नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : मद्यपान आरोग्यासाठी घातक असलं तरी अलीकडे त्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. पार्टी आणि मद्यपान हे समीकरण बनलं आहे. मद्यपानाचे काही संकेत असतात. मद्यासाठी कोणत्या प्रकारचा ग्लास वापरता, तो कशा पद्धतीने पकडता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही मद्याचा ग्लास कसा पकडता यावरून तुम्ही प्रथमच मद्यपान करत आहात की सराईत आहात, हे सहजपणे ओळखू शकतं. मद्याच्या प्रकारानुसार ग्लासची निवड केली जाते. ग्लासच्या आकारमानानुसार तो हातात घेण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. मद्याचा ग्लास योग्य पद्धतीनेच पकडण्याचा सल्ला वाइनतज्ज्ञ देतात. त्याबद्दल जाणून घेऊ या. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
मद्यप्रेमी आपल्या सोयीनुसार मद्याचा ग्लास हातात घेतात. काही जण बोटांच्या मध्ये ग्लास पकडतात, कोणी तळहाताने ग्लास पकडतात तर कुणी ग्लासचा तळ पकडतात. वाइन ग्लास पकडण्याची पद्धत मद्याची चव आणि स्वादावर परिणाम करत असते. हे खरं वाटत नसलं, तरी खरं आहे. याशिवाय हार्ड ड्रिंक्सबद्दलची समजदेखील यावरून दिसते. ग्लास पकडण्याच्या पद्धतीवरून नवखा मद्यप्रेमी सहज कळू शकतो. ग्लास पकडताना सहजता जाणवली पाहिजे, त्यात दिखावा करण्याची गरज काय असं काही जण म्हणू शकतात; मात्र मद्याचा ग्लास योग्य पद्धतीनं पकडण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. त्यामागे काही कारणं आहेत.
तज्ज्ञांच्या मते, हातात ग्लास चुकीच्या पद्धतीने पकडल्याने वाइनचा गंध आणि एकूणच अनुभवावर वाईट परिणाम होऊ शकतो. संबंधित व्यक्तीच्या हाताचं तापमान हे त्यामागचं प्रमुख कारण आहे. माणसाचे हात गरम असतात, त्यामुळे वाइनच्या नैसर्गिक स्वादावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वाइन सर्व्हर देखील बाटलीच्या तळाशी धरतात. तसंच वाइन ग्लासला एक लांब भाग असतो. त्याला स्टेम असं म्हणतात. स्टेम पकडण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे मानवी हाताची उष्णता वाइनला लागत नाही आणि त्यामुळे वाइनची चव तिच्या नैसर्गिक तापमानामुळे कायम राहते. हाताच्या उष्णतेमुळे वाइनमधल्या अल्कोहोलचं लवकर बाष्पीभवन होऊ शकतं. त्यामुळे हळूहळू वाइनची चव कमी होत जाते. त्यामुळे वाइनच्या ग्लासला स्टेम असेल तर तो पकडणे गरजेचे आहे. अंगठा, तर्जनी आणि मधल्या बोटाच्या साह्याने स्टेमच्या बाजूपासून वरच्या दिशेने ग्लास अशा प्रकारे धरावा, की तो पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात राहील.
ग्लासला स्टेम असेल तर त्याचा एक फायदा म्हणजे तुम्ही ग्लासमध्ये वाइन हलवून घेऊ शकता. ग्लासमध्ये वाइन एका ठराविक वेगाने गोल गोल फिरवण्याच्या प्रक्रियेला स्वर्लिंग म्हणतात. यामुळे वाइनचा नैसर्गिक गंध वातावरणातल्या ऑक्सिजनमुळे अधिक फैलावतो. त्यामुळे वाइन पिणाऱ्यास वाइनचा नैसर्गिक गंध जाणवतो. वाइन ग्लासचा स्टेम हातात पकडणं हा उत्तम मार्ग आहे. त्यामुळे ग्लासमधली वाइन सांडण्याची शक्यताही कमी असते. याशिवाय स्टेम पकडण्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे असं केल्याने पिणाऱ्या व्यक्तीच्या बोटांच्या ठशांमुळे ग्लास खराब होत नाही. ग्लास वारंवार धरताना, वस्तूंना स्पर्श करताना किंवा अन्य कोणाशी हस्तांदोलन केल्याने हात खराब होऊ शकतात. ही घाण ग्लासवर बोटांच्या ठशांच्या स्वरूपात चिकटते. ही बाब शिष्टाचाराच्या दृष्टीने अयोग्य मानली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.