घेण्याची विशिष्ट पद्धत असते. योग्य पद्धतीनुसार अल्कोहोल घेतलं तर त्याची चव, फ्लेवर कायम राहतो, असं त्या विषयातले तज्ज्ञ सांगतात. व्हिस्की किंवा अन्य अल्कोहोलमध्ये पाणी मिसळावं की नाही हा खरं तर वादाचा मुद्दा आहे. हार्ड ड्रिंकचा मूळ स्वरूपातच आनंद घ्यावा, असं बहुतेकशा वाइन तज्ज्ञांचं मत आहे. अनेक जण थंड पाणी मिसळून व्हिस्की पिणं पसंत करतात; मात्र असं न करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत. ही कारणं नेमकी कोणती आहेत ते जाणून घेऊ या.
भारत आणि आशियायी देशांमधल्या नागरिकांची टेस्ट पॅलेट, इथे उपलब्ध असलेल्या ड्रिंक्सचा दर्जा आणि हवामानामुळे ड्रिंक्समध्ये पाणी मिसळणं सर्वसाधारण आहे. इथले नागरिक केवळ पाणीच नाही तर ज्यूस, सोडा, एनर्जी ड्रिंक आदी मिसळूनही मद्यपान करतात. यामुळे मद्याची कडवट चव बॅलन्स होते आणि शरीर हायड्रेटेड राहतं. काही जणांना व्हिस्कीत थंड पाणी मिसळून पिणं आवडतं. आहारतज्ज्ञांच्या मते, मद्यात मिसळलेल्या पाण्याचं तापमान खूप महत्त्वाचं आहे. याचा मद्याची चव आणि फ्लेवरवर मोठा परिणाम होतो. ज्यांना पाण्याच्या तापमानाचं महत्त्व समजते तेच हार्ड ड्रिंक्सची चव चांगल्या प्रकारे समजू शकतात.
..अन्यथा चारचौघात होईल हसू, ही आहे वाइनचा ग्लास पकडण्याची योग्य पद्धत
वास्तविक माणसाच्या चव ओळखणाऱ्या ग्रंथी द्रव पदार्थांच्या वेगवेगळ्या तापमानावर वेगवेगळी प्रतिक्रिया देतात. त्यामुळे माणसाला प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळी जाणवते. तज्ज्ञांच्या मते, खाद्यपदार्थ असो अथवा ड्रिंक्स, थंडपणामुळे आपल्या चव ओळखाऱ्या ग्रंथी त्याचा फ्लेवर नीटपणे ओळखू शकत नाहीत. खाद्यपदार्थ किंवा ड्रिंक पहिल्यापेक्षा गरम असतील तर त्याचा फ्लेवर, चव समजू शकते. यामुळेच गरम बिअरची चव कडू लागते आणि चिल्ड बिअर पिताना त्रास होत नाही.
याशिवाय व्हिस्की सर्व्ह करण्यासाठी खास ग्लास वापरला जातो. बहुतांश वेळा व्हिस्की टंबलर ग्लासमध्ये सर्व्ह केली जाते. या ग्लासचा तळभाग खूप जाड आणि जड असतो. तळाकडचा भाग जड असण्यामागे व्हिस्कीची नैसर्गिक उबदारता टिकवून ठेवणं हा उद्देश असतो, जेणेकरून ज्या पृष्ठभागावर ग्लास ठेवला जातो त्या पृष्ठभागाच्या तापमानाचा मद्याच्या तापमानावर परिणाम होणार नाही. त्याचवेळी वाइन ग्लासेसचा तळाकडचा भाग निमुळता असतो. त्याला स्टेम म्हणतात. ग्लासचा हा भाग हातात पकडून वाईन पिण्याचा सल्ला वाइनतज्ज्ञ देतात. याचं कारण असं आहे, की ग्लासच्या स्टेमऐवजी बेसने ग्लास धरला, तरी त्यातल्या वाइनचं तापमान बदलू शकत नाही.
व्हिस्की किंवा हार्ड ड्रिंक्समध्ये मिसळल्या जाणाऱ्या पाण्याचं तापमान नेमकं किती असावं, याविषयी वाइनतज्ज्ञांनी माहिती दिली. चव ओळखणाऱ्या ग्रंथी 15 ते 35 अंश सेंटिग्रेड तापमानात उत्तम काम करतात. 35 अंश तापमानात, चव ओळखणाऱ्या ग्रंथी पूर्णपणे खुल्या होतात आणि एखादी गोष्ट चाखल्यानंतर आपल्या मेंदूला चवीबाबत स्पष्ट संदेश पाठवतात. दुसरीकडे जेव्हा ड्रिंक्स किंवा खाद्यपदार्थाचं तापमान 15 अंशांपेक्षा कमी असते, तेव्हा चव ओळखणाऱ्या ग्रंथी मेंदूला स्पष्ट संदेश पाठवू शकत नाहीत. त्यामुळे पदार्थ किंवा ड्रिंक्सची चव स्पष्टपणे कळत नाही. म्हणजेच ड्रिंक्स खूप थंड करून प्यायल्याने आपल्या चवीच्या ग्रंथी एकप्रकारे सुन्न होतात आणि चव लवकर समजत नाही. अशा परिस्थितीत एखाद्याला महागड्या सिंगल माल्टचा आस्वाद घ्यायचा असेल तर ती थंड झाल्यावर पिणं हे तिच्या मूळ चवीसोबत प्रतारणा केल्यासारखं होईल. त्यामुळे मद्यात कोणतीही गोष्ट न मिसळता त्याचा आस्वाद घेण्याचा सल्ला वाइन तज्ज्ञ देतात. व्हिस्कीची योग्य चव लागावी यासाठी त्यात मिसळल्या जाणाऱ्या पाण्याचं तापमान रूम टेम्परेचर किंवा त्यापेक्षा थोडं जास्त असावं, असं तज्ज्ञांचं मत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.